Rupali chakanka: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याच अशोक थोरातची पाद्यपूजा करतानाचा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा व्हिडिओ आणि फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. मात्र हे प्रकरण उघडकीस येऊन तीन दिवस होऊनही आपला या प्रकरणाशी संबंध नाही, असा साळसूदपणा करत चाकणकर यांनी राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका सुरू होती. आज दबाव वाढल्यावर चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्वतःला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, त्यांनीही चाकणकरांची पाठराखण करण्यास नकार दिला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चाकणकरांनी राजीनामा दिला. वैयक्तिक कारणाने आपण हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले.
राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, मी अशोक खरातला गुरु मानले होते. मात्र त्याच्या वैयक्तिक आयुष्याची दुसरी बाजू आम्हाला माहिती नव्हती. माझ्या त्याच्या कृत्याशी काहीही संबंध नाही. खरातची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, ज्यांनी-ज्यांनी माझ्यावर आरोप आणि खोट्या बातम्या दिल्या आहेत. त्यांना मी कायदेशीर नोटीसा पाठवणार आहे. ही पुढील सविस्तर माहिती पत्रकार परिषद घेऊन सर्वांना देणार आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याआधी चाकणकर यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचीही भेट घेऊन त्यांना एक पत्र दिले. त्यानंतर त्यांनी एक्स पोस्ट करून लिहिले की, अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत दाते यांना सांगितले.
या प्रकरणातून खरातचा विश्वासू आॅफीस बाॅय नीरज जाधवला पोलिसांनी अटक केली होती. कॅनडा कॉर्नर येथील ‘ओजस प्रॉपर्टीज’ या कार्यालयात खरातने अनेक महिलांवर केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ सीसीटीव्हीत होते. नीरज जाधवने डिसेंबर २०२५ मध्ये त्याच्या नकळत कार्यालयातून ५८ महिलांवरील अत्याचाराचे फुटेज चोरले. खरात एकटाच या कृत्यातून मजा मारत समाजात स्वच्छ प्रतिमा म्हणून मिरवत असल्यामुळे नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली. त्याने या व्हिडिओंच्या जोरावर खरातलाच ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. नीरज आणि त्याच्या साथीदारांनी या क्लिप्सच्या बदल्यात खरातकडे ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. मात्र त्याने या मागणीला दाद न देता खरातने खंडणी मागितल्याचा आरोप करीत निरज विरोधात थेट वावी पोलिसांत फिर्याद नोंदविली. त्यामुळे नीरजने आपला मोर्चा पीडित महिलांकडे वळवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू केला.
नीरज व इतरांनी शिर्डीतील एका २४ वर्षीय विवाहितेचे फोटो आणि काही व्हिडिओ तिला व्हॉट्सअॅपवर पाठवून धमकावले. ही पीडिता मंदिरात दर्शन घेत असताना नीरजने तिला गाठून व्हिडिओ दाखविले. ती घाबरली व तिने ही बाब खरातला कळविली. पण खरातने स्वतःला वाचवण्यासाठी तिलाच पोलिसात जाण्यास सांगितले. यात काही होत नाही म्हणताना नीरजने सिडकोतील दुसऱ्या २८ वर्षीय विवाहितेचा व्हिडिओ तिच्या मेहुण्याला पाठविला. नीरजचा हा उद्योग त्याच्यावर आणि खरातवर उलटला. मेहुण्याने धीर दिल्याने या पीडितेने सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार केली. त्यानंतर खारातला अटक झाली. खरातला अटक झाल्यावर महिला आयोगाच्या चाकणकर या खरातचे पाय धुतानाचा, केक भरवतानाचा असे फोटो व्हायरल झाले.
याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी नाशिकमध्ये दाखल होत खरातची दोन तास कसून चौकशी केली. याशिवाय त्याच्या नाशिकच्या कर्मयोगी नगरातील घरातून सहा लाख रुपये रोकड आणि सिन्नरच्या फार्महाऊसवरून एक पिस्तूल जप्त केले. वावी, शिर्डी आणि सरकारवाडा येथे खरात विरोधात दाखल तीन गुन्ह्यांची कागदपत्रे एसआयटीने ताब्यात घेतली. आता नीरज जाधवच्या टोळीचा आणि खरातच्या आर्थिक व राजकीय संबंधांचा शोध घेतला जात आहे. खरातकडे पिस्तूलचा परवाना आहे का? याचाही तपास सुरू आहे.
