Union Budget 2026 : भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केला जाणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प रविवारी येत असला तरी, शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे की, राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) आणि मुंबई शेअर बाजार (BSE) या दिवशी पूर्णवेळ सुरू राहणार आहेत.
सामान्यतः शनिवारी आणि रविवारी बाजार बंद असतो, परंतु अर्थसंकल्पाच्या दिवशी गुंतवणूदारांना बाजारातील चढ-उतारावर त्वरित पावले उचलता यावीत, यासाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दशकानंतर रविवारी बाजार सुरू
भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात रविवारी बाजार सुरू राहण्याची ही दुर्मिळ घटना आहे. यापूर्वी २८ फेब्रुवारी १९९९ रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प सादर केला होता, तेव्हा रविवारी बाजार सुरू ठेवण्यात आला होता. त्यानंतर आता तब्बल २७ वर्षांनंतर हा योग जुळून आला आहे. गेल्या वर्षी २०२५ मध्ये देखील अर्थसंकल्प शनिवारी सादर झाल्यामुळे त्या दिवशी व्यवहार सुरू होते.
काय असेल बाजाराची वेळ?
नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (NSE) जारी केलेल्या परिपत्रकानुसार, १ फेब्रुवारी रोजी बाजार नेहमीच्या वेळेनुसारच चालेल:
- प्री-ओपन सत्र: सकाळी 9:00 ते सकाळी 9:08 पर्यंत.
- नियमित व्यवहार: सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत.
- अर्थसंकल्प सादरीकरण: अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11:00 वाजता भाषणाला सुरुवात करतील.
निर्मला सीतारामन यांचा सलग नववा अर्थसंकल्प
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पातून करप्रणालीत बदल, सीमा शुल्कातील सुधारणा आणि विविध क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजार सुरू असल्यामुळे अर्थमंत्र्यांच्या प्रत्येक घोषणेचा परिणाम थेट शेअर बाजारातील कंपन्यांच्या शेअर्सवर पाहायला मिळेल. यामुळे गुंतवणूदारांना ‘लाईव्ह’ मार्केटमध्ये आपली रणनीती ठरवता येणार आहे.












