Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांनी अचानक बंडखोरी करत पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या तीन वर्षांत पक्षात दुसऱ्यांदा एवढी मोठी फूट पडल्याने ठाकरे गटाला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या या नाट्यमय राजकीय घडामोडींच्या म्हणजेच ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर काल शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन अत्यंत धुमश्चक्रीत पार पडला. ठाकरे गटाचा मुख्य सोहळा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये संपन्न झाला. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांवर आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर आज सकाळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बंडखोरांवर, विशेषतः खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर अत्यंत शेलक्या आणि आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरेंचा षण्मुखानंद सभागृहातून बंडखोरांवर थेट प्रहार-
काल पार पडलेल्या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर नेहमी होणाऱ्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले. “उद्धव ठाकरे नेहमी बंगल्यातच बसून असतात, ते जनतेत जात नाहीत किंवा कोणाला भेटत नाहीत,” अशी टीका करणाऱ्या बंडखोरांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे संतापून म्हणाले की, जर मी कोणाला भेटत नव्हतो, आदित्य ठाकरे फिरत नव्हते, तर मग तुम्ही सर्वजण निवडणुकीत निवडून कसे आलात? केवळ माझ्या नावावर आणि शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्यांनी आता कृतघ्नपणा करू नये, अशा शब्दांत त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर बंडखोरांना खडेबोल सुनावले होते.
“शेणातील किडा शेणात गेला” – संजय राऊतांची ओमराजे निंबाळकरांवर विखारी टीका-
कालच्या मेळाव्यात संजय राऊत यांचे भाषण झाले नव्हते, परंतु आज सकाळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सर्व प्रलंबित राग व्यक्त केला. खासदार ओमराजे निंबाळकर यांचा उल्लेख ‘भंपक माणूस’ असा करत राऊतांनी त्यांच्या भूतकाळातील भाषणांची आठवण करून दिली. राऊत म्हणाले की, ओमराजे स्वतः भाषणात सांगायचे की ते कधी ग्रामसेवक किंवा सरपंचही नव्हते, त्यांना राजकारणात आणून मोठे करण्याचे काम केवळ उद्धव ठाकरेंनी केले. “जर मी ठाकरेंची साथ सोडली, तर धाराशिवच्या जनतेने मला जोड्याने मारावे,” अशा आणाभाका घेणारे ओमराजे आज सत्तेच्या मोहापायी पळून गेले आहेत. धाराशिवच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयासाठी उद्धव ठाकरेंनी तब्बल ९४ सभा घेतल्या होत्या, याची जाणीव त्यांनी बंडखोरांना करून दिली. “ओमराजे गेले, आष्टीकर गेले, तर जाऊ द्यात. शेणातील किडा अखेर शेणातच गेला,” अशा अत्यंत तीव्र आणि घणाघाती शब्दांत राऊतांनी आपली नाराजी आणि संताप व्यक्त केला. या बंडखोरीमागे एका महिला दलालाचा हात असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
एकनाथ शिंदेंनाही सुनावले खडेबोल-
नेस्को सेंटरमधील मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेचाही संजय राऊतांनी समाचार घेतला. शिंदेंना लक्ष्य करताना राऊत म्हणाले की, काही लोक एकनाथ शिंदेंची तुलना महाराष्ट्राचे थोर नेते यशवंतराव चव्हाण यांच्याशी करण्याचा बालिश प्रयत्न करत आहेत. इतरांच्या विचारांच्या डायऱ्या घेऊन व्यासपीठावर येऊन प्रश्न विचारणाऱ्यांना त्यांची जागा लवकरच समजेल. राजकारणात सत्ता कधीही अमर नसते, हे स्पष्ट करताना त्यांनी ,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उदाहरण दिले. “एकेकाळी अजित पवारांकडेही प्रचंड राजकीय ताकद आणि सत्ता होती, परंतु आज ती राहिलेली नाही.









