Union Budget 2026 : भारताच्या अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणारा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होत आहे. यंदाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासाठी वैयक्तिकरित्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. २०१९ मध्ये अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यापासून सीतारामन यांनी आतापर्यंत एकूण ८ अर्थसंकल्प (फेब्रुवारी २०२४ च्या अंतरिम अर्थसंकल्पासह) मांडले आहेत. आता १ फेब्रुवारी २०२६ रोजी आपला ९ वा अर्थसंकल्प सादर करून त्या एक नवा विक्रम आपल्या नावे करणार आहेत.
सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री
भारतीय इतिहासात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा मान माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याकडे जातो.
- मोरारजी देसाई: त्यांनी एकूण 10 वेळा अर्थसंकल्प सादर केले आहेत (१९५९-१९६४ दरम्यान ६ आणि १९६७-१९६९ दरम्यान ४ वेळा).
- पी. चिदंबरम: त्यांनी एकूण 9 वेळा देशाचे बजेट मांडले आहे.
- प्रणव मुखर्जी: त्यांनी ८ वेळा ही जबाबदारी पार पाडली आहे.
- निर्मला सीतारामन: यंदाच्या अर्थसंकल्पानंतर त्या पी. चिदंबरम यांच्या विक्रमाची बरोबरी करतील आणि ‘सलग’ सर्वाधिक वेळा बजेट मांडणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री ठरतील.
अर्थसंकल्पाच्या इतिहासातील काही रंजक तथ्ये
- पहिले बजेट: स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी आर. के. शणमुखम चेट्टी यांनी मांडला होता. तर भारताचा सर्वात पहिला अर्थसंकल्प ब्रिटिश काळात ७ एप्रिल १८६० रोजी जेम्स विल्सन यांनी सादर केला होता.
- सर्वात लांब भाषण: निर्मला सीतारामन यांच्या नावावर सर्वात लांब बजेट भाषणाचा विक्रम आहे. १ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांनी २ तास ४० मिनिटे भाषण केले होते.
- सर्वात आखूड भाषण: १९७७ मध्ये हिरुभाई मुलजीभाई पटेल यांनी दिलेले अंतरिम बजेट भाषण केवळ ८०० शब्दांचे होते.
बदललेल्या परंपरा
- वेळेत बदल: ब्रिटिश काळापासून बजेट संध्याकाळी ५ वाजता मांडले जात असे. मात्र, १९९९ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ही प्रथा मोडीत काढली आणि सकाळी ११ वाजता बजेट मांडण्यास सुरुवात केली.
- तारखेत बदल: २०१७ पूर्वी फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी बजेट मांडले जायचे. मात्र, १ एप्रिलपासून अंमलबजावणी सोपी व्हावी यासाठी २०१७ पासून १ फेब्रुवारीला बजेट मांडले जाऊ लागले.
मनमोहन सिंग यांनी १९९१ ते १९९५ या काळात सलग ५ वेळा अर्थसंकल्प सादर करून देशाच्या आर्थिक उदारीकरणाचा पाया रचला होता. आता निर्मला सीतारामन या डिजिटल इंडिया आणि विकसित भारताच्या संकल्पासह आपला ९ वा अर्थसंकल्प मांडण्यासाठी सज्ज आहेत.












