Digital Rupee : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशाचे स्वतःचे डिजिटल चलन ‘ई-रुपया’ (e₹) लाँच केले आहे. याला ‘सेंट्रल बँक डिजिटल करन्सी’ (CBDC) असेही म्हणतात. तुमच्या खिशातील कागदी नोटा आणि नाण्यांचे हे डिजिटल स्वरूप आहे. ई-रुपयामुळे आता प्रत्यक्ष रोकड सोबत बाळगण्याची गरज उरणार नाही.
ई-रुपया आणि क्रिप्टोमधील फरक
अनेकांना वाटते की ई-रुपया म्हणजे ‘बिटकॉइन’ सारखी क्रिप्टोकरन्सी आहे, पण तसे अजिबात नाही.
- स्थिर मूल्य: क्रिप्टोकरन्सीचे मूल्य सतत बदलत असते, मात्र ई-रुपयाचे मूल्य तुमच्या खिशातील रुपयाइतकेच स्थिर असते.
- कायदेशीर मान्यता: ई-रुपया हे भारताचे अधिकृत चलन असून त्याला सरकारची पूर्ण गॅरंटी आहे.
- सुरक्षितता: हे गुंतवणुकीचे साधन नसून व्यवहाराचे सुरक्षित माध्यम आहे.
ई-रुपया आणि युपीआय मधील तुलना
युपीआय (UPI) हे पैसे पाठवण्याचे ‘माध्यम’ आहे, तर ई-रुपया हे स्वतः ‘पैसे’ आहे. युपीआय व्यवहारासाठी बँक खाते असणे अनिवार्य आहे, मात्र ई-रुपया वॉलेट भविष्यात बँक खात्याशिवायही वापरता येईल. महत्त्वाचे म्हणजे, 50,000 रुपयांपेक्षा कमी व्यवहारांची नोंद तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये येणार नाही, ज्यामुळे तुमची गोपनीयता (Privacy) जपली जाते.
ई-रुपया कसा वापरावा?
जर तुमचे खाते एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी, ॲक्सिस किंवा इतर १९ प्रमुख बँकांमध्ये असेल, तर तुम्ही हे चलन वापरू शकता.
- नोंदणी: तुमच्या बँकेचे अधिकृत ‘Digital Rupee App’ प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा.
- वॉलेट: या ॲपमध्ये तुमचे डिजिटल वॉलेट तयार होईल. तुम्ही तुमच्या बँक खात्यातून पैसे या वॉलेटमध्ये ‘लोड’ करू शकता.
- खर्च: तुम्ही कोणत्याही व्यापाऱ्याचा युपीआय क्यूआर (QR) कोड स्कॅन करून ई-रुपयाद्वारे पेमेंट करू शकता.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि मर्यादा:
- ऑफलाईन व्यवहार: इंटरनेट नसतानाही एनएफसी (NFC) तंत्रज्ञानाद्वारे तुम्ही पैसे पाठवू शकता.
- व्याज नाही: रोख रकमेप्रमाणेच, वॉलेटमधील ई-रुपयावर तुम्हाला कोणतेही व्याज मिळणार नाही.
- मर्यादा: सध्या एका वॉलेटमध्ये जास्तीत जास्त 1,00,000 रुपये ठेवता येतात आणि दिवसाला 50,000 रुपयांपर्यंत व्यवहार करता येतात.
- सुरक्षितता: ई-रुपया चोरीला जाण्याची किंवा फाटण्याची भीती नाही.










