Abhijeet Dipke Parents : ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे नेते अभिजित दिपके यांच्या दिल्लीतील आंदोलनात्मक सक्रियतेनंतर आता त्यांच्या आई बाबांची एक प्रतिक्रिया समाज माध्यमांवर जोरदार वायरल होत आहे. अभिजित दिपके यांच्या आई – बाबांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, आपल्या मुलाच्या या राजकीय प्रवासाला आणि सध्या सुरू असलेल्या आंदोलनाला आपला अजिबात पाठिंबा नसल्याचे अत्यंत स्पष्ट शब्दांत जाहीर केले आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबाचा कधीही राजकारणाशी सुतराम संबंध राहिला नसून, आपल्याला या क्षेत्राची कोणतीही आवड अथवा रस नसल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. आपल्या मुलाने उत्तम शिक्षण घेऊन ‘क्लास वन’ अधिकारी व्हावे आणि समाजमान्य मोठ्या पदावर काम करावे, अशी आमची प्रामाणिक इच्छा होती, परंतु तो या राजकीय चिखलात पडल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अभिजितच्या भूतकाळातील राजकीय सहभागाविषयी विचारले असता, त्यांच्या आईने जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, अभिजितने यापूर्वी ‘आम आदमी पक्षा’मध्ये (AAP) जवळपास दोन वर्षे सक्रिय काम केले होते. मात्र, त्या काळातही कुटुंबाने त्याच्या या भूमिकेला कडक विरोध केला होता. “हा आपला पिंड नाही, आपण सामान्य कुटुंबामधील आहोत, त्यामुळे तू या भानगडीत पडू नकोस,” असा सल्ला त्याला आई-वडिलांनी वारंवार दिला होता; मात्र त्याने पालकांच्या शब्दापेक्षा स्वतःच्या हट्टाला अधिक प्राधान्य दिले.
पुढे त्यांची आई सांगते अभिजितचा स्वभाव सुरुवातीपासूनच काहीसा एकलकोंडा राहिला आहे. त्याला लोकांमध्ये फारसे मिसळायला किंवा कोणाशी विनाकारण बोलायला आवडत नव्हते. तो स्वतः आणि त्याचा मोबाईल फोन एवढेच त्याचे मर्यादित विश्व होते. पालकांचा विरोध डावलून तो परदेशात गेला, त्याविषयी सांगताना आई म्हणाली, “मी त्याला आधीच बजावले होते की तू परदेशात जाऊ नकोस, आपल्याच देशात राहून काहीतरी चांगले काम कर. परंतु, तो आपल्या हट्टापायी परदेशात गेला.” मुलाच्या या सर्व घडामोडींना आपला काडीचाही पाठिंबा नसून, त्याने राजकारणाचा हा मार्ग पूर्णपणे सोडावा आणि एका सुशिक्षित तरुणाप्रमाणे सन्मार्गाला लागावे, हीच इच्छा असल्याचे अभिजित दिपके यांच्या आई बाबानी सांगितले.










