Maruti Suzuki Price Hike: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कंपनीने मे २०२६ मध्ये केलेल्या घोषणेनुसार आपल्या सर्व गाड्यांच्या किमतीत वाढ केली आहे. कोणत्या मॉडेलची किंमत किती वाढणार हे आधी स्पष्ट झाले नव्हते, मात्र आता त्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. हे नवीन दर १४ जून २०२६ पासून देशभरात लागू करण्यात आले आहेत.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कार उत्पादनासाठी येणारा खर्च (इनपुट कॉस्ट) सतत वाढत आहे. याशिवाय बाजारातील वाढती महागाई आणि इतर आर्थिक दबावांमुळे किमती वाढवणे अपरिहार्य झाले होते. या अतिरिक्त खर्चाचा काही भार वाढीव किमतीच्या रूपाने ग्राहकांवर टाकणे कंपनीला भाग पडले आहे.
कोणती कार किती महागली? जाणून घ्या तपशील
मारुती सुझुकीच्या विविध मॉडेल्सवर झालेली ही दरवाढ खालीलप्रमाणे आहे:
- सर्वात कमी दरवाढ: मध्यमवर्गीय कुटुंबांची आवडती कार Maruti Wagon R आणि मारुती Eeco च्या किमतीत सर्वात कमी म्हणजेच ५,००० रुपयांची वाढ झाली आहे.
- सर्वात मोठी दरवाढ: कंपनीची नवीन इलेक्ट्रिक कार Maruti E Vitara च्या किमतीत सर्वाधिक म्हणजेच ३०,००० रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे.
- मारुतीचा कार पोर्टफोलिओ: मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेत हॅचबॅकपासून ते एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक कार्सची विक्री करते. यामध्ये प्रामुख्याने Maruti Alto K10, Celerio, S Presso, Swift, Dzire, Grand Vitara, Brezza, Ertiga, Invicto आणि Jimny या गाड्यांचा समावेश आहे.
टाटा, महिंद्रा आणि ह्युंडाईच्या गाड्याही झाल्या महाग
केवळ मारुती सुझुकीच नाही, तर भारतातील इतर मोठ्या कार कंपन्यांनीही उत्पादन खर्च वाढल्याचे सांगत आपल्या गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत:
- महिंद्रा अँड महिंद्रा: महिंद्राने ६ एप्रिल २०२६ पासून आपल्या सर्व एसयूव्ही (SUV) आणि व्यावसायिक वाहनांच्या किमतीत २.५ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. सर्व मॉडेल्सवर सरासरी १.६ टक्के दरवाढ झाली आहे.
- टाटा मोटर्स: टाटा मोटर्सने १ एप्रिल २०२६ पासून आपल्या आयसीई (ICE) पॅसेंजर वाहनांच्या श्रेणीमध्ये किमतीत वाढ लागू केली होती.
- इतर कंपन्या: ह्युंडाई (Hyundai), किया (Kia) यांसारख्या आघाडीच्या ब्रँड्सनीही वाढत्या इनपुट खर्चामुळे आपल्या गाड्या महाग केल्या आहेत.
त्यामुळे जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्हाला खिसा जास्त रिकामा करावा लागणार आहे.









