Best Banks in India: जर तुमचे खाते एसबीआय (SBI), एचडीएफसी (HDFC) किंवा आयसीआयसीआय (ICICI Bank) यापैकी कोणत्याही बँकेत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी मोठी दिलासादायक आहे. या तिन्ही बँकांना ‘डोमेस्टिक सिस्टेमिकली इम्पॉर्टंट बँक्स’ (D-SIBs) म्हणजेच देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाच्या बँका (VIP Banks) म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) विशेष दर्जा दिला आहे.
याचा थेट अर्थ असा आहे की, या बँकांना कधीही मोठा आर्थिक फटका बसल्यास, सरकार आणि आरबीआय त्यांना बुडू देणार नाहीत.
बँकांचा ‘D-SIB’ यादीत समावेश
या बँकांना ‘D-SIB’ चा दर्जा मिळणे म्हणजे त्या भारतीय बँकिंग प्रणालीचा आधारस्तंभ आहेत. जर या बँकांच्या कामकाजात अडथळा आला, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर आणि दूरगामी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे 2014 मध्ये आरबीआयने ही संकल्पना आणली आणि त्यानंतर क्रमक्रमाने या बँकांना स्थान मिळाले:
- 2015 मध्ये सर्वप्रथम एसबीआय (SBI) या यादीत आली.
- 2016 मध्ये आयसीआयसीआय (ICICI Bank) बँकेचा समावेश झाला.
- 2017 मध्ये एचडीएफसी (HDFC Bank) बँकेला या यादीत स्थान देण्यात आले.
या विशेष दर्जामुळेच या तिन्ही बँकांना सामान्य बँकांच्या तुलनेत अधिक सुरक्षित मानले जाते.
आरबीआयचे नवीन कठोर नियम
आरबीआयच्या नियमांनुसार, या अति महत्त्वाच्या बँकांना इतर बँकांपेक्षा जास्त ‘भांडवल’ स्वतःकडे राखीव ठेवावे लागते. या अनिवार्य अतिरिक्त निधीला ‘कॉमन इक्विटी टियर 1‘ (CET1) असे म्हणतात. बँकेचा आकार आणि अर्थव्यवस्थेतील तिचे महत्त्व यानुसार हे अतिरिक्त CET1 राखण्याची मर्यादा निश्चित केली जाते. कठीण आर्थिक परिस्थितीत बँकेला वाचवण्यासाठी हा निधी महत्त्वाचा ठरतो.
1 एप्रिल 2027 पासून या बँकांना त्यांच्या महत्त्वाच्या गटानुसार (Buckets) अतिरिक्त भांडवल जमा करावे लागेल:
- एसबीआय (SBI) – गट 4: यांना सर्वाधिक 0.80% अतिरिक्त CET1 निधी राखून ठेवावा लागेल.
- एचडीएफसी बँक (HDFC Bank) – गट 2: यांना 0.40% अतिरिक्त CET1 ठेवावे लागेल.
- आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) – गट 1: यांना 0.20% अतिरिक्त CET1 ठेवावे लागेल.
ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित
या सुधारित नियमांमुळे सामान्य खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या बँकांकडे मोठा आर्थिक ताण सहन करण्याची आणि अडचणीच्या काळात स्वतःला सावरण्याची क्षमत अधिक असेल. आरबीआयने या बँकांवर विशेष लक्ष ठेवल्यामुळे, या बँकांमध्ये जमा असलेल्या तुमच्या ठेवी अत्यंत सुरक्षित राहतील, असा स्पष्ट संदेश या D-SIB निकषांमधून मिळतो.
हे देखील वाचा – IndiGo Flight Disruption : 200 हून अधिक इंडिगो उड्डाणे रद्द: प्रमुख विमानतळांवरील गोंधळाचे नेमके कारण काय?









