भारताची लढाऊ विमाने पाकिस्तानने पाडली! भारताची पहिल्यांदाच कबुली! खळबळ

सिंगापूर- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानवर जोरदार हवाई हल्ला केला. या हल्ल्यावेळी भारताची राफेलसह सहा लढाऊ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तान सतत करत आहे. हा दावा वेळोवेळी फेटाळत भारताने आपले एकही लढाऊ विमान पडले नाही असेच आजवर म्हटले होते. मात्र, भारतीय सशस्त्र दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी आज पहिल्यांदाच भारताची लढाऊ विमाने पाकिस्तानने पाडल्याची कबुली दिली. मात्र नेमकी किती विमाने पाडली गेली हे त्यांनी आजही सांगितले नाही. सहा विमाने पाडली हे खोटे आहे इतकेच म्हणून त्यांनी संभ्रम कायम ठेवला. जनरल अनिल चौहान इतकेच म्हणाले की, लढाऊ विमाने पडली हे महत्त्वाचे नसून ती का पडली हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. परंतु विमाने पडली याची कबुली दिल्याने खळबळ माजली असून भारत काहीतरी लपवत असल्याचा संशय पुन्हा निर्माण झाला आहे.
सिंगापूरमध्ये दरवर्षी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या सुरक्षा परिषदेतील शांग्रीला डायलॉगमध्ये जनरल अनिल चौहान सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना सवाल करण्यात आला की, ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाकिस्तानने भारताची सहा विमाने पाडली का ? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, सहा भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. आपली किती विमाने पडली हे भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही तर ती का पडली, कोणत्या चुका झाल्या हे महत्त्वाचे आहे. संख्या महत्त्वाची नाही. चांगली गोष्ट अशी की आपण आपली चूक समजून घेऊ शकतो, ती दुरुस्त करू शकतो. पुन्हा सज्ज होऊन लांब पल्ल्यांच्या लक्ष्यांवर मारा करू शकतो.
पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करून ती उद्धवस्त केली होती. याला प्रत्त्युत्तर म्हणून पाकिस्तानने सीमाभागात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले तेव्हा भारताने पाकिस्तानच्या 9 तळांवर हल्ला केला. 10 मे रोजी दोन देशांत युद्धबंदी होईपर्यंत चार दिवसांच्या संघर्षात भारताने पाकिस्तानच्या कमीत कमी नऊ पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला केला होता. काही ठिकाणच्या रडार यंत्रणा नष्ट केल्या. या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचे पाकिस्ताननेही मान्य केले असले तरी या हल्ल्यात दसॉल्ट राफेलसह भारताची सहा विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि इतर काही मंत्र्यांनीही केला होता. मात्र पाकिस्तानने याबाबत कुठलेही पुरावे दिले नाहीत. याउलट आम्हाला सोशल मीडियावरून याची माहिती मिळाली, असे सांगितले. त्यावरून त्यांची चेष्टा केली जात होती. आता मात्र त्यात काही अंशी तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेले पडलेल्या विमानाचे फोटो राफेलचे नसल्याचा खुलासा भारताने केला होता. पाकिस्तानचा भारताची विमाने पाडल्याचा दावा खरा आहे का, हा प्रश्न भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या वरिष्ठांना एकत्र घेतलेल्या पत्रकार परिषदेतही विचारला असता युद्धात नुकसान होतच असते, असे संदिग्ध उत्तर त्यांनीही दिले होते.
विशेष म्हणजे फ्रेंच बनावटीचे डसॉल्ट राफेल हे अत्यंत महागडे आणि शक्तिशाली लढाऊ विमान समजले जाते. 2004 मध्ये फ्रेंच नौदलात आणि 2006 मध्ये फ्रेंच हवाई दलात सामील झाल्यानंतर गेल्या दोन दशकांमध्ये कुठल्याही युद्धात राफेल पडल्याचे जाहीरपणे कधीच मान्य करण्यात आले नाही. त्यामुळे पाकिस्तानचा राफेल पाडल्याचा दावा ही राफेल कंपनीसाठीही मोठी नामुष्की असल्याने फ्रेंच कंपनीने या बातमीत किती तथ्य आहे याचा तपास सुरू केला होता. आता भारताने आपली काही लढाऊ विमाने पडल्याची कबुली दिली असली तरी राफेलचे नाव घेतलेले नाही. तरीही राफेल संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
खोट्या बातम्यांच्या उत्तरात 15 टक्के वेळ वाया गेला
अनिल चौहान ऑपरेशन सिंदूरबाबत म्हणाले की, सोशल मीडियावर अनेक खोट्या आणि भ्रामक बातम्या पसरवल्या गेल्या. या बातम्यांना उत्तर देण्यातच 15 टक्के वेळ खर्च झाला. उत्तरे देण्यात थोडा विलंब झाला तरी भारताची रणनीती ही तथ्यावर आधारित संवादावर केंद्रित राहिली. ऑपरेशन सिंदूरदरम्यान दोन महिला लष्करी अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी थेट संवाद साधला, कारण वरिष्ठ लष्करी अधिकारी प्रत्यक्ष ऑपरेशनमध्ये व्यग्र होते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने चीनच्या व्यावसायिक सॅटेलाईट इमेजरीचा वापर केल्याचा संशय आहे. मात्र त्यांना रिअल-टाइम लक्ष्य साधण्यासाठी त्याची प्रत्यक्ष मदत मिळाल्याचे कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. भारताने या कारवाईदरम्यान आकाश क्षेपणास्त्र प्रणालीसह विविध स्वदेशी संरक्षण प्रणालींचा यशस्वी वापर केला. भारताने स्वदेशी आणि आयात केलेल्या रडार प्रणाली एकत्र करून सशक्त व एकात्मिक संरक्षण यंत्रणा तयार केली. ऑपरेशन सिंदूर हे भविष्यातील युद्धाची झलक दाखवणारे होते. हे एक नॉन-कॉन्टॅक्ट, मल्टी-डोमेन स्वरूपाचे युद्ध होते.

Share:

More Posts