Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीच्या रुपाने अवघ्या महिन्याभरात केंद्र सरकारसमोर मोठे आव्हान उभे करणारा अभिजित दीपके उद्या अमेरिकेहून दिल्ली विमानतळावर सकाळी 8 वाजता दाखल होणार आहे. विमानतळावरून तो थेट पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यावर जाऊन जंतरमंतर येथे आंदोलन करण्याची परवानगी मागणार आहे. नीट यूजी आणि सीबीएसई परीक्षांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी पार्टीतर्फे हे पहिले आंदोलन करण्यात येणार आहे. दीपकेला जेवढ्या प्रचंड प्रमाणात इंटरनेट आणि सोशल मीडियावर लोकांचा प्रतिसाद दिला आहे ते पाहता उद्या दिल्लीत हजारो समर्थक रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस दीपकेला विमानतळावरच अटक करण्याची शक्यता आहे.
सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान देशातील बेरोजगार युवकांना झुरळाची उपमा दिली. सरन्यायाधीशांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यावर उपरोधिक टीका करण्यासाठी अभिजित दीपकेने सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली. तेव्हा दीपके हा शिक्षणासाठी अमेरिकेत होता. बघता बघता कॉकरोच जनता पार्टीचे लोण एखाद्या वणव्यासारखे पसरले. अवघ्या दोन दिवसांत दीपकेच्या फोलोअरची संख्या काही लाखांच्या पार गेली. सुमारे महिन्याभरात ही दोन कोटींवर जाऊन पोहोचली आणि त्यानंतर सोशल मीडियावर जन्मलेल्या या आभासी पक्षाला प्रत्यक्ष जमिनीवर उतरवण्याचा निर्णय अभिजितने घेतला. युवकांचा पक्ष असल्याने सर्वप्रथम नीट आणि सीबीएसई परीक्षांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांचा मुद्दा उचलून धरत अभिजितने उद्या 6 जून रोजी दिल्लीत आंदोलनाची हाक दिली. तेव्हापासून कॉकरोच जनता पार्टीकडे गांभीर्याने पाहिले जाऊ लागले आहे. उद्याचे आंदोलन या पक्षाची भावी वाटचालीची दिशा ठरवणारे आहे.
आंदोलनाच्या एक दिवस आधी म्हणजे आज अभिजितने सोशल मीडियावर पुन्हा एक व्हिडिओ जारी करून अत्यंत सावध भूमिका घेतली. कृपा करून उद्या कोणीही दिल्ली विमानतळावर येऊ नका. मी विमानतळावरून थेट पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जाईन.तिथेच तुम्ही सर्वजण या. आपण पोलिसांकडून रितसर परवानगी घेऊ आणि नंतर जंतर मंतरवर जाऊन शांततापूर्ण निदर्शने करू. आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये. सुरक्षा यंत्रणेवरही ताण येता कामा नये. आपल्याकडून कधी चूक होते याकडे सरकारचे बारकाईने लक्ष असेल. आपण त्यांना मुळीच संधी द्यायची नाही, असे अभिजित दीपके याने नव्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. दरम्यान दीपकेचे आईवडील सुरक्षेसाठी त्यांचे राहते घर सोडून अज्ञातस्थळी गेले आहेत. उद्याच्या आंदोलनात माझ्याशिवाय मंचावर इतर कुणीही असणार नाही असे अभिजीतने सांगितले असले तरी त्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्यासारखी अनेक दिग्गज उद्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. शिक्षणमंत्रीधर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी स्वीकारावी ही आमची एकच मागणी आहे. आम्ही कायदा न तोडता शांततेत आंदोलन करणार आहोत, असे दीपकेम्हणाला आहे.
जनहित याचिकेवर
तातडीची सुनावणी नाही
उद्याच्या आंदोलनाच्या विरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. सेव्ह इंडिया फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने ही जनहित याचिका दाखल केली होती. आंदोलनाच्या आयोजकांना प्रतिबंधात्मक आदेश देणे आणि संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला आदेश देणे अशा मागण्या याचिकेद्वारे करण्यात आल्या होत्या.
आंदोलन इंटरनेटपुरते नको
सार्थकची सीजेपीला सूचना
सीबीएसईच्या परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकार उघडकीस आणणारा विद्यार्थी सार्थक सिद्धांत याने सीजेपीचा संस्थापक अभिजित दीपके याला महत्त्वाची सूचना केली आहे. हे आंदोलन केवळ इंटरनेटवर प्रसिद्धी मिळवण्यापुरते असू नये. त्यातून काहीतरी साध्य झाले पाहिजे आणि आंदोलन रास्त मुद्यांवर झाले पाहिजे, अशी सूचना सार्थकने दीपकेला केली आहे.
सीजेपीच्या प्रेससाठी
मनोज झा यांनी दिले पत्र
कॉकरोच जनता पार्टी प्रवक्त्यांची 3 जून रोजी संसदेच्या कॉन्स्टिट्युशनल क्लबमध्ये पत्रकार परिषद झाली होती. ज्या पक्षाची अद्याप रितसर नोंदणी झालेली नाही त्या पक्षाला कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये पत्रकार परिषद घेण्याची परवानगी कशी काय मिळाली, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता. राष्ट्रीय जनता दलाचे नेते खासदार मनोज झा यांनी आज त्याबद्दल स्पष्टीकरण दिले. सीजेपीला पत्रकार परिषदेसाठी परवानगी द्यावी असे मी माझ्या सहीने विनंती पत्र दिले होते, असे झा यांनी सांगितले. त्याचवेळी आपण सीजेपीचे समर्थन करत नाही, असेही झा यांनी स्पष्ट केले.










