CJP Jantar Mantar Protest: नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे ६ जून रोजी होणाऱ्या मोठ्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) प्रमुख अभिजीत दिपके यांनी एक महत्त्वपूर्ण नियमावली प्रसिद्ध केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर त्यांनी आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ‘काय करावे आणि काय करू नये’ (Do’s and Don’ts) याची सविस्तर माहिती दिली आहे.
“आतापर्यंत आपण या विषयावर जी थट्टा करत होतो, त्याचे अधिकृत आंदोलनात रूपांतर करण्याची वेळ आली आहे,” असे दिपके यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. यापूर्वी तरुणांना दिल्ली विमानतळावर गोळा होण्याचे सांगण्यात आले होते, मात्र सर्वसामान्य प्रवाशांना अडचण येऊ नये म्हणून आता सर्वांना थेट ६ जून रोजी सकाळी ९ वाजता जंतरमंतर शेजारील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन येथे पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
CJP Jantar Mantar Protest: आंदोलन काळात ‘या’ नियमांचे पालन करणे आवश्यक (Do’s)
आंदोलन शांततेत आणि यशस्वी करण्यासाठी पक्षाने कार्यकर्त्यांना खालील गोष्टी आवर्जून करण्याचे आदेश दिले आहेत:
- राष्ट्रध्वज आणि पुस्तक: देशातील तरुणांना समान संधी आणि शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी हे आंदोलन असल्याने, प्रत्येकाने येताना आपल्यासोबत भारताचा तिरंगा आणि कोणतेही एक पुस्तक सोबत बाळगणे गरजेचे आहे.
- उन्हापासून स्वतःचा बचाव: दिल्लीमधील कडक उन्हाचा कडाका लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी सनस्क्रीन लावून आणि टोपी घालूनच मैदानात उतरावे. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून पाण्याची उत्तम सोय करावी. “आपल्याला उन्हाशी जुळवून घेत लढा द्यायचा आहे,” असे पक्षाने स्पष्ट केले आहे.
- व्हिडिओ रेकॉर्डिंग: आंदोलनाच्या संपूर्ण प्रक्रियेचे अत्यंत जबाबदार आणि शांततापूर्ण पद्धतीने चित्रीकरण (व्हिडिओ शूटिंग) करण्यात यावे. जर कुठेही गैरवर्तन किंवा संशयास्पद हालचाली दिसल्या, तर कायदा हातात न घेता लगेचच पोलिसांना कळवावे.
CJP Jantar Mantar Protest: आंदोलकांनी ‘या’ गोष्टी करणे टाळावे (Don’ts)
शिस्त बिघडू नये आणि आंदोलनाला चुकीचे वळण लागू नये म्हणून खालील गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे:
- उपाशी येणे आणि एकटे पडणे: “कोणतीही क्रांती यशस्वी करण्यासाठी आधी नाश्ता आवश्यक असतो,” असे सांगत सर्वांना घरून पोटभर जेवून किंवा नाश्ता करून येण्यास सांगितले आहे. तसेच सुरक्षा लक्षात घेता एकटे न येता मित्र किंवा कुटुंबीयांसोबत समुहाने यावे.
- पोलिसांशी गैरवर्तन व वाद: सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर दुरून फुले फेकू नका. त्याऐवजी त्यांच्याजवळ जाऊन आदरपूर्वक फुले द्या आणि देशाच्या भविष्यासाठी ड्युटी करत असल्याबद्दल त्यांचे आभार माना. तसेच, आंदोलनाच्या ठिकाणी मुद्दाम चिथावणी देणाऱ्या किंवा ट्रोल करणाऱ्या लोकांशी वाद घालण्यात वेळ वाया घालवू नका, कारण ते या कामात ‘व्यावसायिक’ असतात.
CJP Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मुख्य मागणी
देशातील शिक्षण व्यवस्थेत सध्या सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे हा संपूर्ण वाद पेटला आहे. एनईईटी (NEET) परीक्षेचा पेपर लीक होणे आणि सीबीएसई (CBSE) निकालांमधील सावळागोंधळ यामुळे कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे, असा थेट आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार धरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार सौरव दास, चित्रपट निर्माती विजेता दहिया आणि आशुतोष रांका यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी स्पष्ट केले की, हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यासाठी नसून देशातील सामान्य विद्यार्थी, तरुण आणि पालकांच्या न्याय्य हक्कासाठी आयोजित केले गेले आहे.










