Personal Finance Tips: मध्यमवर्गीय नोकरदार व्यक्तीची सर्वात मोठी समस्या म्हणजे, पगार कितीही असला तरी महिन्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आर्थिक ओढाताण होतेच. अनेकदा, चुकीच्या पद्धतीने पैसे खर्च केल्याने भविष्यासाठी बचत करता येत नाही.
जर तुम्हाला तुमच्या पगाराचे प्रभावी व्यवस्थापन करायचे असेल आणि बचत वाढवायची असेल, तर आर्थिक तज्ज्ञांनी सुचवलेला 30-30-30-10 हा फॉर्म्युला तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.
या सोप्या फॉर्म्युल्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या एकूण मासिक उत्पन्नाचे चार वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजन करू शकता.
Personal Finance Tips: फॉर्म्युलानुसार पगाराचे विभाजन असे करा
| खर्चाचा भाग | टक्केवारी | तपशील |
| आवश्यक खर्च | 30% | घराचे भाडे, गृहकर्जाचा हप्ता, किंवा अत्यावश्यक मासिक बिल |
| अन्य महत्त्वाचे खर्च | 30% | किराणा सामान, वीज बिल, मुलांचे शिक्षण शुल्क, वाहतूक आणि आरोग्य संबंधित खर्च |
| भविष्यकालीन बचत/गुंतवणूक | 30% | दीर्घकाळात उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक (उदा. म्युच्युअल फंड, जीवन विमा, पीएफ) |
| वैयक्तिक खर्च (Want) | 10% | पर्यटन, चित्रपट, ऑनलाइन शॉपिंग किंवा तुमच्या आवडीच्या वस्तू |
50,000 रुपये पगारावर नेमका किती खर्च?
या फॉर्म्युल्याचा वापर समजून घेण्यासाठी 50,000 रुपये मासिक पगार असलेल्या व्यक्तीचे उदाहरण पाहू. तुम्ही तुमच्या पगाराचे विभाजन कसे करू शकता:
- आवश्यक खर्च (30%): 15,000 रुपये यात तुमचे घर किंवा ईएमआय (EMI) संबंधित प्रमुख खर्च पूर्ण होतील.
- अन्य महत्त्वाचे खर्च (30%): 15,000 रुपये दैनंदिन गरजा आणि मुलांच्या शिक्षणावर तुम्ही हे पैसे वापरू शकता.
- बचत आणि गुंतवणूक (30%): 15,000 रुपये- तुमच्या एकूण पगाराच्या 30 टक्के म्हणजेच 15,000 रुपयांचीची मासिक बचत तुमच्या भविष्याला आधार देईल. हे पैसे तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट (FD), रिकरिंग डिपॉझिट (RD) किंवा म्युच्युअल फंडसारख्या (Mutual Funds) गुंतवणूक योजनांमध्ये लावू शकता.
- मनोरंजन आणि इच्छा (10%): 5,000 रुपये – स्वतःचे समाधान करण्यासाठी दर महिन्याला 5,000 रुपये खर्च करणे पुरेसे आहे. यातून तुम्ही छोट्या सहली, सिनेमा किंवा इतर आवडीच्या गोष्टींसाठी खर्च करू शकता.
या पद्धतीने, तुम्ही पगाराचा 60 टक्के भाग चालू खर्चासाठी वापरता, तर 30 टक्के हिस्सा भविष्यासाठी सुरक्षित करता आणि उरलेला 10 टक्के भाग तुमच्या वैयक्तिक आनंदासाठी राखून ठेवता. यामुळे महिन्याच्या शेवटी बचत न होण्याची समस्या दूर होऊन आर्थिक शिस्त लागते.









