अहमदाबाद- अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान आज दुपारी 1.38 वाजता उड्डाण होताच कोसळले. या दुर्घटनेत विमानातील एक वगळता 241 प्रवासी, पायलट व केबिन क्रू यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमान पूर्णपणे उद्ध्वस्त होऊनही रमेश विश्वासकुमार हा प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील या विमानातून प्रवास करत होते. हे विमान डॉक्टरांच्या चार इमारतींवर कोसळल्याने या अपघातात 20 डॉक्टरांचाही मृत्यू झाला असून 100 हून अधिक डॉक्टर जखमी आहेत. विमानातील मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे. एअर इंडियाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक कोटी देण्याची घोषणा केली आहे.
एअर इंडियाच्या या विमानाने अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी 1.38 वाजता उड्डाण केले. त्यानंतर विमानाने 800 फुटांची उंची गाठली नाही, तोच पाचच मिनिटांत ते विमानतळापासून काही अंतरावर मेघानी भागात कोसळले. या विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज, 1 कॅनेडियन नागरिक होते. त्यात 11 लहान मुले व 2 बालक, 217 प्रौढ, 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर होते. एक प्रवासी वगळून 241 जण दुर्घटनेत मृत्यू झाला. 11 ए या सीटवर बसलेला रमेश विश्वासकुमार या घटनेतून बचावला. त्यामुळे भीषण अपघातात ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय आला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांनी त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. त्याच्या पायाला आणि चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. अहमदाबाद पोलीस आयुक्त जी.एस. मलिक यांनी त्याला दुजोरा दिला आहे. या घटनेत रमेश यांचा भाऊ अजय यांचा मृत्यू झाला. रमेश आणि अजय हे ब्रिटिश नागरिक असून ते कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आले होते.
विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेचच कॅप्टन सुमित सभरवाल यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलला ‘मेडे’ म्हणजे मदत करा असा संदेश दिला. मात्र त्यानंतर विमानाचा संपर्क तुटला आणि मोठी आग लागून विमान क्षणार्धात डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या इमारतींवर कोसळले. अपघातानंतर भीषण स्फोट झाला आणि परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले. या दुर्घटनेत विमानाचे तुकडे झाले. डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या इमारती उद्ध्वस्त झाल्या. इमारतीतील 20 डॉक्टरांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक डॉक्टर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर तातडीने अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. बडोदा आणि सुरत येथूनही बचावपथकांची मदत घेण्यात आली. इमारतीतील गंभीर जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करण्यात आला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा भासल्याने रक्तदात्यांना आवाहन करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेत गुजरातचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. ते तातडीने निघून अहमदाबादला पोहोचले. अमित शहांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यानंतर रुग्णालयात जाऊन रमेशची भेट घेतली. या अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमान कोसळले त्यापासून 200 मीटर अंतरावर माझे ऑफिस आहे. अपघात झाला त्यावेळी मोठा आवाज ऐकू आला. काही सेकंदात धुराचा मोठा लोट आकाशात उसळला. आम्ही अपघाताच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा सर्वत्र धूर आणि आग दिसत होती. सर्वत्र मानवी अवशेष विखुरलेले होते. विमानाचे एक पंख तुटून पडले होते. मृतदेहांचा सडा पडला होता. ते अत्यंत भयानक दृश्य होते.
अहमदाबादच्या शासकीय रुग्णालयात इमारतीतील डॉक्टरांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काही मृतदेहही याच ठिकाणी आणले गेले. यापैकी काही मृतदेहांची ओळखही मृतदेहही याच ठिकाणी आणले गेले. यापैकी काही मृतदेहांची ओळखही पटवता येत नाही. जे लोक वाचले आहेत, त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे डॉ. प्रांजल मोदी यांनी सांगितले.
या भीषण विमान अपघातानंतर एअर इंडियाचे चेअरमन चंद्रशेखरन यांनी टाटा समूहाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट केली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये एन.चंद्रशेखरन म्हणाले की, मी अत्यंत दु:खाने पुष्टी करतो की, अहमदाबादहून लंडन गेटविक येथे जाणारे एअर इंडिया 171 विमान दुर्दैवी अपघातात सापडले आहे. या अत्यंत हादरवून टाकणाऱ्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबिय आणि प्रियजन यांच्याप्रती आम्ही संवेदना आणि शोक व्यक्त करतो.
