Home / महाराष्ट्र / Watermelon Death Case : डोकाडिया कुटुंबाचा करुण अंत; साडेपाच तासांचा विलंब ठरला जीवघेणा?

Watermelon Death Case : डोकाडिया कुटुंबाचा करुण अंत; साडेपाच तासांचा विलंब ठरला जीवघेणा?

Watermelon Death Case : पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण महानगरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासात...

By: Team Navakal
Watermelon Death Case :
Social + WhatsApp CTA

Watermelon Death Case : पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण महानगरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासात आता धक्कादायक तथ्ये समोर येत असून, वैद्यकीय उपचार मिळण्यास झालेला सुमारे साडेपाच तासांचा विलंब हा मृत्यूचे मुख्य कारण ठरल्याची शक्यता प्राथमिक वैद्यकीय चर्चेतून वर्तवण्यात येत आहे.

विलंब आणि ‘गोल्डन अवर’ची हानी-
मिळालेल्या माहितीनुसार, जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यावर कुटुंबातील सदस्यांना पोटदुखी, उलट्या आणि तीव्र अतिसाराचा त्रास सुरू झाला होता. सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडून घेतलेल्या औषधांमुळे काही काळ आराम मिळाला; मात्र थोड्याच वेळात प्रकृती पुन्हा बिघडली. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्णांना तातडीने मोठ्या रुग्णालयात हलवणे आवश्यक होते. परंतु, कुटुंबाने घरीच राहण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘गोल्डन अवर’ हातातून निसटला. अखेर प्रकृती चिंताजनक झाल्यावर त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तोपर्यंत शरीरातील विषबाधेने गंभीर स्वरूप धारण केले होते.

अन्नामध्ये ‘मॉर्फिन’चा संशय?
शवविच्छेदनानंतर प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार अत्यंत तीव्र स्वरूपाच्या विषबाधेचा (Acute Poisoning) असल्याचे स्पष्ट होत आहे. तपासादरम्यान पोलिसांना अन्नामध्ये ‘मॉर्फिन’सारख्या एखाद्या मादक किंवा विषारी द्रव्याचा अंश असण्याचा दाट संशय आहे. नेमकी विषबाधा कलिंगडामुळे झाली की अन्य कोणत्या खाद्यपदार्थामुळे, याचा शोध आता अन्न व औषध प्रशासन (FDA) घेत आहे. यासंदर्भातील अंतिम निष्कर्ष प्रयोगशाळेतील चाचण्यांनंतरच स्पष्ट होईल.

पोलीस तपासाची दिशा-
जे.जे. मार्ग पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. याप्रकरणी सध्या ‘अपघाती मृत्यू’ (ADR) म्हणून नोंद करण्यात आली असून, आतापर्यंत डझनभर व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “विषशास्त्र अहवाल” (Toxicology Report) आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. जर या घटनेत कोणाचा निष्काळजीपणा किंवा गुन्हेगारी हेतू आढळला, तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या