न्यूयॉर्क- अमेरिकेचे माजी पायलट स्टीव्ह यांनी आज अहमदाबाद विमानाची जबाबदारी सदोष 747 बोईंग विमानावर न टाकता पायलटने चुकून गिअर ओढण्याऐवजी फ्लॅप ओढल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तवली. बोईंग 787 ड्रीमलायनर हे अमेरिकेच्या बोईंग कंपनीचे उत्पादन आहे. या विमानाबाबत आतापर्यंत अनेकदा आक्षेप घेतले गेले आहेत. मात्र दरवेळी कंपनीला निर्दोष ठरविण्यात आले. स्टीव्ह यांचा युक्तिवाद त्याच मार्गाने आहे. अर्थात त्यांनी स्पष्ट केले आहे की, हा माझा तर्क आहे. हा तर्क ब्लॅक बॉक्स व इतर तपासानंतर खोटा ठरला तर माझे मत मी त्वरित मागे घेईन.
माजी पायलट स्टीव्ह म्हणाले की, ड्रीमलायनर 787 हे अतिशय चांगले विमान आहे. ते 777 पेक्षा चांगले आणि जास्त क्षमता असलेले आहे. एखाद्या अपघातात संपूर्ण विमान गमावल्याची ही पहिलीच घटना असेल. या अपघाताबद्दल मी जे निष्कर्ष काढत आहे ते प्राथमिक माहितीच्या आधारे काढलेले आहेत. ब्लॅक बॉक्स आणि तपास अहवाल आल्यावर विमान अपघाताचे खरे कारण समोर येईल. त्यामुळे माझे मत पुढील तपशिलानुसार बदलू शकते. अपघाताच्या व्हिडिओत असे दिसते आहे की, विमानाने टेकऑफ केला, तेव्हा ते सर्वसाधारण स्थितीत होते. त्याचे नाक वर होते आणि शेपूट खाली होते. परंतु टेकऑफनंतर सामान्यतः 50 फूट उंच गेल्यावर लँडिंग गिअर वर घेतले जातात. या विमानाच्या बाबतीत ते जास्त वेळपर्यंत खाली असल्याचे दिसते. मला विमान कोसळण्याची तीन कारणे दिसतात. विमानाची दोन्ही इंजिन बिघडणे, फ्लॅप चुकीच्या पद्धतीने सेट होणे आणि तिसरे कारण पायलटने चुकीने गियरऐवजी फ्लॅप ओढला जाणे.
अपघाताचा व्हिडिओ पाहून कॅप्टन स्टीव्ह यांनी आपले मत मांडत म्हटले की, एका वेळी दोन्ही इंजिन खराब होण्याची शक्यता नसते. तसे झाले असते, तर इंजिनमधून धूर किंवा आगीच्या ज्वाळा निघताना दिसल्या असत्या. इंजिनाला इंधन पोहचत नसल्याची शक्यता नाही. कारण तसे असते तर उड्डाणावेळीच तसे संकेत मिळाले असते. परंतु विमानाचे उड्डाण व्यवस्थित झालेले दिसते. फ्लॅप सेटिंगमध्ये चूक असण्याची शक्यताही कमी आहे. कारण 787ची इलेक्ट्रॉनिक चेकलिस्ट फ्लॅप सेटिंग नीट नसेल तर उड्डाणच करू देत नाही. त्यामुळे मला वाटते की, उड्डाण झाल्यावर वैमानिकाने चुकून गियरऐवजी फ्लॅप ओढले असावेत. त्यामुळे विमानाची उंचीवर जाण्याची क्षमत तत्काळ कमी झाली. त्यावेळी लँडिंग गियर उघडलेले असल्याने ओढ निर्माण झाली. विमान उंच जाण्याऐवजी स्थिर झाले. अशा स्थितीत विमानाचे वजन पेलवणे कठीण होते. फ्लॅप नसल्यामुळे विमानाची गती मंदावलेल्या स्थितीत लिफ्ट कमी होऊन विमानाचे नाक खाली झाले. वैमानिकांनी विमानावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु फ्लॅपमुळे तो अपयशी ठरला आणि विमान खाली कोसळले. विमानाचे फ्लॅप, गियर, पॉवर आणि लिफ्ट एकाच वेळी काम करतात. त्यांच्यातील एकात गफलत झाली तरी गंभीर गोष्ट घडू शकते. या दुर्घटनेत फ्लॅपमुळे गोंधळ झाला असावा. अर्थात विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यावरच या अपघाताबाबत अचूक माहिती मिळू शकेल.