गुजरात आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव धनंजय द्विवेदी म्हणाले, अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे विद्यार्थी वसतिगृह, स्टाफ क्वार्टर आणि इतर निवासी भाग त्या परिसरात आहेत जिथे विमान कोसळले. त्या परिसरातील रहिवासीही जखमी झाले आहेत. सुमारे 50 जखमी व्यक्तींना अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये डीएनए तपासणीची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे विमानातील प्रवाशांचे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक, विशेषतः पालक आणि मुले, यांना विनंती आहे की, त्यांनी आपले नमुने संबंधित ठिकाणी जमा करावेत. जेणेकरून पीडितांची लवकरात लवकर ओळख पटवता येईल.
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी एक्स पोस्ट करत म्हणाले की, अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताची बातमी ऐकून मी स्तब्ध झालो. या विमानात 242 प्रवासी होते. त्यामध्ये एक कॅनेडियन नागरिकही होता. कॅनडाचे वाहतूक अधिकारी भारतीय समकक्षांशी सतत संपर्कात आहेत आणि या भीषण दुर्घटनेबाबतची माहिती मला नियमितपणे दिली जात आहे.
अपघातापूर्वी प्रवाशाची बिघाडाबाबत तक्रार
मुंबई – विमानात तांत्रिक बिघाड असल्याची तक्रार आकाश वातसा नावाच्या एका प्रवाशाने अपघाताच्या काही क्षण आधी एक्स पोस्टमधून केली होती. त्याने या विमानातून दिल्ली ते अहमदाबाद असा प्रवास केला होता. त्यानंतर हेच विमान अहमदाबादहून लंडनसाठी रवाना झाले, असा दावा त्याने केला. विमानात एसी बंद होता. स्क्रीन टच टीव्ही काम करत नव्हते. फक्त स्क्रीन चालू होती, पण काहीही दिसत नव्हते. लाईटही बंद आहे. क्रू मेंबर्सना बोलावण्यासाठी असलेले कॉल बटण देखील काम करत नव्हते, असे वातसा याने पोस्टमध्ये लिहिले होते.
भूमीबेन चौहान वाचल्या
लंडनला राहणाऱ्या भूमीबेन चौहान या काही महिन्यांपूर्वी अहमदाबादला आल्या होत्या. त्या या विमानाने लंडनला परत निघाल्या होत्या, पण अहमदाबादमध्ये ट्रॅफिक जॅम झाल्याने त्या विमानतळावर 10 मिनिटे उशिरा पोहोचल्या. तोपर्यंत विमानाची दारे बंद झाली होती. त्या विमानतळावरून परत निघालेल्या असतानाच त्यांना दुर्घटनेची माहिती मिळाली. सुदैवाने त्या वाचल्या.
विशेष वंदे भारत गाड्या सोडल्या
मुंबई – विमान अपघातानंतर मदतीसाठी रेल्वे मंत्रालयाने विशेष वंदे भारत रेल्वे गाड्यांची घोषणा केली. विशेष वंदे भारत रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने राज्यातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून गाड्यांचे नियोजन केले. याशिवाय पश्चिम रेल्वेची आपत्ती व्यवस्थापन पथकेही तैनात केली.
काँग्रेसकडून तीन दिवसांचा दुखवटा
मुंबई – मृतांना श्रद्धांजली म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पुढील तीन दिवस दुखवटा पाळण्यात येणार आहे. तसेच राज्यभरात पक्षाच्या वतीने आयोजित केलेले मशाल मोर्चे तात्पुरते स्थगित करण्यात आले. 15 जूननंतर मशाल मोर्चाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे.
भावना पटेलकडून बहिणीचा शोध
अहमदाबाद – एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील जखमी प्रवाशांना अहमदाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर रुग्णालयात प्रवाशांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकजण आपल्या नातेवाईकांचा शोध घेत होता. भावना पटेल या महिला रुग्णालयात आपल्या बहिणीचा शोध घेत होत्या. त्या म्हणाल्या की, माझी बहीण लंडनला जात होती. दुपारी 1.10 वाजता तिचे विमान होते. पण लंडनला पोहोचण्यापूर्वीच विमानाचा अपघात झाला. मला माझी बहीण भेटली नाही. मी रुग्णालयात तिचा शोध घेत आहे.
