अमेरिका-पाक तेल करार! ट्रम्पचा भारताला दुसरा झटका

US-Pakistan oil deal: Trump's second blow to India


नवी दिल्ली- भारतावर 25 टक्के आयातशुल्क लागू करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प (Donald Trump) यांनी आज पाकिस्तानशी तेल भागीदारीचा करार केल्याची घोषणा करून भारताला दुसरा झटका दिला. या करारानुसार अमेरिका आणि पाकिस्तान संयुक्तपणे विशाल तेलसाठे विकसित करणार आहे. या भागीदारीमुळे पाकिस्तान एक दिवस भारतालाही तेल विकेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, आम्ही पाकिस्तानसोबत एक करार केला आहे ज्यामध्ये अमेरिका आणि पाकिस्तान संयुक्तपणे तेथील विशाल तेल साठ्यांचा विकास करतील. या भागीदारीसाठी एका तेल कंपनीची निवड केली जाईल. कदाचित एक दिवस ते (पाकिस्तान) भारतालाही तेल विकतील.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या टोकाची भारतविरोधी भूमिका घेत आहेत. ट्रम्प यांनी कालच भारतावर 25 टक्के आयातशुल्क लागू लागू करण्याबरोबर रशियासोबत व्यापार करण्याची शिक्षा म्हणून भारताला दंड आकारण्याची घोषणा केली होती. आज त्यांनी आणखी एक पोस्ट करून भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला.
या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, भारत आणि रशिया यांच्यात काय सुरू आहे, याची मला मुळीच फिकीर नाही. हे दोन देश आपापल्या मृत्यूपंथाला लागलेल्या अर्थव्यवस्था मिळून रसातळाला नेत आहेत. आमचा भारताशी फारसा व्यापार नाही. भारत आमच्या मालावर जगातील सर्वात जास्त आयात शुल्क लावतो. त्याप्रमाणे रशियासोबत अमेरिकेचा फारसा व्यापार नाही. हे असेच चालू द्या. रशियाचे अपयशी माजी राष्ट्राध्यक्ष मेदवेदेव यांना सांगायला पाहिजे की, ते स्वतःला आजही अध्यक्ष समजतात. ते एका भयंकर शेवटाकडे वाटचाल करत आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे दुसऱ्यांदा हाती घेतल्यापासून ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर आयातशुल्क वाढीचा बडगा उगारला. त्यांच्या या अस्त्रामुळे जगाची व्यापारी समीकरणे बिघडण्याची शक्यता स्पष्ट दिसू लागल्याने अनेक देशांनी ट्रम्प यांची आयातशुल्कात सवलत देण्यासाठी मिनतवाऱ्या केल्या. त्यानंतर ट्रम्प यांनी आयात शुल्कवाढीस 31 जुलैपर्यंत स्थगिती दिली. दरम्यानच्या काळात ट्रम्प यांनी अनेक देशांवर व्यापारी करारासाठी दबाव टाकला. भारताबरोबरही अमेरिकेला व्यापार करार करायचा होता. या करारासाठी चर्चेच्या काही फेऱ्यादेखील झाल्या. मात्र ट्रम्प यांनी दिलेल्या 31 जुलैपर्यंतच्या मुदतीत कराराला अंतिम स्वरुप देता आले नाही. त्यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी भारतावर दबाव वाढवण्यासाठी पाकिस्तानला रसद पुरवण्याची भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांच्या या दादागिरीवर भारत सरकारने अगदीच बोटचेपेपणाची प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी लागू केलेल्या 25 टक्के आयात शुल्कामुळे भारताच्या व्यापारावर किती आणि कसा परिणाम होईल, याचा आम्ही अभ्यास करत आहोत, अशी अधिकृत प्रतिक्रिया आज भारत सरकारच्या वतीने देण्यात आली.