ड्रीमलायनरबाबत बोईंगच्याच
इंजिनिअरने इशारा दिला होता
अहमदाबाद येथील बोईंग विमानाच्या अपघातानंतर हा अपघात नेमका कशामुळे झाला याबद्दल वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. ड्रीमलायनर विमानाबाबत बोईंग कंपनीचा इंजिनिअर असलेल्या सॅम सालेहपूर यानेच गेल्या वर्षी एक धक्कादायक दावा केला होता. बोईंगने 777 आणि 787 ड्रीमलायनर विमानांच्या उत्पादनामध्ये शॉर्टकट घेतल्याचा आरोप त्याने केला होता. द न्युयॉर्क टाईम्स आणि सीएनएनला दिलेल्या मुलाखतींमध्ये सालेहपूर याने सांगितले होते की, चुकीच्या पद्धतीने केलेल्या असेंब्ली व घाईने करण्यात आलेल्या उत्पादन प्रक्रियांमुळे कालांतराने विशेषतः ही विमाने जुनी झाल्यावर गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. सालेहपूर याने 777 आणि 787 ड्रीमलायनर विमानांच्या उत्पादनात गुणवत्तेची समस्या असल्याचा गंभीर आरोप केला. एवढेच नव्हे तर त्याने जानेवारी 2024 मध्ये अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनकडे याबाबत तक्रारही केली होती. मात्र, ही तक्रार केल्यानंतर कंपनीने आपल्यावर सूड उगवल्याचे त्याने म्हटले. सालेहपूर यांनी मुलाखतीत म्हटले की, 787 मालिकेतील चुकीचे ड्रिलिंग, 777 मधील चुकीच्या पद्धतीने जुळवलेले सुट्टे भाग आणि तपासणी न करता कामास दिलेली मंजुरी हे चिंतेचे विषय होते. विमानाच्या साच्यामध्ये लहान फटी चुकीच्या पद्धतीने भरल्या होत्या. ज्यामुळे नंतर त्या फटी मोठ्या होऊ शकतात. ही विमान बनवण्याची पद्धत नाही. मी बोईंग कंपनीची बदनामी करण्यासाठी हे बोलत नाही. तर विमानांचे अपघात टळावेत ही माझी इच्छा आहे. ही विमाने म्हणजे एखाद्या स्फोटक बॉम्बसारखी आहेत. 2021 मध्ये आपल्या विमानातील ही समस्या दूर केल्याचा बोईंगने दावा केला आहे. परंतु ती समस्या आजही तशीच आहे.
उड्डाणापूर्वी सर्व ड्रीमलायनर
विमानांची तपासणी होणार
अहमदाबाद विमान अपघातानंतर डीजीसीएने बोईंगच्या विमानांच्या प्रत्येक उड्डाणापूर्वी त्यांची तपासणी करण्याचे आदेश नागरी उड्डाण महासंचालकांनी (डीजीसीए) दिले आहेत. 15 जूनच्या मध्यरात्रीपासून भारतातून उड्डाण करणार्या प्रत्येक ड्रीमलायनर विमानाची विशेष तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. उड्डाणापूर्वी डीजीसीएने अनेक महत्त्वाच्या तांत्रिक तपासण्यांचे निर्देश दिले आहेत, त्यामध्ये इंधन पॅरामीटर मॉनिटरिंग, केबिन एअर कॉम्प्रेसर सिस्टम, इलेक्ट्रॉनिक इंजिन नियंत्रण चाचणी, इंजिन इंधन अॅक्च्युएटर ऑपरेशन, ऑईल सिस्टम आणि हायड्रॉलिक सिस्टमची तपासणी करावी लागणार आहे. टेकऑफपूर्वी पॅरामीटर्सचे योग्यरित्या पाहणी करण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत. दोन आठवड्यांच्या आत पॉवर अॅश्युरन्स तपासणीदेखील बंधनकारक केली आहे. तसेच 15 दिवसांत बोईंग ड्रीमलायनर विमानात आढळलेल्या समस्या आणि वारंवार येत असलेल्या बिघाडांचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.