बडोदा- गुजरातमधील बडोदा आणि आणंद जिल्ह्यांना जोडणारा महिसागर नदीवरील 900 मीटर लांबीच्या गांभिरा पुलाचा मधला भाग आज कोसळला. या दुर्घटनेत अनेक वाहने पुलावरून कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या पुलाच्या दुरवस्थेची अनेक वेळा तक्रार केली होती. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले, असा आरोप स्थानिक नागरिक आणि विरोधकांनी केला. विशेष म्हणजे, गुजरात आणि महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाची नेहमी तुलना केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातच्या विकासाला राष्ट्रीय पातळीवर आदर्श म्हणून प्रसिद्धी दिली जाते. मात्र, आजच्या पूल अपघातामुळे गुजरात मॉडेलवर टीका होत आहे.
आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास 40 वर्षे जुन्या 900 मीटर लांबीच्या गांभिरा पुलाच्या मधोमध असलेला 10 ते 15 मीटरचा स्लॅब अचानक कोसळला. यावेळी पुलावरून जात असलेले 2 ट्रक, 2 व्हॅन आणि एक चारचाकीही नदीत कोसळली. तर एक टँकर पुलावरून पडता पडता थोडक्यात वाचला. तो कललेल्या अवस्थेत अर्धवट तुटलेल्या पुलावर लटकत राहिला. स्थानिकांनी सांगितले की, पूल कोसळताना मोठा आवाज झाला. काही क्षणांतच पुलाचा भाग खाली कोसळला. बडोदा अग्निशमन दल, पोलीस, प्रशासन, बचाव पथकाच्या मदतीने तत्काळ बचावकार्य केले. क्रेन व बोटींनी नदीत अडकलेली वाहने बाहेर काढण्यात आली. मात्र, दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाले. वडोदऱ्याचे पोलीस अधीक्षक रोहन आनंद म्हणाले की, पूल पडल्याची माहिती मिळताच आम्ही लगेच घटनास्थळी पोहोचून बचावकार्याला सुरुवात केली. एकूण पाच वाहने पुलावरून कोसळली. तर दोन वाहने थोडक्यात बचावली आहेत. नऊ जणांना वाचवण्यात आम्हाला यश आले.
हा पूल मध्य गुजरातला सौराष्ट्राशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. पुलाच्या कोसळण्यामुळे संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली असून, आता प्रवाशांना अहमदाबादमार्गे मोठ्या वळणावरून प्रवास करावा लागणार आहे. या दुर्घटनेमुळे जुन्या पुलांची तातडीने सुरक्षा तपासणी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी एक्स पोस्टद्वारे मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखांची आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर सर्व वैद्यकीय खर्च राज्य सरकार उचलणार असेही सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त करत राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख व जखमींना 50 हजार रुपये मदतीची घोषणा केली.
काँग्रेस आमदार अमित चावडा यांनी पूल दुर्घटनेवरून सरकारवर टीका केली की, स्थानिक लोकांनी सरकारकडे पूल खराब अवस्थेत असल्याची वारंवार तक्रार केली होती. पत्रेही लिहिली होती, पण सरकारने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच हा अपघात झाला आणि निष्पाप नागरिकांचा जीव गेला.
सरकारने या प्रकरणी तातडीने चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी. गुजरातमध्ये अशा दुर्घटना वारंवार होत असल्यामुळे राज्य सरकारने सर्व पुलांचे ऑडिट करावे. त्यांचे प्रमाणपत्र काढून ते जनतेसाठीही सार्वजनिक करावे. ज्यामुळे भविष्यात असे अपघात टाळता येतील.
