Nothing Phone 4b India Launch: स्मार्टफोन जगतात आपल्या ट्रान्सपरंट डिझाईनसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘नथिंग’ (Nothing) कंपनीने भारतीय बाजारपेठेसाठी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीचे प्रमुख कार्ल पेई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर एका नवीन स्मार्टफोनचे टीझर शेअर केले आहे.
या टीझरच्या शेवटी एक ‘4b’ लिहिलेली पेन्स दाखवण्यात आली आहे, ज्यावरून कंपनी भारतात ‘Nothing Phone 4b’ हा नवा फोन लाँच करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
हा फोन कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त म्हणजेच एन्ट्री-लेव्हल स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर या आगामी स्मार्टफोनसाठी एक स्वतंत्र मायक्रोसाइट देखील लाईव्ह करण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन भारतात फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार हे आता निश्चित झाले आहे.
यावर्षी फ्लॅगशिप फोन नाही; मार्चमध्ये लाँच झाली होती ‘4a’ सिरीज
नथिंग कंपनीच्या धोरणाबाबत बोलायचे झाले तर, या वर्षाच्या सुरुवातीला कार्ल पेई यांनी एक मोठा खुलासा केला होता. कंपनी यावर्षी कोणताही नवीन प्रगत फिचर्स असलेला महागडा फ्लॅगशिप स्मार्टफोन बाजारात आणणार नाही. याऐवजी कंपनीने मध्यम श्रेणीतील ग्राहकांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.
याच रणनीतीचा भाग म्हणून कंपनीने 5 मार्च रोजी भारतात मध्यम श्रेणीतील ‘Nothing Phone 4a Pro’ आणि ‘Nothing Phone 4a’ लाँच केले होते. या दोन्ही फोन्सच्या ८GB रॅम आणि १२८GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेल्सची किंमत अनुक्रमे ३९,९९९ रुपये आणि ३१,९९९ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. आता या फोनच्या खाली नवीन ‘4b’ सिरीज आणून कंपनी कमी बजेटच्या बाजारपेठेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे.
नथिंग फोन 4b चे डिझाईन आणि लीक झालेली वैशिष्ट्ये
टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या डायग्रामवरून या आगामी फोनच्या डिझाईनबद्दल काही अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे:
- सिंगल रिअर कॅमेरा: सध्या बाजारात ड्युअल किंवा ट्रिपल कॅमेऱ्यांचा ट्रेंड असताना, नथिंगचा हा बजेट फोन पाठीमागे फक्त एकाच कॅमेरा युनिटसह बाजारात येऊ शकतो. किंमत कमी ठेवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचे समजते.
- पारदर्शक पॅनेल आणि स्क्रू डिझाईन: नथिंग कंपनीची ओळख असलेले ट्रान्सपरंट बॅक पॅनेल या फोनमध्येही पाहायला मिळेल. फोनच्या मागच्या बाजूला अंतर्गत सुटे भाग आणि काही स्क्रू उघडे दिसणारे सिग्नेचर डिझाईन यात असेल.
- फ्लॅट बॅक आणि राऊंड कॉर्नर्स: प्रीमियम श्रेणीतील नथिंग फोन 4a सिरीजप्रमाणेच या फोनला देखील सपाट पाठीमागचा भाग आणि गोलाकार कोपरे दिले जाण्याची शक्यता आहे.
CMF कडील प्रोजेक्ट्स आता नथिंगकडे हस्तांतरित; पुढील महिन्यात लाँचिंगची शक्यता
काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका अहवालानुसार, नथिंगची उप-कंपनी असलेल्या ‘सीएमएफ’ (CMF) ने आपले चालू स्मार्टफोन प्रोजेक्ट्स मुख्य नथिंग ब्रँडकडे हस्तांतरित केले आहेत. या बदलाबद्दल बोलताना सीएमएफने आधीच स्पष्ट केले आहे की, ते यावर्षी स्वतःचा कोणताही नवीन फोन बाजारात आणणार नाहीत, तसेच त्यांच्या ‘CMF Phone 2 Pro’ च्या पुढील मॉडेलचे लाँचिंग देखील पुढे ढकलण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर, सीएमएफच्या बजेट प्रोजेक्ट्स अंतर्गत विकसित केला गेलेला फोन आता ‘Nothing Phone 4b’ या नावाने पुढील महिन्यात भारतात लाँच होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आकर्षक पारदर्शक डिझाईन आणि कमी किंमत यामुळे हा फोन कमी बजेट असलेल्या ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
हे देखील वाचा – Kunal Shah WhatsApp Head: भारतीय उद्योजकाचा डंका! ‘CRED’ चे संस्थापक कुणाल शाह सांभाळणार व्हॉट्सअॅपची जागतिक धुरा










