Inflation Rate India : भारतातील किरकोळ महागाई दर (Retail Inflation) सप्टेंबर 2025 मध्ये घसरून 1.54% पर्यंत खाली आला आहे. जून 2017 नंतरचा हा सर्वात नीचांक आहे. ऑगस्टमध्ये असलेला 2.07% महागाई दर कमी होण्याचे मुख्य कारण खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये झालेली मोठी आणि सातत्यपूर्ण घट हे आहे.
या घसरणीमध्ये प्रामुख्याने भाज्या, तेल, फळे, कडधान्ये, धान्ये, अंडी आणि इंधन यांच्या किमतींचा समावेश आहे.
खाद्यपदार्थ आणि ग्रामीण-शहरी क्षेत्रातील स्थिती
खाद्यपदार्थांमधील महागाई सलग चौथ्या महिन्यात नकारात्मक राहिली. ग्राहक खाद्य किंमत निर्देशांक (CFPI) वार्षिक आधारावर 2.28% ने घसरला.
ग्रामीण आणि शहरी दोन्ही क्षेत्रांमध्ये समान कल दिसून आला. ग्रामीण भागात महागाई 1.69% वरून 1.07% पर्यंत कमी झाली, तर शहरी भागात ती 2.47% वरून 2.04% पर्यंत घसरली आहे. ग्रामीण भागात खाद्य महागाई -2.17% आणि शहरी भागात -2.47% नोंदवली गेली.
गृहनिर्माण आणि शिक्षण क्षेत्रात वाढ
एकूण महागाई कमी झाली असली तरी, काही क्षेत्रांमध्ये किमती वाढल्या आहेत. गृहनिर्माण क्षेत्रातील महागाई ऑगस्टमध्ये 3.09% होती, ती वाढून 3.98% झाली. तर शिक्षण क्षेत्रातील महागाई थोडीशी कमी होऊन 3.60% वरून 3.44% वर आली आहे.
अर्थतज्ञांचे मत आणि RBI चे लक्ष्य
अर्थतज्ञांच्या मते, नाशवंत खाद्यपदार्थांच्या किमतीतील हंगामी सुधारणा, कडधान्यांमध्ये झालेली कपात आणि जागतिक ऊर्जा किमती स्थिर राहिल्यामुळे ही महागाई घसरली आहे.
RBI ने निश्चित केलेल्या 2% ते 6% या लक्ष्याच्या खाली महागाई दर आल्यामुळे, सेंट्रल बँक या घसरणीचा विचार भविष्यातील धोरणात्मक निर्णयांमध्ये करू शकते. वर्षाच्या अखेरीस व्याजदर कमी करण्याचा विचार RBI करू शकते, असे संकेत मिळत आहेत.
हे देखील वाचा – Donald Trump: ‘भारत-पाक दोन्ही देश…’; शहबाज शरीफ यांच्यासमोरच डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्त्वाचे विधान