Niva Bupa Claim controversy: आरोग्य विम्याच्या 61 लाख रुपयांच्या कॅशलेस क्लेमवरून Niva Bupa ही विमा कंपनी सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. एका गुंतवणूक सल्लागाराने लिंक्डइनवर पोस्ट करून एका ल्युकेमिया (Myeloid Leukaemia) रुग्णाच्या क्लेमबद्दल माहिती दिली, ज्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली.
यानंतर कंपनीने त्वरित स्पष्टीकरण दिले आहे की हा क्लेम नाकारला नसून, त्यावर अजूनही विचार सुरू आहे.
वाद नेमका काय?
आरोग्य विमा आणि गुंतवणूक सल्लागार अविग्यान मित्रा यांनी लिंक्डइनवर केलेल्या पोस्टनुसार, मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले चंद्र कुमार जैन हे ल्युकेमियाशी लढत आहेत आणि त्यांना तातडीने बोन मॅरो ट्रान्सप्लांटची गरज आहे.
मित्रा यांच्या मते, जैन यांच्याकडे 2.40 कोटी रुपयांचे हेल्थ कव्हर (1 कोटी बेस पॉलिसी + 1.4 कोटी नो-क्लेम बोनस) असूनही, विमा कंपनीने अचानक 61 लाख रुपयांच्या बिलासाठी ‘कॅशलेस’ परवानगी देण्यास नकार दिला. कंपनीने ‘उत्तरदायित्व निश्चित केले जाऊ शकत नाही’ असे कारण दिल्याचे मित्रा यांनी म्हटले होते. त्यांनी या घटनेला ‘पद्धतशीर विश्वासघात’ (systemic betrayal) असे म्हटले.
त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली असून, अनेकजण विमा कंपनीवर टीका करत आहेत. त्यानंतर आता कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
कंपनीचे स्पष्टीकरण
एका गंभीर रुग्णाला विमा कंपनीने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करणाऱ्या व्हायरल पोस्टला उत्तर देताना, Niva Bupa चे मुख्य मार्केटिंग अधिकारी निमिश अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “हा रुग्ण 27 जून रोजी दाखल झाला होता आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी 25 लाख रुपयांची सुरुवातीची पूर्व-परवानगी देण्यात आली होती.” मात्र, उपचाराचा खर्च 70 लाख रुपयांपेक्षा जास्त झाला आहे, जो ‘असामान्य’ आहे, असे अग्रवाल म्हणाले.
रुग्णाला अद्याप डिस्चार्ज मिळालेला नसल्यामुळे कंपनीने अंतिम क्लेम मंजूर केला नाही किंवा नाकारलाही नाही. अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, आरोग्य विमा कंपन्या उपचाराचा खर्च योग्य आहे की नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी रुग्णालयांसोबत समन्वय साधतात. कंपनी या कुटुंबाला मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे कंपनीने स्पष्ट केले.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
इलेक्ट्रिक वाहन धारकांना मोठा दिलासा, पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर 8 नवीन EV चार्जिंग स्टेशन्स
अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; व्हिसाचे नियम बदलले, ‘या’ चुका महागात पडणार
Dcm Ajit Pawar: डीवायएसपींनी ओळखले नाही ; अजित पवार प्रचंड संतापले