वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परदेशी विद्यार्थ्यांबाबतच्या कठोर नीतीचे आणखी एक संतापजनक उदाहरण समोर आले आहे. नेवार्क विमानतळावर एका भारतीय विद्यार्थ्याला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तपासणीच्या नावाखाली अमानुष वागणूक दिली. त्याच्या दोन्ही हातांत बेड्या घालून त्याला जमिनीवर पालथे झोपवले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
भारतीय वंशाचे अमेरिकन व्यावसायिक कुणाल जैन यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये पोलीस अधिकारी एका तरुणाला जमिनीवर पालथा झोपवून त्याची झडती घेताना दिसत आहेत. या तरुणाचे दोन्ही हात पाठीमागे बेड्या घातलेल्या स्थितीत आहेत. तरुणाच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत आहे. त्याला अधिकाऱ्यांनी कशी क्रुर वागणूक दिली हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते.
या भारतीय विद्यार्थ्याला अधिकारी एखाद्या कट्टर गुन्हेगारासारखी वागणूक देताना मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. मूळ भारतीय असल्यामुळे मला ते दृष्य़ पाहून अत्यंत वाईट वाटले. पण मी काही करू शकत नाही हे मला जाणवले. त्याने मला खूप वेदना झाल्या, असे कुणाल जैन यांनी पोस्टमध्ये लिहिले.
जैन पुढे लिहितात की, परदेशी विद्यार्थ्यांसोबत हे काही पहिल्यांदाच झालेले नाही. दररोज अशाप्रकारे तीन ते चार विद्यार्थ्यांचे प्रत्यार्पण केले जाते. हे विद्यार्थी भविष्याची स्वप्ने घेऊन अमेरिकेत येतात. पण इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या तपासणीत ते अडकतात आणि त्यांना अशा प्रकारे गुन्हेगारासारखी वागणूक दिली जाते. त्यांच्याकडे व्हिसा असूनही त्यांना अमेरिकेत प्रवेश करु दिले जात नाही. काही तासांतच त्यांना मायदेशी परत पाठवले जाते.
जैन यांनी अमेरिकेतील भारतीय दुतावासाकडे आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडे थेट लेखी तक्रार केली आहे. या विद्यार्थ्याला अमानुष वागणूक का दिली गेली याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
