NHAI New Toll Rules: राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १० एप्रिलपासून देशातील सर्व टोल नाक्यांवर रोख रकमेने टोल भरण्याची सुविधा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि डिजिटल करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, आता केवळ ‘फास्टॅग’ आणि ‘युपीआय’ (UPI) द्वारेच टोल स्वीकारला जाईल.
फास्टॅग नसेल तर खिशाला कात्री
ज्या वाहनांवर सक्रिय फास्टॅग नसेल, त्यांना टोल नाक्यावर युपीआयद्वारे पैसे भरण्याचा पर्याय दिला जाईल. मात्र, ही सुविधा महाग पडणार आहे. युपीआयने टोल भरल्यास सामान्य दरापेक्षा २५% अधिक शुल्क मोजावे लागेल. जर एखाद्या चालकाने फास्टॅग किंवा युपीआय या दोन्ही पर्यायांना नकार दिला, तर त्याला महामार्गावर प्रवेश नाकारला जाऊ शकतो. तसेच, ३ दिवसांत टोल न भरल्यास ही रक्कम दुप्पट होऊ शकते.
ओळखपत्रावर मिळणारी सवलत बंद
टोल नाक्यांवरील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे सरकारी ओळखपत्र दाखवून खाजगी वाहनांना मिळणारी अनधिकृत टोल सवलत आता बंद होणार आहे. यापुढे केवळ अधिकृतपणे पात्र असलेल्या आणि ‘सवलत श्रेणीतील फास्टॅग’ (Exempted FASTag) लावलेल्या वाहनांनाच टोलमधून माफी मिळेल. यामुळे नाक्यांवरील वादाचे प्रसंग कमी होतील आणि पारदर्शकता येईल, असा विश्वास प्रशासनाला आहे.
फास्टॅग ‘अॅन्युअल पास’ ठरणार फायदेशीर
वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी नॅशनल हायवे अथॉरिटीने ‘फास्टॅग अॅन्युअल पास’वर भर दिला आहे. खाजगी निम-व्यावसायिक वाहनांसाठी या पासची किंमत ३,०७५ रुपये आहे. यामध्ये १ वर्षाच्या कालावधीत किंवा २०० वेळा टोल ओलांडण्याची सुविधा मिळते. हा पास वैयक्तिक टोल भरण्यापेक्षा स्वस्त पडतो.
अॅन्युअल पाससाठी अर्ज कसा करावा?
शेतकरी किंवा नियमित प्रवासी ‘राजमार्ग यात्रा’ अॅप किंवा महामार्गाच्या अधिकृत संकेतस्थळावरून या पाससाठी अर्ज करू शकतात. आपल्या फास्टॅगशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि वाहनाचा नोंदणी क्रमांक वापरून युपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे पैसे भरता येतात. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर २४ तासांच्या आत हा पास सक्रिय होतो.
टोल नाक्यांवरील गर्दी कमी करणे आणि प्रवाशांचा वेळ वाचवणे हा या नवीन नियमावलीमागचा मुख्य उद्देश आहे.










