Ashok Kharat News : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या विकृत कृत्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली असतानाच, या प्रकरणाला आता एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. खरातच्या कृष्णकृत्यांचे पुरावे समोर आणणारा आणि या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मानला जाणारा नीरज जाधव हा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. नाशिक गुन्हे शाखेने (क्राईम ब्रांच) त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्या चौकशीतून आता खरातच्या पापाची संपूर्ण कुंडली आणि या प्रकरणातील अदृश्य दुवे समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऑफिस बॉय ते मुख्य संशयित: नीरज जाधवचा प्रवास
मिळालेल्या माहितीनुसार, नीरज जाधव हा अशोक खरातच्या कार्यालयात ‘ऑफिस बॉय’ म्हणून कार्यरत होता. याच काळात त्याने खरातच्या नकळत त्याच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. खरातने शंभरहून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आणि त्या दृश्यांचे चित्रीकरण केल्याचे धक्कादायक वास्तव नीरजने मिळवलेल्या ५८ व्हिडिओंमधून समोर आले आहे. मात्र, हे पुरावे त्याने केवळ न्यायासाठी बाहेर आणले की स्वतःच्या स्वार्थासाठी, याबाबत आता संशयाची सुई फिरली आहे. खरातने केलेल्या आरोपांनुसार, नीरजने हे व्हिडिओ दाखवून त्याच्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ही मागणी पूर्ण न झाल्यामुळेच त्याने पीडित महिलांच्या मदतीने खरातला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
मॉर्फ व्हिडिओ आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर गुन्हे
नीरज जाधव हा केवळ पुरावे गोळा करणारा साक्षीदार नसून, तो स्वतः देखील अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकला आहे. शिर्डी येथील एका महिलेला तिच्या मॉर्फ केलेल्या (बदललेल्या) व्हिडिओचे स्क्रीनशॉट्स पाठवून धमकावल्याप्रकरणी त्याच्यावर आधीच गुन्हा दाखल आहे. इतकेच नव्हे, तर त्याने एका महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ तिच्या नातेवाईकांना पाठवून तिचे सामाजिक चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात उघड झाले आहे. अनेक महिलांनी खरातकडेच तक्रार केली होती की नीरज त्यांना धमकावत आहे. याच तक्रारींचा आधार घेत खरातने पीडितांना पोलिसात जाण्याचा सल्ला दिला होता, जेणेकरून तो स्वतःच्या गुन्ह्यांवर पांघरूण घालू शकेल.
शरण गती आणि पोलिसांची कारवाई
कायद्याचा फास आवळला जात असल्याचे पाहून नीरज जाधवने स्वतःहून पोलीस स्थानकात शरणागती पत्करली, त्यानंतर नाशिक पोलिसांनी त्याला अधिकृतरीत्या ताब्यात घेतले. या प्रकरणातील सर्वात भयावह बाब म्हणजे १०० हून अधिक महिलांच्या शोषणाचे व्हिडिओ अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. या व्हिडिओंचा वापर करून किती जणांना ब्लॅकमेल करण्यात आले आणि यामागे मोठे रॅकेट आहे का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. खरात सध्या बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात असून, नीरजच्या अटकेमुळे या संपूर्ण प्रकरणातील सत्य आणि त्यामागील आर्थिक व्यवहारांचे गूढ उकलण्यास मदत होणार आहे.