याशिवाय खरातने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,रूपाली चाकणकर, सुनील तटकरे, राधाकृष्ण विखे-पाटील, दीपक केसरकर, दिल्ली, हरियाणा, राजस्थानातील भाजप व काही इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबतचे फोटो पोस्ट करून स्वतःचे वलय निर्माण केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्र्यांसोबतचे त्याचे फोटो तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे राज्यातील बडे राजकीय नेते, मंत्र्यांशी आणि प्रसिद्ध व्यक्तींशी जोडले असल्याची माहिती आहे.
रूपाली चाकणकर तंत्रमंत्र करतात ?
आज राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे नवीन फोटो व्हिडिओ व्हायरल झाले. अजित पवार गटाच्याच नेत्या रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर फरार अशी पोस्ट केली. तर उबाठा उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले की, एका पीडितेने सांगितले की रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या. यासाठी त्यांनी २ सप्टेंबर २०२४ रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिकाही कापून रक्त अभिषेक केला होता . त्यावेळी त्यांच्या बोटाला जखम झाली. ती जखम तब्बल ४ महिने तशीच होती इतके खोल त्यांनी स्वतःचे बोट कापले होते . याचा एक फोटो माझ्याकडे आहे. त्यात चाकणकरांनी अनामिकेला बँडेज लावल्याचे दिसते. चाकणकर व खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर उपस्थित होत्या. एवढेच नव्हे तर चाकणकरांच्या घरात खरातची भाची राहते. याप्रकरणात अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाले आहे. त्यामुळे चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तात्काळ हकालपट्टी झाली पाहिजे. त्या फरार होण्यापूर्वी त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांनी यापूर्वीही आपल्या पदाचा दुरुपयोग करून या प्रकरणी अनेकांवर दबाव आणला आहे. त्या मध्यरात्री २- २ वाजता फोन करून पीडितांना धमकी देत होत्या. त्यामुळे त्यांचा सीडीआर तपासला पाहिजे. त्यांना अटक झाली पाहिजे व त्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे.
जमीन – आलिशान बंगले
खरातची २०० कोटींची संपत्ती ?
अशोक खरातने गेल्या १५ वर्षांत सुमारे २०० कोटी रुपयांची मालमत्ता जमवल्याचे उघड झाले आहे. यामध्ये पाथर्डी परिसरात सुमारे १५० कोटी रुपयाची ३० एकर जमीन, कहांडळवाडी, मिरगाव येथे ४५ एकर जमीन, विविध ठिकाणी कोट्यवधींची गुंतवणूक,कर्मवीर नगरमध्ये आलिशान बंगला, मिरगावमध्ये १० कोटींचे फार्महाऊस, नाशिक कॅनडा कॉर्नर येथे कार्यालय, ओझर परिसरात मालमत्ता, शिर्डीत ४ एकर भूखंड (सुमारे ५० कोटी रुपये) यांचा समावेश आहे. त्याचबरोबर ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टशी संबंध असून वार्षिक उलाढाल सुमारे २ कोटी रुपये असल्याची माहिती आहे.
खरातने उत्तेजक वायग्रा पाण्यात मिसळून ते ओश्नो जल नावाने प्रसाद म्हणून द्यायचा . अशा तऱ्हेने त्याने महिलांची फसवणूक केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. त्यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की, अशोक खरात एक विशेष प्रकारचे पाणी तयार करायचा ज्याला तो ‘ओश्नो जल’ म्हणायचा. हे जल म्हणजे प्रत्यक्षात कफ सिरप, पाणी आणि कुटून टाकलेली ‘वायग्रा’ पावडर याचे मिश्रण असायचे. हे ओश्नो जल मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील विविध पक्षांचे नेते आपल्या गाड्या आणि चक्क हेलिकॉप्टर खरातकडे पाठवायचे. यामध्ये तिरुपती बालाजी ट्रस्टच्या एका ट्रस्टीचाही समावेश आहे. या प्रकरणात केवळ एका पक्षाचे नाही, तर अनेक पक्षांमधील नेते आहेत.याशिवाय मुंबईतील एक उपजिल्हाधिकारी खरातला सतत मदत करत आहेत. ते त्याला पैसे आणि वकील पुरवत आहे. त्यांचे त्याच्याशी आर्थिक संबंधही आहेत.










