Home / महाराष्ट्र / Sanjay Raut : विरोधक निवडणुकांवर थेट बहिष्कार टाकणार?राज ठाकरेंच्या भेटीनंतर संजय राऊतांचा खळबळजनक खुलासा!

Sanjay Raut : विरोधक निवडणुकांवर थेट बहिष्कार टाकणार?राज ठाकरेंच्या भेटीनंतर संजय राऊतांचा खळबळजनक खुलासा!

Sanjay Raut : महाराष्ट्रात सध्या विधान परिषद निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. विधान परिषदेच्या एकूण १७ जागांपैकी ५...

By: Team Navakal
Sanjay Raut
Social + WhatsApp CTA

Sanjay Raut : महाराष्ट्रात सध्या विधान परिषद निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. विधान परिषदेच्या एकूण १७ जागांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या असून, या प्रक्रियेदरम्यान सत्ताधारी पक्षाने कमालीची रणनीती आखल्याचे दिसून आले. सत्ताधाऱ्यांनी केवळ आपल्या पक्षातील बंडखोर उमेदवारांनाच अर्ज मागे घेण्यास भाग पाडले नाही, तर विरोधी पक्षाच्या काही उमेदवारांनाही त्यांचे अर्ज मागे घेण्यास विवश केले. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि घोडेबाजार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील निवडणूक पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोन बड्या नेत्यांच्या अनपेक्षित भेटीमुळे आणि त्यात झालेल्या अत्यंत संवेदनशील चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राऊत-राज ठाकरे भेटीतील राजकीय गुपित उघड; बॅलेट पेपरचा मुद्दा ऐरणीवर-
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या भेटीतील सविस्तर तपशील जाहीर केला. सुरुवातीला त्यांनी या भेटीचे स्वरूप कौटुंबिक आणि अराजकीय असल्याचे सांगितले. “मी राज ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. राज ठाकरे यांच्याकडे साहित्य, कला, संस्कृती आणि जागतिक पर्यटनाचा उत्तम अभ्यास असून, त्यांच्याशी अशा विषयांवर संवाद साधणे नेहमीच सुखावह असते,” असे राऊत म्हणाले. मात्र, या गप्पांनंतर त्यांच्यात देशातील आणि राज्यातील निवडणूक पद्धतीवर अत्यंत गंभीर चर्चा झाली. राज ठाकरे यांनी या चर्चेदरम्यान स्पष्ट मत मांडले की, जोपर्यंत देशात मतदान पत्रिकेद्वारे (बॅलेट पेपर) निवडणुका घेण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत विरोधी पक्षांनी सर्व निवडणुकांवर पूर्णपणे बहिष्कार टाकायला हवा. राज ठाकरे यांनी ही भूमिका आधीही अनेकदा मांडली असून, आता ती प्रत्यक्ष कृतीत आणण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन त्यांनी राऊत यांच्याकडे केले.

उद्धव ठाकरेंचीही राज ठाकरेंच्या भूमिकेला संमती; देशव्यापी आंदोलनाचे संकेत-
राज ठाकरे यांचे हे विचार आपल्याला पूर्णपणे पटल्याचे संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींसमोर कबूल केले. ते पुढे म्हणाले की, “मी या भेटीनंतर तात्काळ आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका सविस्तरपणे समजावून सांगितली. उद्धव ठाकरे यांनीही या भूमिकेला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत, या विषयावर विरोधकांमध्ये सखोल चर्चा होऊन अंतिम निर्णय झाला पाहिजे, असे मत व्यक्त केले.” सध्या लोकशाहीचा संकोच होत असून लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार यांना पैशांच्या बळावर फोडले जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. त्यामुळे पारदर्शकता आणण्यासाठी जोपर्यंत ईव्हीएम (EVM) ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत सामूहिक बहिष्काराचा हा क्रांतिकारी विचार देशभरातील विरोधी पक्षांपर्यंत पोहोचवला जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या विधानानंतर आगामी काळात संपूर्ण देशातील विरोधी पक्ष एकत्रितपणे निवडणुकांवर बहिष्काराचे अस्त्र उपसणार का, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

सुधीर मुनगंटीवारांच्या भूमिकेवर राऊतांचा पलटवार
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेच्या निवडणुकाच पूर्णपणे बरखास्त करण्याची मागणी करत, या संदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्याचे सूतोवाच केले होते. “या अप्रत्यक्ष निवडणुकांमुळे नक्की कोणाचा फायदा होतो? कशासाठी हव्यात या निवडणुका?” असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. “मुनगंटीवार यांच्या स्वतःच्याच पक्षाने या निवडणुकीत पैशांचा प्रचंड गैरव्यवहार आणि घोडेबाजार केला आहे. सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर करून त्यांनी निवडणुकांचे पावित्र्य नष्ट केले आहे; त्यामुळेच तुम्हाला हे बोलण्याची वेळ आली आहे असा टोला राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या