Asha Bhosle : आपल्या चिरतरुण आवाजाने जगभरातील सिनेसंगीतप्रेमींना 80 हून अधिक वर्षे सुरेल मोहिनी घालणार्या ज्येष्ठ पार्श्वगायिक आशा भोसले यांचे आज वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. छातीत संसर्ग झाल्याने काल रात्री उशिरा त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक अवयव निकामी झाल्याने आज त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण संगीतसृष्टी व सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. एका युगाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे. उद्या त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. लता मंगेशकर यांचे निधन 6 फेब्रुवारी 2022 या दिवशी झाले. आज दुसरा तारा निखळला.
आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. उद्या सकाळी 11 ते 2 या वेळेत लोअर परळ येथील कासा ग्रांड या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
सांगलीतील नाट्य अभिनेते आणि शास्त्रीय गायक पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या घराण्याने भारतीय सिनेसंगीताला लता, आशा, मीना, उषा आणि हृदयनाथ मंगेशकर ही पाच अनमोल रत्ने दिली. लता मंगेशकर व आशा भोसले या दोघींनाही अलौकिक, अद्भूत आवाजाची जन्मजात देणगी मिळाली. त्यांना गायनाचा वारसा घरातूनच मिळाला. आशा यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीत झाला. त्या 9 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांनी बहीण लता मंगेशकर यांच्यासोबत कुटुंबाला आधार देण्यासाठी गायनाला सुरुवात केली. तेव्हापासून त्यांचा सूर कधी थांबलाच नाही. 1943 साली आलेल्या ‘माझा बाळ’ या मराठी चित्रपटासाठी आशा यांनी ‘चला चला नव बाला’ हे पहिले गाणे गायले होते. तर 1948 साली ‘चुनरिया’ या चित्रपटात त्यांनी ‘सावन आया…’ हे पहिले हिंदी गाणे गायले. त्यानंतर 1949 मधील ‘रात की रानी’ या चित्रपटात त्यांनी पहिले सोलो गाणे गायले. 1953 साली ‘परिणीता’ या चित्रपटातील गाण्यांनंतर त्यांना खरी ओळख मिळू लागली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. आशा यांच्या कारकिर्दीत ओ. पी. नय्यर यांचा वाटा सर्वाधिक राहिला. त्यांनी तब्बल 53 चित्रपटांत आशा यांना गाण्याची सधी दिली.
आशा यांनी आपल्या कारकिर्दीत 12,000 गाणी गायली. ही गाणी 20 वेगवेगळ्या भाषांतील आहेत. त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. 80 वर्षांच्या काळात सिनेसृष्टी बदलली. संगीत बदलले. संगीतकार बदलले. सिनेमाच्या नायक-नायिका बदलल्या. पण आशा यांचा आवाज कधीच कालबाह्य, जुना झाला नाही. तो ताजाच राहिला. वैजयंतीमाला, पद्मिनीपासून माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकरपर्यंत सगळ्यांना आशा ताईंनी आवाज दिला. ओ. पी. नय्यरपासून ए. आर. रहेमानपर्यंत संगीतकारांची वेगवेगळ्या प्रकारची गाणी त्यांनी लिलया गायली. या काळात क्वचितच एखादा संगीतकार असावा, ज्याच्यासाठी आशा यांनी काम केले नसेल. हिंदीत ‘मेरा कुछ सामान…’पासून ‘मोनिका ओ माय डार्लिंग…’ आणि मराठीत ‘केव्हा तरी पहाटे…’ पासून ‘बुगडी माझी सांडली ग…’पर्यंत आशा यांच्या गायनाची रेंज अफाट आहे. उडती, खट्याळ, बोल्ड, मधाळ, पाश्चात्य धाटणीची, कॅब्रे गाणी त्यांनी गायली. (त्यातून त्यांनी दम मारो दमसारखे गाणेही गायले) तेवढ्याच सहजतेने कव्वाली, भजन असो वा भांगडा, नाट्यगीत, भावगीतेही गायली. इतकी वैविध्यपूर्ण गाणी गाणारी दुसरी गायिका नसेल. त्यांच्या गंभीर गीतांची यादी केली तर तीही खूप मोठी होईल. मराठी भावगीतांच्या बाबतीत तर आशा भोसले यांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय म्हणावी लागेल. मराठी भावगीतात लता-पी सावळाराम-वसंत प्रभू ही त्रयी रसिकांना नवनवीन नजराणे पेश करत असताना आशा-गदिमा-सुधीर फडके ही दुसरी त्रयी मनोहारी शब्द-स्वर व सुरांचे अनोखे भावविश्व उभे करत होती. ‘तुला पाहते रे तुला पाहते, जरी आंधळी मी तुला पाहते…’, ‘विकत घेतला श्याम..’ , ‘का रे दुरावा का रे अबोला…’, ‘फिरूनी नवी जन्मेन मी…’, ‘तुझ्या माझ्या संसाराला…’, ‘फिटे अंधाराचे जाळे…’ यासारख्या गाण्यांतून त्यांच्या गायकीचे सर्व रस दिसतात.
