Sunetra Pawar : नाशिक येथील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या कथित निकटच्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अखेर आपल्या पदाचा त्याग करावा लागला आहे. शुक्रवारी (२० मार्च) रात्री उशिरा घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर चाकणकर यांनी आपला राजीनामा सादर केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानंतर हे पाऊल उचलण्यात आले असून, यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी पाचारण केले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खरात प्रकरणाची गंभीर दखल घेत, पदाची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी चाकणकर यांना तत्काळ राजीनामा देण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चाकणकर रात्री नऊच्या सुमारास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या निवासस्थानी पोहोचल्या. तिथेही सुनेत्रा पवार यांनी चौकशीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा देणे अनिवार्य असल्याचे त्यांना स्पष्ट केले. राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या चाकणकर यांनी अखेर आपला राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला, जो आता राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे. सध्याची परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतःहून पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.” या प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय व्हावा, यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले.
सुनेत्रा पवार यांनी पुढे असेही नमूद केले की, “ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होणे अत्यंत गरजेचे आहे. याच दृष्टिकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत आहे.” महिला आयोगासारख्या महत्त्वाच्या घटनात्मक संस्थेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी सरकारने ही कठोर भूमिका घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या राजीनाम्यानंतर आता अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीला किती वेग येतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे.
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) March 21, 2026
सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी त्यांचा…
‘नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा त्याग’; अशोक खरात प्रकरणावर रुपाली चाकणकर यांनी मांडली आपली भूमिका
नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावरून निर्माण झालेल्या राजकीय गदारोळानंतर, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या राजीनाम्यामागचे अधिकृत कारण स्पष्ट केले आहे. शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “सध्या विविध माध्यमांतून माझ्यावर होत असलेल्या आरोपांची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी, या हेतूने मी नैतिक जबाबदारी स्वीकारून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी नमूद केले. या संदर्भात योग्य तो निर्णय उपमुख्यमंत्री घेतील, असे सांगतानाच आपण लवकरच या प्रकरणावर आपली सविस्तर भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या औपचारिक राजीनामा पत्रात नमूद केले की, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पत्रात त्यांनी ‘वैयक्तिक कारणास्तव’ स्वेच्छेने या पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. “आजवर माझ्यावर विश्वास दाखवून मला जे सहकार्य लाभले, त्याबद्दल मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही असेच सहकार्य लाभेल, अशी मला खात्री आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या पत्राचा समारोप केला आहे.
भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या संबंधांवर स्पष्टीकरण देताना चाकणकर यांनी सांगितले की, खरात याच्या ट्रस्टवरील त्यांचा कार्यभार ८ ऑगस्ट २०२५ रोजीच संपुष्टात आला आहे. खरात पती-पत्नीला त्यांच्या कुटुंबाने केवळ आध्यात्मिक गुरू मानले होते, मात्र त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काळ्या कृत्यांची आपल्याला पुसटशीही कल्पना नव्हती. “जेव्हा या घटनेचा उलगडा झाला, तेव्हा मलाही मोठा धक्का बसला.










