Anjali Damania on Rupali Chakankar : नाशिक येथील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्या विकृत कृत्यांनी महाराष्ट्र सुन्न झाला असतानाच, आता या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे छायाचित्रे समोर आल्यानंतर चोहोबाजूंनी होणाऱ्या टीकेमुळे त्यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेत, चाकणकर यांनी आपल्या कार्यकाळात काही महत्त्वाची प्रकरणे दडपली आहेत का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना अत्यंत गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या की, “महिला आयोग ही संस्था पीडित महिलांना न्याय देण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे. मात्र, दुर्दैवाने रुपाली चाकणकर यांनी अध्यक्षपदावर असताना अशोक खरात सारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला राजाश्रय दिला.” दमानिया यांनी असाही दावा केला की, गेल्या काही दिवसांत त्यांच्याकडे अशा ५ ते ६ महिलांच्या तक्रारी आल्या आहेत, ज्यांनी महिला आयोगाकडे दाद मागितली होती, परंतु त्यांना तिथे न्याय मिळाला नाही. त्यामुळे चाकणकर यांनी पदाचा गैरवापर करून कोणाला अभय दिले, याची निष्पक्ष चौकशी होणे काळाची गरज आहे.
या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात होणाऱ्या हालचालींवर भाष्य करताना दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. “काल सुनील तटकरे यांची देहबोली (Body Language) पाहिली असता, ते प्रश्नांपासून पळ काढताना दिसले. परंतु, तुम्ही कितीही पळ काढलात तरी मी हा विषय सोडणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, ‘ओशो जल’ घेण्यासारख्या प्रकारांतून या सर्वांची मिलीभगत स्पष्ट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘राजीनामा देतानाही चेहऱ्यावर अहंकार अन् मॉडेलिंगसारखी पोझ’; अंजली दमानियांचा रुपाली चाकणकरांवर घणाघाती प्रहार-
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे दिलेला राजीनामा आणि त्यावेळच्या त्यांच्या वागणुकीवरून दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. “राजीनामा देताना रुपाली चाकणकर ज्या पद्धतीने उभ्या होत्या, तो प्रकार एखाद्या मॉडेलिंगच्या फोटोशूटसारखा वाटत होता. त्यांच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप होता, ना विनम्रता; उलट सत्तेचा प्रचंड अहंकारच त्यातून झळकत होता,” अशा शब्दांत दमानिया यांनी चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.
यावेळी बोलताना दमानिया यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात इतके गंभीर प्रकरण गाजत असताना, एका स्त्री म्हणून त्यांनी तातडीने पाऊल उचलणे अपेक्षित होते, असे दमानिया म्हणाल्या. “महाराष्ट्रातील महिलांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र जेव्हा या प्रकरणाने कळस गाठला आणि सर्व बाजूंनी दबाव वाढला, तेव्हाच त्यांनी तो राजीनामा स्वीकारला. राजीनामा स्वीकारताना सुनेत्रा पवारांच्या चेहऱ्यावर गांभीर्य दिसत होते, पण चाकणकरांची वृत्ती मात्र आत्मपरीक्षण करण्याऐवजी स्वतःचे प्रदर्शन करण्याकडेच अधिक होती,” असे निरीक्षण दमानिया यांनी नोंदवले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावरही दमानिया यांनी कडक शब्दांत प्रहार केला. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी तिथून निघून जाणे, हे तटकरे यांच्यातील भीतीचे लक्षण असल्याचे त्यांनी नमूद केले. “तुमची देहबोली सांगतेय की तुम्ही घाबरला आहात. तुम्ही कितीही पळ काढलात, तरी आम्ही हा विषय सोडणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. केवळ राजीनामा देणे ही या प्रकरणाची इतिकर्तव्यता नसून, रुपाली चाकणकर यांच्यावर रीतसर गुन्हा (FIR) दाखल होऊन त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
महिला आयोगाचा केवळ राजकारणासाठी वापर; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानियांचा सरकारवर प्रहार-
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या राजीनाम्यावर भाष्य करताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “चाकणकर यांचा राजीनामा घेण्यास सरकारने आधीच खूप विलंब केला आहे. हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराच्या अनेक गंभीर घटना समोर आल्या असतानाच त्यांचे पदमुक्त होणे अपेक्षित होते,” असे दमानिया यांनी म्हटले. वैष्णवी हगवणे, संपदा मुंडे आणि गौरी गर्जे यांसारख्या पीडित महिलांच्या संवेदनशील प्रकरणांत महिला आयोगाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही, असा थेट आरोप त्यांनी केला. आयोगाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तींना केवळ राजकारण करण्यात आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यात रस असतो, त्यांना पीडित महिलांच्या वेदनांशी काहीही देणेघेणे नसते, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
महिला आयोगाच्या भविष्यातील स्वरूपाबाबत बोलताना दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. “महिला आयोग आणि राजकारण या दोन भिन्न गोष्टी आहेत, त्या एकमेकांपासून दूरच ठेवल्या पाहिजेत. यापुढे या घटनात्मक पदावर कोणत्याही राजकीय व्यक्तीची नियुक्ती करू नका,” असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रातील महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यायचा असेल, तर या पदावर एखाद्या कर्तव्यदक्ष महिला आयपीएस (IPS) अधिकाऱ्याची किंवा निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी सरकारकडे लावून धरली आहे. केवळ राजकीय पुनर्वसनासाठी या पदाचा वापर करणे थांबवावे, असेही त्यांनी सुनावले.