आशा आणि लता मंगेशकर या दोघींची कारकीर्द समांतरपणे चालत राहिली. त्यामुळे त्यांची तुलना कायम होत राहिली. लता आणि आशा यांच्यात सर्वोत्कृष्ट गायिका कोण हा प्रश्न उपस्थित केला गेला. त्यांच्यातील छुप्या स्पर्धेचीही कायम चर्चा होत राहिली. खरे तर दोघी आपापल्या साम्राज्याच्या सम्राज्ञी होत्या. आपल्यात संघर्ष आहे, असे दोघींनी कधीच मान्य केले नाही. हा संघर्ष कधीच उघड झाला नाही. तो छुपाच राहिला. (त्यांच्या संघर्षावर ‘साज’ नावाचा हिंदी चित्रपट आला होता.) याबाबत विचारले असता आशा म्हणाल्या की, एका झाडाच्या छायेत दुसरे झाड रुजत नाही. त्यामुळे एका झाडाने वेगळे व्हायला हवे. त्याप्रमाणे मी वेगळी झाले. आमच्या नात्यात संघर्ष कधीच नव्हता. पण तो गाण्यात होता. संघर्ष लोकांनी निर्माण केला. आशा चांगली की लता चांगली, हे लोक तराजूत तोलायचे. दीदीने तिच्या शैलीला साजेशी शांत, संस्कारी, निर्मळ गाणी गायली. मी दुसरे टोक घेऊन गात राहिले. मी मला साजेशी अवखळ गाणी गायली. मी कुठले गाणे गायचे, याचे बंधन ठेवले नाही. आम्ही दोघांनी एके काळी राज्य केले.
आशा यांचे खासगी आयुष्य वादळी राहिले आहे. 16 वर्षांच्या असताना मोठी बहीण लता यांचे 31 वर्षांचे सेक्रेटरी गणपतराव भोसले यांच्यासोबत त्यांनी पळून जाऊन लग्न केले. गणपतराव वयाने त्यांच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठे होते. मंगेशकर कुटुंबाला त्यांचा हा निर्णय आवडला नाही. त्यांनी आशा यांच्याशी बराच काळ बोलणे बंद केले होते. पुढे हा निर्णय आशा यांच्यासाठीही आनंदापेक्षा जास्त दुःख घेऊन आला. लग्नानंतर त्यांना पती आणि सासरच्यांकडून चांगली वागणूक मिळाली नाही. कटुता वाढत गेली. गणपतराव यांनी त्यांना घरातून काढून टाकले. त्यावेळी आशा तिसर्या मुलाची आई होणार होत्या. नाईलाजाने त्यांना आपल्या माहेरी परतावे लागले. 1960 साली आशा आपल्या पहिल्या पतीपासून विभक्त झाल्या. त्यानंतर आशा भोसले यांनी संगीतकार आर. डी. बर्मन यांच्याशी प्रेमविवाह केला. ‘तिसरी मंझिल’ (1966) नंतर एकत्र काम करत असताना झालेली त्यांची मैत्री हळूहळू प्रेमात रुपांतरित झाली. मात्र आशा भोसले यांनी आपले भोसले आडनाव कायम ठेवले. 1994 साली बर्मन यांचे निधन झाले.
