Gold Price: सोन्याच्या किमतीत एकाच दिवसात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मागील सत्रात सोन्याने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा (Profit) बुक केल्यामुळे ही पडझड झाली, जी गेल्या काही वर्षांतील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण ठरली आहे.
रिपोर्टनुसार, न्यूयॉर्कमध्ये स्पॉट गोल्ड (Spot Gold) 4.9% नी घसरून 4,143 डॉलर प्रति औंसच्या एक आठवड्याच्या नीचांकी पातळीवर आले. ऑगस्ट 2020 नंतरची ही एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे. डिसेंबर डिलिव्हरीसाठी अमेरिकेतील सोन्याचे फ्युचर्स देखील 4.7% नी घसरून 4,155 डॉलरवर आले.
4,381.21 डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यानंतर ही घसरण झाली. आर्थिक अनिश्चितता, व्याजदर कपातीच्या आशा आणि मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणात केलेली खरेदी यामुळे या वर्षी सोन्याच्या किमतीत जवळपास 60% वाढ झाली होती.
घसरणीची प्रमुख कारणे
- सोन्याच्या किमतीतील या तीव्र घसरणीचे मुख्य कारण ‘प्रॉफिट बुकिंग’आहे. गेल्या आठवड्यात उच्चांकावर पोहोचल्यानंतर सोन्यातील अस्थिरता वाढल्यामुळे गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यास सुरुवात केली.
- डॉलर मजबूत: अमेरिकन डॉलर 0.4% नी मजबूत झाल्यामुळे, इतर चलनांचा वापर करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सोने महाग झाले, ज्यामुळे सोन्यावर अधिक दबाव आला.
- ‘सेफ-हेवन’ मागणी कमी: अमेरिका-चीन व्यापार वाटाघाटींमध्ये प्रगती होण्याच्या आशेमुळे सोन्याचा ‘सुरक्षितता’ म्हणून असलेले आकर्षण कमी झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील आठवड्यात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी ‘अत्यंत मजबूत व्यापार करार’ होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. या सकारात्मक भावनेमुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातून पैसे काढून बाजारात अधिक जोखीम असलेल्या गुंतवणुकीकडे वळवले.
- इतर धातूंमध्येही घसरण: चांदी 6.8% नी घसरून 48.89 डॉलर, प्लॅटिनम 5.4% नी घसरून 1,550.10 डॉलर आणि पॅलेडियम 5.1% नी घसरून 1,425.19 डॉलरवर आले.
गुंतवणूकदार आता शुक्रवारी येणाऱ्या अमेरिकेच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (CPI) आकडेवारीची वाट पाहत आहेत, जे फेडरल रिझर्व्हच्या पुढील आठवड्यातील व्याजदर निर्णयावर परिणाम करू शकते. अर्थतज्ज्ञांना 25 बेसिस पॉइंट्सच्या दर कपातीची अपेक्षा आहे, ज्यामुळे सोन्याला नंतर सावरण्यास मदत होऊ शकते.
हे देखील वाचा – Vote Chori Allegation: ‘वोट चोरी’ प्रकरण! मतदारांची नावे हटवण्यासाठी प्रत्येक अर्जामागे 80 रुपये, SIT चा मोठा खुलासा