Gold Mines in India: भारतातील नागरिकांचे सोन्याप्रती असलेले प्रेम सर्वश्रुत आहे, परंतु आता या आवडीला देशांतर्गत पातळीवर एक खूप मोठी मजबुती मिळणार आहे. आंध्र प्रदेश राज्यातून एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. राज्यातील कर्नूल जिल्ह्यात तब्बल 50 टन सोन्याच्या साठ्याचा शोध लागला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शोधामुळे आंध्र प्रदेश येत्या काही वर्षांत देशांतर्गत सोन्याचा सर्वात मोठा उत्पादक आणि पुरवठादार राज्य म्हणून उदयास येऊ शकते. या साठ्यामुळे केवळ देशातील सोन्याचे उत्पादनच वाढणार नाही, तर परदेशातून कराव्या लागणाऱ्या महागड्या सोने आयातीवरील भारताचे अवलंबित्वही मोठ्या प्रमाणात कमी होईल.
जोन्नागिरी बेल्टमध्ये खजिन्याचा शोध; आणखी ४ जागांची ओळख
आंध्र प्रदेशच्या खाण विभागाचे प्रधान सचिव मुकेश कुमार मीणा यांनी पत्रकार परिषदेत या मोठ्या यशाची अधिकृत घोषणा केली. खाणकाम आणि भविष्यातील नियोजनाबाबत महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
- सोन्याच्या खाणींसाठी नवीन जागा: खाण विभागाने केवळ जोन्नागिरीच नाही, तर राज्यात सोन्याच्या उत्खननासाठी आणखी 4 संभाव्य जागा शोधल्या आहेत. यामध्ये रामागिरी, जव्वकुला आणि चिगुरुकुंटा बिस्नाटम या ठिकाणांचा समावेश आहे.
- अवाढव्य क्षेत्रफळ: कर्नूलच्या जोन्नागिरी गावात सुमारे 10 वर्षांपूर्वीच खाणकामासाठी 1,500 एकर जमीन वाटप करण्यात आली होती. सुरुवातीला केवळ 500 एकर क्षेत्रात शोध घेतला असता 13 टन सोने मिळण्याचा अंदाज होता.
- मुख्यमंत्री करणार सुरुवात: आता उर्वरित 1,000 एकर जमिनीवरही नवीन शोधकार्य सुरू केले जाईल. हा संपूर्ण साठा मिळून एकूण 50 टन पार जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू याच महिन्याच्या शेवटी जोन्नागिरी गोल्ड माइनिंगच्या कामाची अधिकृत सुरुवात करणार आहेत.
८,००० कोटींपेक्षा जास्त किंमत; मात्र उत्खननाचे आव्हान मोठे
सध्याच्या सराफा बाजारातील समीकरणानुसार, जोन्नागिरी येथे सापडलेल्या या 50 टन सोन्याच्या साठ्याची अंदाजे किंमत सुमारे 7,500 कोटी ते 9,000 कोटी रुपयांच्या घरात आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीनुसार सोन्याच्या भावात बदल होत असल्यामुळे अंतिम मूल्यात थोडा फरक पडू शकतो.
दुसरीकडे, जमीन पोखरून सोने बाहेर काढण्याची ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि खर्चिक आहे:
- १ टन कचऱ्यातून १ ग्राम सोने: खाण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्याच्या काळात उत्खननादरम्यान 1 टन ढिगाऱ्याची (मलब्याची) प्रक्रिया केल्यानंतर केवळ 1 ग्रॅम शुद्ध सोने हाती येते. पूर्वी हे प्रमाण प्रति टन 3 ग्रॅम असायचे. जर हे प्रमाण 0.8 ग्रॅमपेक्षा कमी झाले तर खाणकाम करणे तोट्याचे ठरते.
- यामुळेच सरकारने पारदर्शक टेंडर काढून या कामाची धुरा खाजगी कंपन्यांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताची सोन्याची भूक आणि सद्यस्थिती
भारतात दरवर्षी सुमारे 800 टन सोन्याचा प्रचंड वापर होतो, परंतु त्या तुलनेत आपले देशांतर्गत उत्पादन नगण्य आहे. वर्ष 2000 मध्ये कर्नाटकमधील प्रसिद्ध ‘कोलार गोल्ड फील्ड्स’ (KGF) बंद झाल्यापासून भारताचे स्वतःचे उत्पादन अत्यंत खालावले आहे.
सध्याच्या घडीला कर्नाटकची सरकारी ‘हुट्टी गोल्ड माइन्स’ हीच देशातील एकमेव सक्रिय सोन्याची खदान आहे, जिथून वर्षाला केवळ 1.5 टन सोन्याचे उत्पादन होते. अशा परिस्थितीत आंध्र प्रदेशात लागलेला हा शोध भारताला सोन्याच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल.









