Home / देश-विदेश / Iran Israel America War: युद्ध गंभीर वळणावर! एकमेकांच्या तेल-गॅस प्रकल्पावर हल्ले !मोठे नुकसान! किमती प्रचंड भडकणार! जगाची चिंता वाढली

Iran Israel America War: युद्ध गंभीर वळणावर! एकमेकांच्या तेल-गॅस प्रकल्पावर हल्ले !मोठे नुकसान! किमती प्रचंड भडकणार! जगाची चिंता वाढली

Iran Israel America War: इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरुद्ध छेडलेल्या युद्धाच्या विसाव्या दिवशी दोन्ही बाजूंनी परस्परांच्या तेल प्रकल्पावर हल्ले करण्यात आले....

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Iran Israel America War: इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरुद्ध छेडलेल्या युद्धाच्या विसाव्या दिवशी दोन्ही बाजूंनी परस्परांच्या तेल प्रकल्पावर हल्ले करण्यात आले. काल इस्रायलने इराणच्या जगातील सर्वात मोठे नैसर्गिक वायूचे भांडार असलेल्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर हल्ला केला. त्यानंतर चवताळलेल्या इराणने अमेरिकेचा मित्रदेश असलेल्या कतारच्या रास लाफान गॅस प्रकल्पावर हल्ला केला. या हल्ल्यात गॅस प्रकल्पाचे अतोनात नुकसान झाले आहे. इस्रायल आमच्या ऊर्जा साठ्यांवर हल्ला करणार असेल तर आम्हीही आखाती देशांतील तेल आणि गॅस प्रकल्पावर हल्ले करून जशास तसे उत्तर देऊ, अशी धमकी इराणने दिली आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती उसळून 118 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या असून हा आता जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. आखाती देशांतील तेल आणि गॅस प्रकल्पावर हल्ले असेच कायम राहिले,  तर तुटवडा निर्माण होईल व त्यांच्या किमती भडकून संपूर्ण जगाला युद्धाच्या झळा सोसाव्या लागतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


इराणने साऊथ पार्स गॅस प्रकल्पावरील हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून काल कतारच्या सर्वात मोठ्या रास लफान गॅस प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यानंतर कतारच्या सरकारी पेट्रोलियम कंपनीने निवेदन जारी करून माहिती दिली की, इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मुख्य प्लांटला आग लागली. या आगीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर कतारने इराणच्या दूतावासातील दोन अधिकार्‍यांची हकालपट्टी केली.  12 मुस्लीम देशांनीही या हल्ल्यावरून इराणवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी इराणला हे हल्ले तत्काळ थांबवण्याचे आवाहन केले आहे.


दुसरीकडे इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सने इराणी माध्यमांमध्ये प्रसारित केलेल्या निवेदनात इस्रायलला धमकीवजा सज्जड इशारा दिला की, तुम्ही आमच्या साऊथ पार्स प्रकल्पावर हल्ला करून फार मोठी चूक केली आहे. आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा इशारा देतो, अशी चूक जर पुन्हा कराल तर तुमच्या आणि तुमच्या मित्र देशांतील ऊर्जा साठे पूर्णपणे नष्ट होत नाहीत तोपर्यंत आमचे हल्ले थांबणार नाहीत.
कतारबरोबरच इराणने इराकची राजधानी बगदाद, सौदीची राजधानी रियाध आणि कुवैतवरही ड्रोन हल्ले केले. कुवैतच्या मीना अल अहमदी शहरात इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर आग लागली. कुवेतमधील एका तेल शुद्धीकरण प्रकल्पावर ड्रोन हल्ला करण्यात आला. त्यानंतर  तिथे आग लागली. तर सौदी अरेबियातील यांबु येथील आरामको आणि मोबिल कंपनीच्या सुमरेफ या प्रमुख तेल शुद्धीकरण प्रकल्पावरही इराणने ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात या प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. सुमरेफ हे सौदी अरेबियाचे मुख्य तेल निर्यात केंद्र आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीला वळसा घालून लाल समुद्रातील बंदरांपर्यंत तेल वाहून नेणार्‍या पाइपलाइनचे हे अंतिम ठिकाण आहे.


