अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे उड्डाण तूर्तास पुढे ढकलले

नवी दिल्ली- भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे ऑक्झिओम 4 मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) जाण्यास सज्ज झाले होते. उद्या सायंकाळी 5.54 च्या सुमारास फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी अंतराळ केंद्रावरून स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून फाल्कन 9 रॉकेटमधून उड्डाण करणार होते. मात्र आज रात्री नासाने खराब हवामानामुळे उद्या होणारे उड्डाण बुधवारी संध्याकाळी 5 वाजता होणार असल्याचे जाहीर केले.
शुभांशू शुक्ला हे या ‌‘एक्सिओम-4‌’ योजनेचे वैमानिक आहेत. या मोहिमेत त्यांच्यासोबत पोलंडचे स्लावोस्ज उजनांस्की-विस्नीवस्की, हंगेरीचे टिबोर कापू आणि अमेरिकेचे अंतराळवीर पॅगी व्हिटसन हे देखील अंतराळात भरारी घेण्याचे नियोजन होते. शुभांशू यांनी काल स्पेसएक्सचा फ्लाईट सूट घालून फुल ड्रेस रंगीत तालीम (फायनल रिहर्सल) केली होती. यामध्ये त्यांनी असेंब्ली इमारतीपासून रॉकेटपर्यंत जाण्याचा आणि त्यात बसण्याचा सराव केला होता.
हा एक अद्भूत प्रवास होता. हे क्षण तुम्हाला सांगतात की, तुम्ही स्वतःपेक्षा खूप मोठ्या अशा गोष्टीचा भाग होणार आहात. मी एवढेच म्हणू शकतो की, मी खूप भाग्यवान आहे की, मला या मिशनचा भाग होण्याची संधी मिळाली, असे शुक्ला यांनी ऑक्सिओम स्पेसने जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटले होतेे. शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले आणि 41 वर्षांनंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरणार आहेत. यापूर्वी राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळ प्रवास केला होता. 1978 नंतर अंतराळात जाणारे स्लावोज उझनान्स्की हे पोलंडमधील दुसरे अंतराळवीर असतील. 1980 नंतर अंतराळात जाणारे टिबोर कापू हे हंगेरीचे दुसरे अंतराळवीर असतील. अमेरिकन पेगी व्हिटसन यांची ही दुसरी व्यावसायिक मानवी अंतराळ उड्डाण मोहीम आहे.
लखनौचे मूळ रहिवासी
शुभांशू शुक्ला हे मूळचे उत्तर प्रदेशातील लखनौ येथील आहेत. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण लखनौमधील अलिगंज येथील सिटी मॉन्टेसरी शाळेतून पूर्ण केले. इयत्ता बारावीनंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीची (एनडीए) प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि तेथून पदवी प्राप्त केली. एनडीए ही भारतातील एक प्रमुख संस्था आहे जी सशस्त्र दलांसाठी (सेना, नौदल आणि हवाई दल) ऑफिसर कॅडेटना प्रशिक्षण देते. ही संस्था नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाशी (जेएनयू) संलग्न असलेल्या प्रशिक्षणाबरोबरच शैक्षणिक पदव्या देखील प्रदान करते. शुभांशू यांना 17 जून 2006 रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ शाखेत सामील करण्यात आले. ते एक अनुभवी लढाऊ आणि चाचणी वैमानिक आहेत. त्यांना 2000 तासांहून अधिक तास विमान उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी सुखोई-30 एमकेआय, मिग-21, मिग-29, जग्वार, हॉक, डोर्नियर आणि एएन-32 सारख्या लढाऊ विमानांचे उड्डाण केले आहे.