Zomato Price Hike: ऑनलाइन जेवण मागवणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आघाडीची फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने आपल्या ‘प्लॅटफॉर्म शुल्कात’ पुन्हा एकदा मोठी वाढ केली आहे. कंपनीने हे शुल्क १२.५ रुपयांवरून थेट १४.९ रुपये प्रति ऑर्डर इतके केले आहे. म्हणजेच ग्राहकांना आता प्रत्येक ऑर्डरवर सुमारे १९ टक्के अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.
शुल्काचा नवा प्रवास
विशेष म्हणजे, झोमॅटोने यापूर्वी सप्टेंबरमध्ये सणासुदीच्या काळाचे निमित्त साधून हे शुल्क १२ रुपयांपर्यंत वाढवले होते. आता त्यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. या १४.९ रुपये शुल्कावर कंपनी २.६८ रुपये जीएसटी देखील वेगळा आकारत आहे.
झोमॅटोची मुख्य स्पर्धक कंपनी ‘स्विगी’ने देखील आपले शुल्क वाढवून १४.९९ रुपये (जीएसटीसह) केले आहे. 2023 मध्ये केवळ २ रुपयांपासून सुरू झालेला हा प्रवास आता १५ रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
कंपनीला होणार मोठा फायदा
झोमॅटो दररोज साधारणपणे २३ ते २५ लाख ऑर्डर्स पूर्ण करते. जरी ही वाढ किरकोळ वाटत असली, तर मोठ्या प्रमाणावर विचार केल्यास यातून कंपनीला कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. एका अंदाजानुसार, झोमॅटो, स्विगी, फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन यांसारख्या कंपन्या प्लॅटफॉर्म शुल्काच्या माध्यमातून वर्षाला ३,५०० ते ४,००० कोटी रुपये कमावतात.
नवनवीन शुल्कांचा भडिमार
केवळ प्लॅटफॉर्म शुल्कच नाही, तर झोमॅटो आता उत्पन्नाचे इतर मार्गही शोधत आहे:
- व्हीआयपी मोड: काही भागांत ५० रुपये भरून ‘व्हीआयपी मोड’ची चाचणी सुरू आहे, ज्यामध्ये जलद डिलिव्हरीचे आश्वासन दिले जाते.
- पावसाळी शुल्क: खराब हवामान किंवा पाऊस असल्यास कंपनी अतिरिक्त ‘रेन सरचार्ज’ आकारते.
- लांब अंतराचे शुल्क: ४ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून जेवण मागवल्यास रेस्टॉरंट्सकडून ‘लाँग डिस्टन्स फी’ आकारली जात आहे, ज्याला छोट्या हॉटेल व्यावसायिकांनी विरोध दर्शवला आहे.
सध्या तरी ग्राहकांकडून या दरवाढीला मोठा विरोध झालेला नाही, कारण ही वाढ टप्प्याटप्प्याने केली जात आहे. मात्र, भविष्यात जर हे शुल्क अधिक वाढले, तर ऑनलाइन ऑर्डर देणाऱ्यांच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
हे देखील वाचा – US F-35 Shot Down: अमेरिकेचे ‘ब्रह्मास्त्र’ निकामी? इराणने जगातील सर्वात प्रगत स्टेल्थ फायटर जेट कसे पाडले?