रुपाली चाकणकर यांच्या राजकीय स्थानावरही दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चाकणकर अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यांना केवळ आयोगावरूनच नाही, तर या राजकीय जबाबदारीतूनही तातडीने मुक्त केले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या संबंधांवरून त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना धारेवर धरले. भाजपसह अनेक पक्षांचे बडे नेते खरातकडे ‘ओष्णोजल’ (अघोरी तीर्थ) घेण्यासाठी आपल्या गाड्या आणि हेलिकॉप्टर पाठवत असत. शिर्डीच्या दर्शनाच्या नावाखाली खरातच्या मंदिरात हजेरी लावणाऱ्या या सर्व राजकारण्यांची नावे जनतेसमोर आली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
‘राजकारण्यांनी भोंदूगिरीचे स्तोम माजवले’; रुपाली चाकणकर आणि बड्या नेत्यांवर अंजली दमानियांचा घणाघाती हल्ला-
नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली असतानाच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणातील राजकीय लागेबांधे अत्यंत परखडपणे उघड केले आहेत. रुपाली चाकणकर यांनी ‘अनामिका कापल्याचा’ दावा फेटाळत मानहानीच्या दाव्याचा जो इशारा दिला आहे, त्याला दमानिया यांनी चोख प्रत्युत्तर दिले. “तुम्हाला हवे तितके मानहानीचे खटले दाखल करा, आम्हाला त्याची फिकीर नाही,” असे आव्हान देत त्यांनी सुषमा अंधारे यांनी पुराव्यासह सादर केलेल्या छायाचित्रांचा दाखला दिला. महाराष्ट्रातील महिलांच्या सन्मानासाठी अशा प्रवृत्तींना पदावरून दूर करणे हे आपले कर्तव्यच होते, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
दमानिया यांनी आपल्या टीकेचा रोख केवळ चाकणकर यांच्यापुरता मर्यादित न ठेवता, सत्तेत असलेल्या इतर मंत्र्यांवरही वळवला. दीपक केसरकर यांनी “खरात जे बोलायचे ते खरे व्हायचे, म्हणून लोकांचा त्यावर विश्वास होता,” असे जे विधान केले, त्याचा दमानिया यांनी तीव्र निषेध केला. सुशिक्षित मंत्र्यांनी अशा प्रकारे भोंदूगिरीला खतपाणी घालणे हे दुर्दैवी असल्याचे त्या म्हणाल्या. इतकेच नव्हे तर चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, आणि सुनील तटकरे यांसारख्या नेत्यांचे खरातसोबत असलेले सातत्यपूर्ण संबंध हे अपघाती नसून जाणीवपूर्वक होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला. “आपला धर्म इतका कमकुवत नाही की अशा भोंदूबाबांच्या आहारी जावे, परंतु आपल्या नेत्यांना हे का समजत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना दमानिया यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मौनावर पुन्हा एकदा बोट ठेवले. तीन दिवस हे प्रकरण शिगेला पोहोचलेले असतानाही सुनेत्रा पवारांनी तातडीने कृती केली नाही, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. राजीनामा देतानाही चाकणकर यांच्या वागण्यात विनयशीलता नसून निव्वळ अहंकार दिसत होता, अशी टीका त्यांनी केली. “एका घटनात्मक पदावर असलेल्या महिलेची तुलना पांडुरंगाशी केली जाणे आणि त्यांनी लोकांच्या पदराने पाय पुसून घेणे, हे अत्यंत लाजीरवाणे आणि पदाच्या गरिमेला धक्का लावणारे आहे,” असे त्या म्हणाल्या. संपदा मुंडे यांच्यासारख्या पीडित महिलेवर जेव्हा शिंतोडे उडवले गेले, तेव्हाच चाकणकर यांचा राजीनामा घ्यायला हवा होता, असे मत त्यांनी व्यक्त केले.










