What is E85 Fuel : देशातील इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्लीतील इंडियन ऑईलच्या केंद्रावर ‘E85’ या नवीन इंधनाचे अधिकृत लाँचिंग केले आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यादरम्यान 85% इथेनॉलवर धावणारी ‘टोयोटा इनोव्हा फ्लेक्स फ्युएल’ कार देखील प्रदर्शित करण्यात आली. भारताचे परकीय चलन वाचवणे, कच्च्या तेलाची आयात कमी करणे आणि देशातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणे, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.
What is E85 Fuel : नक्की काय आहे हे E85 इंधन?
हे नवीन इंधन सध्याच्या सामान्य पेट्रोलपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. याची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- इंधन मिश्रण: E85 हे एक उच्च दर्जाचे इथेनॉल मिश्रण असलेले इंधन आहे. यामध्ये 85% इथेनॉल आणि केवळ 15% पेट्रोल वापरले जाते.
- फ्लेक्स फ्युएल गाड्यांसाठी उपयुक्त: हे इंधन केवळ खास तंत्रज्ञानाने तयार केलेल्या ‘फ्लेक्स फ्युएल’ गाड्यांसाठीच वापरता येणार आहे. मारुती सुझुकी आणि हिरो मोटोकॉर्प सारख्या कंपन्यांनी आधीच अशी वाहने बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे.
- E20 पेक्षा वेगळे: अनेक ग्राहकांचा असा गैरसमज होऊ शकतो की हे इंधन सध्याच्या गाड्यांमध्ये चालेल. मात्र, मंत्र्यांनी स्पष्ट केले की, सध्या बाजारात असणाऱ्या E20 (20% इथेनॉल) गाड्या पूर्वीप्रमाणेच चालत राहतील. सामान्य वाहनचालकांची गल्लत होऊ नये म्हणून E85 मिळणाऱ्या पंपांवर स्पष्ट आणि मोठे फलक लावले जातील.
What is E85 Fuel : खिशाला मिळणार मोठा दिलासा; २० रुपये स्वस्त
या नवीन इंधनामुळे पर्यावरणाला फायदा तर होईलच, पण सर्वसामान्यांची मोठी आर्थिक बचतही होणार आहे. हरदीप सिंग पुरी यांनी घोषणा केली की, E85 इंधनाचा दर सध्याच्या E20 पेट्रोलपेक्षा प्रतिलिटर तब्बल 20 रुपयांनी कमी असेल. त्यामुळे भविष्यात ही सुसंगत दुचाकी किंवा चारचाकी वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा प्रवासाचा खर्च कमालीचा कमी होणार आहे.
तसेच, सामान्य पेट्रोलच्या तुलनेत या इंधनामुळे घातक वायूंचे उत्सर्जन थेट 61% पर्यंत कमी होते. इथेनॉलचा ऑक्टन रेट जास्त असल्याने वाहनाचे इंजिन अधिक चांगल्या क्षमतेने काम करते आणि गाडीचा परफॉर्मन्स सुधारतो.
सुरुवातीला ‘या’ शहरांमध्ये मिळणार इंधन
E85 इंधनाचा पुरवठा टप्प्याटप्प्याने देशभरात वाढवला जाणार आहे:
- पहिली पायरी: आगामी काही आठवड्यांत दिल्ली एनसीआर, मुंबई, पुणे, नागपूर आणि बेंगळुरू या प्रमुख शहरांमध्ये 50 ते 100 विशेष पेट्रोल पंप सुरू केले जातील.
- भविष्यातील विस्तार: केंद्र सरकारचे नियोजन आहे की 2026 च्या शेवटपर्यंत हा आकडा 500 पंपांपर्यंत नेण्यात येईल आणि 2027 च्या अखेरीस देशभरात सुमारे 5,000 पंपांवर हे इंधन उपलब्ध करून दिले जाईल.
१० वर्षांत भारताने घडवला इतिहास
भारताचा इथेनॉल निर्मितीचा प्रवास थक्क करणारा आहे. 2014 मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण केवळ 1.53% इतकेच होते. सरकारने आधी 20% मिश्रणाचे लक्ष्य 2030 पर्यंत ठेवले होते, परंतु भारताने हे लक्ष्य निर्धारित वेळेच्या तब्बल 6 वर्षे आधीच पूर्ण केले आहे.
या इथेनॉल प्रकल्पामुळे देशाचे तब्बल 1.85 लाख कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे आणि सुमारे 32 लाख मेट्रिक टन कच्च्या तेलाची आयात कमी झाली आहे. येत्या काळात जसा फ्लेक्स फ्युएल गाड्यांचा वापर वाढेल, तसा भारताचा इंधन खर्च पूर्णपणे नियंत्रणात येईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा – CJP Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर आज ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे आंदोलन; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कार्यकर्त्यांना नियमावली