या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये एक तातडीची बैठक बोलावली. सौदीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराणला कठोर इशारा देत म्हटले आहे की, आम्ही आधी चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, परंतु गरज पडल्यास लष्करी कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. सोदीचा संयम संपत चालला असून इराणने आमचे ऐकून घेतले पाहिजे. इस्रायल आणि इराणने एकमेकांच्या ऊर्जा साठ्यांवर हल्ले केल्यामुळे सगळ्याच जगाची चिंता वाढली आहे. कतारमधील इराणच्या हल्ल्याचा फटका भारतालाही बसणार आहे. भारत आपल्याला लागणारे क्रूड ऑईल आणि 50 टक्के गॅस कतारकडूनच घेतो. इतर अनेक देशही कतारकडूनच तेल आणि गॅसची आयात करतात. त्यामुळेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ऊर्जा केंद्रांवरील हल्ले थांबवा, असे आवाहन दोन्ही देशांना उद्देशून केले. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याची अमेरिकेला माहिती नव्हती, असे म्हणत कानावर हात ठेवले. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेला इस्रायली हल्ल्याची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. इस्रायलने अमेरिकेशी सल्लामसलत न करताच रागाच्या भरात हा हल्ला केला. इस्रायलच्या या अविवेकी कृत्याचे गंभीर परिणाम या युद्धाशी काहीही संबंध नसलेल्या कतारला भोगावे लागले. इस्रायल अशाप्रकारे यापुढे इराणच्या ऊर्जा साठ्यांवर हल्ले करणार नाही. ट्रम्प हे वक्तव्य करत असतानाच अमेरिकेच्या लष्करातील उच्चपदस्थ अधिकारी म्हणाले की,  इस्रायल इराणच्या साऊथ पार्सवर हल्ला करणार याची माहिती आम्हाला होती. मात्र हल्ल्यात आमचा सहभाग नव्हता.


दरम्यान आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या हत्येवर संयुक्त राष्ट्र गप्प असल्याच्या आरोपावरून इराणने नाराजी व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे राजदूत, अमीर-सईद इरावानी यांनी सुरक्षा परिषदेला पत्र लिहिले आहे की, संयुक्त राष्ट्रांच्या मौनामुळे इस्रायलला असे हल्ले करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे. हे थांबवले नाही, तर असे हल्ले सामान्य होऊ शकतात आणि इतर देशांमध्येही पसरू शकतात.
त्यानंतर चीनने इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांच्या हत्येचा निषेध करत म्हटले की, उच्चपदस्थ नेत्यांच्या हत्या करणे आणि नागरिकांना लक्ष्य करणे योग्य नाही. अशा कृतींमुळे जगातील तणाव आणखी वाढतो.

अमेरिकेचे परराष्ट्र, संरक्षण मंत्र्यांच्या
निवासस्थानाची सुरक्षा वाढवली

वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन सैन्याच्या फोर्ट लेस्ली मॅकनेयर या तळावर संशयास्पद ड्रोन दिसल्याने खळबळ उडाली. परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ हे फोर्ट लेस्ली मॅकनेयर या सैन्य तळाच्या परिसरात वास्तव्यास आहेत. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे या तळाची सुरक्षा आधीच वाढवण्यात आली आहे. मागील 10 दिवसांत एका रात्री फोर्ट लेस्ली मॅकनेयरवर अनेक ड्रोन दिसल्यानंतर ती आणखी कठोर करण्यात आली आणि व्हाईट हाऊसमध्ये या विषयावर आपत्कालीन बैठकही घेण्यात आली. अमेरिकेने जगभरातील आपल्या दूतावासांना सुरक्षा इशारा जारी केला आहे. न्यू जर्सीतील जॉइंट बेस मॅकग्वायर-डिक्स-लेकहर्स्ट आणि फ्लोरिडातील मॅकडिल एअर फोर्स बेस येथील  सुरक्षा पातळी ‘चार्ली’पर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ संभाव्य हल्ला किंवा धोका असण्याची शक्यता आहे. यापेक्षा वरची पातळी ‘डेल्टा’ असून ती प्रत्यक्ष हल्ला झाल्यावर किंवा होण्याच्या स्थितीत लागू केली जाते. फोर्ट मॅकनेयरवर ड्रोन दिसल्यानंतर अधिकार्‍यांनी रुबियो आणि हेगसेथ यांना दुसर्‍या ठिकाणी हलवण्याचाही विचार केला होता. मात्र, अद्याप त्यांना तेथून हलवण्यात आलेले नाही.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या