आशा यांनी वैयक्तिक जीवनात अनेक दुःख पचवली. त्यांचा मोठा मुलगा हेमंत भोसले याने सुरुवातीला पायलट म्हणून काम केले. नंतर त्यांनी संगीत क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी काही अविस्मरणीय गाणीही दिली. मात्र 2015 मध्ये कर्करोगाने त्यांचे निधन झाले. आशा यांची मुलगी वर्षा भोसले, एक प्रसिद्ध स्तंभलेखिका होती. पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी 55 व्या वर्षी गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांचा सर्वात धाकटा मुलगा आनंद भोसले हे आईचा व्यवसाय आणि करिअरची जबाबदारी सांभाळतात.
या सगळ्या दुःखद घटनांना आशा धिरोदात्तपणे सामोर्या गेल्या. गायन क्षेत्रातच नव्हे तर हॉटेल व्यवसायातही त्यांनी नाव कमावले. त्यांनी दुबईत आशा नावाने रेस्टॉरंट सुरू केले होते. वयाची नवद्दी उलटली तरी त्यांच्या चेहर्यावरील हास्य कायम होते. त्यांच्या आवाजातील तरुणपणा जगण्यातही उतरला होता. आपल्या चिरतरुणपणाचे रहस्य काय असे विचारल्यावर त्या एवढेच म्हणत की, वय वाढले तरीही मी मनाने तरुण आहे. 90 व्या वर्षीही उभी आहे, गाते आहे. पण याबाबत मी इतकेच म्हणेन की देव आपल्याकडून हे सगळे काही करून घेतो.
आशा भोसले यांना मिळालेले पुरस्कार
प 1997 मध्ये गानसाम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार.
प 2000 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार
प 2008 रोजी पद्मविभूषण पुरस्कार
प 2011 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
प 2020 महाराष्ट्र भूषण.
प सात वेळा फिल्मफेअर पुरस्कार.
प दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसलेजी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला.
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, आशाताईंनी आपल्या मधुर आवाजाने एक वेगळी ओळख निर्माण केली नाही, तर भारतीय संगीतसृष्टीला समृद्ध करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले. त्यांच्या सुमधुर गीतांनी पिढ्यान्पिढ्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. संगीताच्या प्रत्येक प्रकारात स्वतःला सहज जुळवून घेण्याची त्यांची अद्वितीय क्षमता विलक्षण होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भावना व्यक्त केल्या आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा आशा भोसले यांचे निधन झाले आहे. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी संगीताची सेवा केली. आशाताईंचे व्यक्तीमत्व जिंदादिल होते. आशाताईंची शंभरी करण्याची संधी काळाने दिली नाही.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आशा भोसले यांनी भारतीय संगिताला जगात पोहोचवले. आशाताईंनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली. त्यांचे आणि माझे जवळचे संबंध होते. माझ्या 61 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आल्या होत्या. गीत म्हणून त्यांनी मला आशीर्वाद दिले.
उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज आज शांत झाला. त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला. त्या एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. लतादीदी यांच्यानंतर त्या संगीत क्षेत्रातील एका महान पर्वाच्या स्तंभाप्रमाणे उभ्या होत्या.
ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, आशाताईंच्या रूपाने भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला आहे. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतविश्वासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे.
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर म्हणाले की, गाणे असो वा साधा संवाद, आशाताईंना ऐकणे नेहमीच जादुई असते. त्यांची टायमिंगची जाण अप्रतिम आहे आणि विनोदबुद्धीही विलक्षण आहे. आशाताई, तुम्ही जिथे जाल तिथे नेहमी आनंद पसरवत राहा.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, आशा भोसले यांची कला त्यांच्या आवाजातून आपल्या सर्वांच्या हृदयात सदैव अमर राहील. या दुःखद प्रसंगी, त्यांच्या शोकाकुल कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती माझ्या संवेदना आहेत.
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, एक प्रतिष्ठित गायिका म्हणून आपल्या उज्ज्वल कारकिर्दीतून आशा भोसले यांनी भारतीय संगीताच्या नव्या युगाची सुरुवात केली. आपल्या मधुर आणि सदाबहार आवाजाने त्यांनी अनेक दशकांपासून भारतीय संगीत समृद्ध केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देशाने एक महान स्वरसम्राज्ञी गमावली आहे. आशाताई गेल्यामुळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या प्रत्येकाला कोणीतरी आपल्या परिवाराचा सदस्य गमावल्याचे दुःख आज होत आहे.










