New PAN card application rules 2026 : भारतातील करदात्यांसाठी आणि पॅन कार्ड धारकांसाठी 1 एप्रिल 2026 पासून अत्यंत महत्त्वाचे बदल लागू होत आहेत. केंद्र सरकारने प्राप्तिकर नियम 2026 अंतर्गत पॅन कार्ड अर्जाची प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहारांसाठी लागणाऱ्या पॅनची मर्यादा यामध्ये मोठी सुधारणा केली आहे. पारदर्शकता वाढवणे आणि करचोरी रोखणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
आता फक्त आधार कार्ड पुरेसे नाही!
सध्या अनेकजण केवळ आधार कार्डच्या जोरावर पॅन कार्ड मिळवतात. मात्र, 1 एप्रिल 2026 पासून हा नियम बदलणार आहे. नवीन नियमांनुसार, पॅन अर्जासोबत जन्मदिनांकाचा पुरावा म्हणून खालीलपैकी एक कागदपत्र जोडणे अनिवार्य असेल:
- जन्म दाखला (Birth Certificate)
- मतदार ओळखपत्र (Voter ID)
- दहावीचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
जर तुम्हाला केवळ आधार कार्ड वापरून पॅन काढायचे असेल, तर तुमच्याकडे 31 मार्च 2026 पर्यंतच वेळ आहे. त्यानंतर ही प्रक्रिया अधिक कडक केली जाईल.
आर्थिक व्यवहारांच्या मर्यादेत बदल
नवीन प्राप्तिकर कायद्यानुसार, पॅन कार्ड अनिवार्य असणाऱ्या व्यवहारांच्या मर्यादेतही काही सवलती आणि बदल करण्यात आले आहेत:
- रोख व्यवहार: वर्षाला 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम बँकेत भरल्यास किंवा काढल्यास पॅन अनिवार्य असेल.
- मालमत्ता खरेदी: आता 20 लाख रुपयांवरील मालमत्ता व्यवहारांसाठी पॅन लागेल (पूर्वी ही मर्यादा 10 लाख रुपये होती).
- वाहन खरेदी: 5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या गाड्यांच्या खरेदीसाठीच आता पॅनची गरज पडेल.
- हॉटेल बिल: हॉटेलमधील पेमेंटची मर्यादा वाढवून 1 लाख रुपये करण्यात आली आहे.
बदलांचे महत्त्व काय?
हे बदल सामान्य करदात्यांना दिलासा देण्यासाठी आणि मोठ्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आले आहेत. छोट्या व्यवहारांसाठी कागदपत्रांची कटकट कमी करण्यात आली आहे, तर मोठ्या व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता आणली आहे. बनावट पॅन कार्डचा वापर रोखण्यासाठी आणि कर प्रणाली अधिक सुटसुटीत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
जर तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढायचे असेल, तर शेवटच्या तारखेची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करणे फायदेशीर ठरेल.
हे देखील वाचा – Strait of Hormuz Crisis: समुद्रात इराणची ‘वसुली’ सुरू! हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी जहाजांकडे मागितले 18 कोटी रुपये










