Income tax planning before March 31 : भारतीय आर्थिक वर्षाचा शेवट ३१ मार्च रोजी होतो. जर तुम्ही जुन्या प्राप्तिकर प्रणालीची निवड केली असेल, तर कर दायित्व कमी करण्यासाठी ही शेवटची संधी आहे. अनेकदा घाईगडबडीत आपण काही महत्त्वाच्या गोष्टी राहून देतो, त्यामुळे आर्थिक नियोजन तज्ज्ञांच्या मते ३१ मार्चच्या आधी आपली सर्व गुंतवणूक आणि देयके पूर्ण करणे आवश्यक आहे.
Tax Planning 2026: कर बचतीसाठी महत्त्वाच्या टिप्स
१. कलम ८० सी अंतर्गत मर्यादा तपासा: कलम ८० सी नुसार १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. यामध्ये भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ), जीवन विमा प्रीमियम आणि मुलांची शिक्षण फी यांचा समावेश होतो. तुमची गुंतवणूक या मर्यादेपेक्षा कमी असेल, तर उरलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवून तुम्ही सवलत मिळवू शकता.
२. कर बचत गुंतवणुकीचे पर्याय: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांसारख्या सरकारी योजनांत गुंतवणूक करून तुम्ही कर सवलत मिळवू शकता. तसेच म्युच्युअल फंडाच्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीममध्येही (ईएलएसएस) गुंतवणूक करता येते. याचा लॉक-इन कालावधी फक्त ३ वर्षे असल्याने हे गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरते.
३. एनपीएस (NPS) मध्ये अधिक गुंतवणूक: कलम ८० सी व्यतिरिक्त नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये गुंतवणूक करून तुम्ही अतिरिक्त ५० हजार रुपयांपर्यंतची कर सवलत मिळवू शकता.
४. आरोग्य विमा प्रीमियम: आरोग्य विम्याचा प्रीमियम ३१ मार्चच्या आधी भरल्यास तुम्हाला कलम ८० डी अंतर्गत कर लाभ मिळू शकतो. तसेच या तारखेच्या आधी पैसे भरल्यास तुमचा विमा कव्हरही सक्रिय राहतो.
५. खाती सक्रिय ठेवा: पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि एनपीएस यांसारख्या योजनांमध्ये वर्षाला किमान आवश्यक रक्कम जमा करणे गरजेचे असते. ३१ मार्चपर्यंत ही रक्कम जमा केली नाही, तर तुमचे खाते निष्क्रिय होऊ शकते आणि कर सवलतीचा लाभही गमावण्याची शक्यता असते.
तज्ज्ञांचा सल्ला
अंतिम क्षणी तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे गुंतवणूक पोर्टल्सवर व्यवहारासाठी ३१ मार्चची वाट पाहू नका. शेवटच्या दिवसात बँकिंग वेबसाइट्सवर ताण वाढू शकतो, ज्यामुळे तुमचे व्यवहार पुढच्या आर्थिक वर्षात ढकलले जाऊ शकतात आणि तुम्हाला या वर्षीचा कर लाभ मिळणार नाही. त्यामुळे ही कामे आताच पूर्ण करणे हिताचे ठरेल.
हे देखील वाचा – Netanyahu Viral Video: बेंजामिन नेतन्याहू यांचा खरचं मृत्यू झाला आहे का? व्हिडिओ आला समोर










