UPI Transaction Limit: डिजिटल पेमेंट क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला आहे. NPCI (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने काही विशिष्ट श्रेणींसाठी UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) व्यवहारांची मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत (UPI Transaction Limit) वाढवली आहे.
15 सप्टेंबरपासून हा निर्णय लागू होणार असून, उच्च मूल्याच्या डिजिटल पेमेंटसाठी (Online Payments) असलेल्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
या व्यवहारांवर वाढली मर्यादा
NPCI च्या 28 ऑगस्ट रोजीच्या परिपत्रकानुसार, UPI आता कॅपिटल मार्केट्स किंवा इन्शुरन्ससारख्या मोठ्या व्यवहारांसाठी अधिक सोयीचे झाले आहे. यापूर्वी, अशा व्यवहारांची मर्यादा प्रति-व्यवहार 2 लाख रुपये होती. आता ही मर्यादा वाढली आहे.
नवीन प्रति-व्यवहार आणि 24 तासांची एकत्रित मर्यादा:
कॅपिटल मार्केट्स आणि विमा: पूर्वी प्रति-व्यवहार 2 लाख रुपयांची मर्यादा होती, जी आता वाढून 5 लाख रुपये झाली आहे. 24 तासांची एकत्रित मर्यादा 10 लाख रुपये असेल.
सरकारी ई-मार्केट प्लेस: पूर्वीची 1 लाख रुपयांची मर्यादा आता 5 लाख रुपये झाली आहे. 24 तासांची एकत्रित मर्यादा 10 लाख रुपये असेल.
ट्रॅव्हल: पूर्वीची 1 लाख रुपयांची मर्यादा आता 5 लाख रुपये झाली आहे. 24 तासांची एकत्रित मर्यादा 10 लाख रुपये असेल.
क्रेडिट कार्ड पेमेंट: पूर्वी 2 लाख रुपयांची मर्यादा होती, ती आता 5 लाख रुपये झाली आहे. 24 तासांची एकत्रित मर्यादा 6 लाख रुपये असेल.
कलेक्शन्स (उदा. कर्जफेड): पूर्वी 2 लाख रुपयांची मर्यादा होती, ती आता 5 लाख रुपये झाली आहे. 24 तासांची एकत्रित मर्यादा 10 लाख रुपये असेल.
ज्वेलरी: पूर्वीची 1 लाख रुपयांची मर्यादा आता 2 लाख रुपये झाली आहे. 24 तासांची एकत्रित मर्यादा 6 लाख रुपये असेल.
डिजिटल खाते उघडणे: या अंतर्गत ठेव खात्यांसाठी (Term Deposits) प्रति-व्यवहार आणि 24 तासांची एकत्रित मर्यादा 5 लाख रुपये आहे.
याव्यतिरिक्त, FX Retail आणि इतर काही नवीन श्रेण्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे.
P2P व्यवहारांची मर्यादा कायम
NPCI ने स्पष्ट केले आहे की, व्यक्ती-ते-व्यक्ती (P2P) व्यवहारांची मर्यादा प्रति-दिवस 1 लाख रुपयेच राहील, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वाढलेल्या या मर्यादा फक्त प्रमाणित व्यापाऱ्यांसोबतच्या (P2M) व्यवहारांसाठी लागू असतील.
NPCI ने बँकांना त्यांच्या अंतर्गत धोरणांनुसार स्वतःच्या व्यवहार मर्यादा निश्चित करण्याची मुभा दिली आहे, फक्त त्या नवीन कमाल मर्यादेपेक्षा जास्त नसाव्यात.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
जीएसटीचे 2 स्लॅब रद्द! कोणत्या वस्तू स्वस्त-कोणत्या वस्तू महाग झाल्या, पाहा संपूर्ण यादी