अवघ्या काही तासांत शस्त्रसंधी मोडली! इस्रायल-इराणमध्ये आरोप-प्रत्यारोप

वॉशिंग्टन – इस्रायल आणि इराण यांच्यात आज युद्धाच्या बाराव्या दिवशी झालेली शस्त्रसंधी अवघी काही तास टिकली. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले करून शस्त्रसंधी मोडीत काढली. इराणने सकाळी इस्रायलवर हल्ले केल्यावर संध्याकाळी इस्रायलने इराणवर हल्ले केले. त्यामुळे शस्त्रसंधी होऊनही दोन्ही देशांतील तणाव संपला नाही. विशष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वप्रथम या शस्त्रसंधीची माहिती जगाला दिली होती. परंतु त्यांनी दिलेल्या मुदतीआधीच शस्त्रसंधी मोडल्याचे कळल्यावर संतापलेल्या ट्रम्पना या दोन देशांना कडक शब्दांत तंबी द्यावी लागली.
इस्रायलने संध्याकाळी इराणची राजधानी तेहरानमधील एका रडार साईटवर हवाई हल्ले केले. ही बातमी कळल्यावर नाटो शिखर परिषदेसाठी व्हाईट हाऊसमधून बाहेर पडताना ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणवर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. ट्रम्प म्हणाले की, शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर लगेच इस्रायलने एवढा मोठा बॉम्ब टाकला. त्यांनी 12 तासांनी शस्त्रविरामाला पूर्णपणे सहमती दर्शवली. पण त्यांनी पहिल्याच तासात बॉम्ब टाकले. त्यामुळे मी इस्रायल आणि इराणवर देखील नाराज आहे. आता बॉम्ब टाकू नका, जर तुम्ही असे केले तर ते शस्त्रसंधीचे उल्लंघन ठरेल. तुम्ही तुमच्या वैमानिकांना आताच परत बोलवा.
ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना फोन करून हल्ला थांबण्याची विनंती केली. नेतन्याहू यांना म्हणाले की, मी हल्ले थांबवू शकत नाही. कारण इराणने आधी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. परंतु नंतर त्यांनी हल्ले थांबवणार असल्याचे सांगितले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या ताज्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, इस्रायल आता इराणवर हल्ला करणार नाही. सर्व इस्रायली विमाने इराणला परततील. कोणाचेही कोणतेही नुकसान होणार नाही. युद्धबंदी लागू आहे.
तर इराणी अध्यक्ष मसूद पझ्श्कियान म्हणाले की, इस्रायलने युद्धबंदीचे उल्लंघन केले नाही, तर त्यांचा देश युद्धबंदीचे उल्लंघन करणार नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पहाटे 3.30 वाजता (भारतीय वेळ सकाळी 9.30) इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीचा दावा केला. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर लिहिले की, सर्वांचे अभिनंदन! इस्रायल आणि इराण यांच्यात पूर्ण युद्धबंदी आतापासून 6 तासांनी लागू होईल. पहिले 12 तास इराण हल्ला करणार नाही. त्यानंतर पुढील 12 तास इस्रायल आपली शस्त्रे खाली ठेवेल आणि युद्ध अधिकृतपणे संपेल. सर्व काही ठीक झाले, ते होईलच. त्यामुळे मी इस्रायल आणि इराण यांचे या दोन्ही देशांचे अभिनंदन करू इच्छितो की, त्यांनी ‌‘12 दिवसांचे युद्ध‌’ संपवण्यासाठी संयम, धैर्य आणि बौद्धिक क्षमता दाखवली. हे युद्ध कदाचित अनेक वर्षांपर्यंत चालू शकले असते. यातून संपूर्ण मध्य-पूर्वेचा विध्वंस झाला असता, पण ते झाले नाही. कधीच होणार नाही. परमेश्वर इस्रायलचे भले करो. इराणचे भले करो. मध्य पूर्वेचे भले करो. अमेरिकेचे भले करो. संपूर्ण जगाचे भले करो.
सकाळी 10.38 वाजताची निर्धारित वेळ संपल्यानंतर ट्रम्प यांनी आणखी एक पोस्ट करत लिहिले की, युद्धबंदी आतापासून लागू होते, कृपया ती मोडू नका. मात्र, ट्रम्प यांनी ही पोस्ट केल्यानंतर अडीच तासात इराणने तेल अवीवसह अनेक शहरांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा इस्रायलने केला. यामुळे या शहरांत सायरन वाजले आणि लोकांना बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला. बेअरशेबा शहरावरील हल्ल्यात काही इमारतींचे मोठे नुकसान झाले. त्यात 4 रहिवाशांचा मृत्यू झाला. तर अनेक जखमी झाले.इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी म्हटले की, त्यांनी इराणने शस्त्रविरामाचे उल्लंघन केले आहे. इराणच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचे निर्देश आम्ही लष्कराला दिले आहेत. यानंतर आधी इस्रायलने आणि नंतर इराणने युद्धबंदीची घोषणा केली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, इस्रायली सैन्याचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. तर इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने निवेदन करत म्हटले की, इराणने शत्रूला पश्चात्ताप करण्यास आणि पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. इराणने युद्धबंदीनंतर आम्ही इराणवर कुठलेही हल्ले केले नाहीत.
13 जून रोजी इस्रायलने ‌‘ऑपरेशन रायझिंग लायन‌’ राबवून इराणच्या लष्करी आणि अणुस्थळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने ‌‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3‌’ राबवून अत्याधुनिक ड्रोन आणि सुपरसॉनिक बेलास्टिक क्षेपणास्त्रांनी इस्रायली शहरांना लक्ष्य केले. त्यामुळे दोन्ही देशांत युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर गेले 11 दिवस दोन्ही देशांमध्ये हल्ले-प्रतिहल्ले चालू होते. रविवारी पहाटे अमेरिकेनेही हस्तक्षेप करत ‌‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर‌’अंतर्गत इराणच्या तीन महत्त्वाच्या अणुऊर्जा केंद्रांवर हवाई हल्ले केले. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणने काल कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर अनेक क्षेपणास्त्रे डागली. यात कतारमधील अल उदेद हवाई तळाचा समावेश होता. यामुळे युद्ध अधिकच चिघळले असतानाच आज अचानक युद्धबंदी जाहीर झाली.
कच्च्या तेलाचे भाव घसरले
इराण-इस्रायल युध्दात अमेरिकेने उडी घातल्यानंतर इराण जगाची कोंडी करण्यासाठी होर्मुज जलमार्ग बंद करेल अशी अटकळ होती. त्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होऊन दर वाढण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकेच्या कतारमधील तळांवर हल्ला केला. त्यामुळे जगाने सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यानंतर आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युध्दबंदीची घोषणा केली. तेलउत्पादक देशांसाठी हे सकारात्मक संकेत असल्यामुळे कच्च्या तेलाच्या प्रति पिंप 81 डॉलरपर्यंत पोहोचलेले कच्च्या तेलाचे दर 79 डॉलरपर्यंत घसरले.