SBI Annuity Deposit Scheme: जर तुम्ही नोकरी करत असाल आणि त्यासोबतच दरमहा ठराविक अतिरिक्त उत्पन्नाची सोय शोधत असाल, तर स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) एन्युटी डिपॉझिट स्कीम तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. या योजनेला ‘वार्षिक जमा योजना’ असेही म्हणतात.
यामध्ये तुम्हाला फक्त एकदाच मोठी रक्कम जमा करायची असते, ज्या बदल्यात बँक तुम्हाला दरमहा ठराविक हप्ता आणि त्यावर व्याज देते. ही योजना पूर्णपणे सुरक्षित असून यामध्ये गुंतवणुकीचा कोणताही धोका नाही.
काय आहे एसबीआयची ही खास योजना?
एसबीआय एन्युटी डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूकदार आपली पुंजी सुरक्षित ठेवून दरमहा कमाई करू शकतात. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, तुम्हाला दरमहा किती पैसे मिळणार आहेत हे आधीच माहित असते. तुमच्या मासिक हप्त्यामध्ये मुद्दल आणि व्याज या दोन्ही गोष्टींचा समावेश असतो, जे हळूहळू हप्त्यांच्या स्वरूपात तुम्हाला परत मिळतात.
गुंतवणुकीची मर्यादा आणि कालावधी
या योजनेत गुंतवणूक करणे अतिशय सोपे आहे. तुम्ही किमान 1,000 रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता, तर कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. गुंतवणूकदार आपल्या सोयीनुसार 3 वर्षे, 5 वर्षे, 7 वर्षे किंवा 10 वर्षांच्या कालावधीसाठी पैसे जमा करू शकतात. यावर मिळणारे व्याज हे बँकेच्या मुदत ठेवीप्रमाणे (FD) असते, जे कालावधीनुसार बदलू शकते.
१० लाखांच्या गुंतवणुकीवर किती मिळेल परतावा?
उदाहरणादाखल सांगायचे तर, जर तुम्ही 10 लाख रुपये 10 वर्षांसाठी या योजनेत गुंतवले, तर तुम्हाला दरमहा सुमारे 11,354 रुपये मिळतील. ही रक्कम तुम्हाला पुढील 10 वर्षांपर्यंत सतत मिळत राहील. अशा प्रकारे 10 वर्षांच्या अखेरीस तुम्हाला एकूण 13.62 लाख रुपये मिळतील.
इतर महत्त्वाचे फायदे
मृत्यूनंतर पूर्ण परतावा: गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास, जमा केलेली सर्व रक्कम कोणतीही अट न ठेवता वेळेपूर्वी काढण्याची सुविधा कुटुंबाला मिळते, ज्यामुळे आर्थिक आधार मिळतो.
कर्ज सुविधा: आणीबाणीच्या काळात पैशांची गरज भासल्यास, गुंतवणूकदार आपल्या जमा रकमेच्या 75 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.
कोणीही करू शकते गुंतवणूक: कोणताही भारतीय नागरिक, अगदी अल्पवयीन मुलांच्या नावेही यामध्ये गुंतवणूक करता येते. हे खाते वैयक्तिक किंवा संयुक्त (Joint Account) रितीने उघडता येते.
हे देखील वाचा – Zomato Price Hike: खवय्यांच्या खिशाला कात्री! झोमॅटोने पुन्हा वाढवले ‘प्लॅटफॉर्म शुल्क’; आता प्रत्येक ऑर्डरसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे










