Dental Health Tips : आपले दात हे केवळ अन्न चावण्यासाठी नसून ते आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य आणि शरीराच्या एकूण आरोग्याचे प्रतीक आहेत. अनेकदा आपण दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देतो, पण अशा काही रोजच्या सवयी असतात ज्या दातांच्या संरक्षणात्मक कवचाला कायमचे नष्ट करू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, जर या ७ सवयी वेळेत बदलल्या नाहीत, तर भविष्यात दातदुखी आणि महागड्या उपचारांना सामोरे जावे लागू शकते.
तुमचे दात खराब करणाऱ्या ७ प्रमुख सवयी खालीलप्रमाणे आहेत:
१. ब्रश केल्यानंतर लगेच पाण्याने चूळ भरणे
ही चूक जवळपास प्रत्येक जण करतो. दात घासल्यानंतर लगेच पाण्याने तोंड धुतल्यास टूथपेस्टमधील उपयुक्त घटक वाहून जातात. ब्रश केल्यानंतर फक्त जास्तीची पेस्ट थुंकून द्यावी, जेणेकरून त्याचा प्रभाव दातांवर राहील आणि दात किडण्यापासून वाचतील.
२. जेवण झाल्याबरोबर लगेच ब्रश करण्याची घाई
अनेकांना वाटते की जेवल्यानंतर लगेच ब्रश केल्याने दात स्वच्छ राहतात. मात्र, जेवणानंतर दातांचे वरचे कवच थोडे मऊ झालेले असते. अशा वेळी लगेच ब्रश केल्यास ते कवच घासले जाण्याची भीती असते. त्यामुळे जेवणानंतर किमान ३० ते ४५ मिनिटांनीच ब्रश करावा.
३. दात पांढरे करण्यासाठी केमिकल्सचा अतिवापर
दात अधिक पांढरे आणि चमकणारे दिसण्यासाठी वारंवार ‘व्हाईटनिंग’ करणे घातक ठरू शकते. यामुळे दातांची संवेदनशीलता वाढते आणि हिरड्या कमकुवत होतात. एकदा गेलेले नैसर्गिक कवच पुन्हा कधीही तयार होत नाही.
४. माऊथवॉशचा अतिवापर करणे
माऊथवॉशमुळे तोंड पूर्ण स्वच्छ होते असा आपला समज असतो. पण यामुळे तोंडातील चांगले जीवाणूही मरतात, ज्याचा परिणाम पचनशक्तीवर होऊ शकतो. याऐवजी नैसर्गिक पद्धतीने गुळण्या करणे अधिक सुरक्षित आहे.
५. दात दुखण्याची वाट पाहणे
जोपर्यंत दात दुखत नाही, तोपर्यंत आपण तपासणीसाठी जात नाही. मात्र, दात दुखायला लागतो तेव्हा समस्या आधीच गंभीर झालेली असते. नियमित तपासणी केल्यास छोटी समस्या मोठी होण्याआधीच रोखता येते.
६. झोपेत घोरणे किंवा तोंड उघडे ठेवणे
घोरण्यामुळे तोंड कोरडे पडते आणि लाळेचे प्रमाण कमी होते. लाळ ही दातांचे जंतूंपासून संरक्षण करण्याचे नैसर्गिक काम करते. लाळ कमी झाल्यामुळे दातांमध्ये कीड लागण्याची शक्यता वाढते.
७. मुलांनी तोंडाने श्वास घेणे
जर मुले झोपताना तोंड उघडे ठेवून श्वास घेत असतील, तर त्यांच्या दातांच्या रचनेवर आणि जबड्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे मुलांच्या वाढीवरही परिणाम होतो, त्याकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये.










