Home / महाराष्ट्र / Chhagan Bhujbal on Ashok Kharat : “अशोक खरातकडे मोठी मंडळी येत होती…” – छगन भुजबळ यांचा दावा; रुपाली चाकणकरांन संदर्भात सूचक विधान

Chhagan Bhujbal on Ashok Kharat : “अशोक खरातकडे मोठी मंडळी येत होती…” – छगन भुजबळ यांचा दावा; रुपाली चाकणकरांन संदर्भात सूचक विधान

Chhagan Bhujbal on Ashok Kharat : सिन्नर तालुक्यातील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी अशोक खरात याच्यावर बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर...

By: Team Navakal
Chhagan Bhujbal on Ashok Kharat
Social + WhatsApp CTA

Chhagan Bhujbal on Ashok Kharat : सिन्नर तालुक्यातील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी अशोक खरात याच्यावर बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचल्याने आणि त्यांचे खरातसोबतचे व्हिडिओ समोर आल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. “अंधश्रद्धेपासून प्रत्येकाने दूर राहिले पाहिजे आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी अशा ठिकाणी जाताना काही मर्यादा व बंधने पाळली पाहिजेत,” असा सल्ला भुजबळ यांनी दिला आहे.

छगन भुजबळ यांनी अशोक खरात याच्या संदर्भात बोलताना स्पष्ट केले की, त्यांना या व्यक्तीबद्दल फारशी माहिती नव्हती. “माझे काही निकटवर्तीय देखील मला खरातकडे जाण्याचा आग्रह धरत होते, परंतु मी तिथे गेलो नाही. समाजात काही चांगले साधू-संत उत्तम कार्य करत आहेत, मात्र अघोरी प्रथा किंवा भोंदूगिरीकडे वळणे चुकीचे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. खरातकडे अनेक बड्या प्रस्थांची ये-जा होती, हे मान्य करतानाच त्यांनी रुपाली चाकणकर यांची पाठराखण करण्याचाही प्रयत्न केला. “चाकणकर या मुळच्या पुण्याच्या आहेत, त्यांना कदाचित खरातच्या पार्श्वभूमीबद्दल कल्पना नसावी. कोणाच्यातरी सांगण्यावरून किंवा ओळखीने त्या तिथे गेल्या असतील आणि वारंवार भेटीमुळेच त्यांना विश्वस्त केले असावे,” असे निरीक्षण भुजबळ यांनी नोंदवले.

रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य करताना भुजबळ म्हणाले की, महिला आयोग हे एक घटनात्मक पद आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सविस्तर चर्चा करूनच त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, चाकणकर यांच्याकडील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महिला प्रदेशाध्यक्ष पदाबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार योग्य वेळी घेतील. कोणत्याही पदावरून हटवण्यापूर्वी संपूर्ण चौकशी होणे आवश्यक असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अशोक खरात सध्या २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यावर बोलताना भुजबळ यांनी विश्वास व्यक्त केला की, ज्यांच्यावर खरोखर अन्याय झाला आहे, त्या पीडित महिला आता न घाबरता पुढे येतील. नियुक्त केलेले पोलीस अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या