दीपक पाठक याचे आईशी बोलणे झाले होते
बदलापूर- मृत को-पायलट दीपक पाठक यांच्या कुटुंबाने माध्यमांना सांगितले की, कुठेही जाण्याआधी तो पहिला कॉल आम्हाला आणि आईला करायचा. आज त्याचे मोबाईलवरुन आईशी बोलणे झाले होते. आताही आम्ही त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आहोत त्याला रिंग जात आहे. परंतु समोरून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आम्हाला अजूनही आशा आहे की, दीपक जिवंत आहे.
जोपर्यंत आम्हाला अधिकृतरित्या काही कळत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही.
एअर इंडियाचे प्रोफाईल डिस्प्ले फोटो ब्लॅकआऊट
मुंबई – या भीषण अपघातानंतर एअर इंडियाने सोशल मीडियावरील त्यांचे डिस्प्ले फोटो ब्लॅकआऊट केले आहेत. त्यांनी इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्स वरील एअर इंडियाचे सिग्नेचर रेड प्रोफाईल पिक्चर काढून टाकले आणि सर्व माध्यमांवर ब्लॅकआऊट डिस्प्ले फोटो लावले आहेत.
जेवणासाठी हॉस्टेलला आलेल्या
इंटर्न डॉक्टरांवर काळाचा घाला
अहमदाबाद – एअर इंडियाचे हे विमान डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या 4 इमारतींवर कोसळले. दुपारची वेळ असल्याने अनेक इंटर्न डॉक्टर जेवणासाठी हॉस्टेलवर परतले होते. विमान कोसळल्याची घटना घडली त्यावेळी तेथे 50 ते 60 इंटर्न डॉक्टर होते, अशी माहिती आहे. त्यापैकी अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. यामध्ये 6 डॉक्टरांचे मृतदेह बाहेर काढले. या अपघातामुळे लागलेल्या आगीमुळे वसतिगृहाची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि मृतदेह, जेवणाची ताट सगळीकडे विखुरले होते. या कॉलेजमध्ये रमिला नावाच्या महिलेचा मुलगाही शिक्षण घेत आहे. तो या अपघातामधून त्याने दाखवलेल्या धाडसामुळे वाचला. विमान कोसळताच त्याने इमारतीच्या दुसऱ्या मजलावरून खाली उडी मारली. अपघाताचे वृत्त कळताच त्याच्या आईने त्याला फोन केला असता त्याने आपण सुखरुप असल्याचे सांगितले.
वैमानिकाने ‘मेडे’ कॉल दिला?
वैमानिक साबरवाल यांनी विमान उड्डाणानंतर लगेच ‘मेडे’ कॉल दिला असे म्हटले जाते. मेडर या फ्रेंच शब्दावरून मेडे हा शब्द आला. मेडे म्हणजे मदत करा. साधारणपणे वैमानिक संकटात आला तर तो तीन वेळा मेडे, मेडे, मेडे (ारूवरू) असे कॉल देतो. विमानाला आग लागली, वैमानिकाची प्रकृती बिघडल्याने तो विमान चालवू शकत नसेल, केबिनमध्ये ऑक्सिजन संपले, विमानाला इजा झाली किंवा विमानाचे इंजिन बिघडले तर हा मेडे कॉल दिला जातो.
समस्यांनी घेरलेले बोईंग विमान
ड्रिमलायनर बोईंग 787 ही विमाने अमेरिकेच्या बोईंग कमर्शियल एअरप्लेन्स या कंपनीची आहेत. 15 डिसेंबर 2009 रोजी या प्रकारच्या पहिल्या विमानाने उड्डाण केले. 26 एप्रिल 2004 रोजी या कंपनीने ऑल निप्पॉन एअरवेजसाठी या विमानाचे उत्पादन सुरू केले. मात्र यात अनंत अडचणी येऊन 2009 साली पहिले उड्डाण झाले. या विमानाचे वैशिष्ट्य म्हणजे हे 20 टक्के कमी इंधन वापरते. या विमानाच्या कॉकपिटला चार खिडक्या असतात त्यावरून या विमानाची ओळख लगेच पटते. साधारणपणे एका विमानात एकूण 248 प्रवासी बसतात. सुरुवातीला बोईंगच्या इंजिनमध्ये अनेकदा समस्या आढळल्या, पण कंपनीने त्यात वेळोवेळी सुधारणा केली. 2013 मध्ये इंधन गळतीची समस्या लक्षात आली. यामुळे जपान एअरलाईन आणि युनायटेड एअरलाईनची दोन उड्डाणे रद्द केली होती. त्यानंतर अमेरिकेच्या वाहतूक सुरक्षा मंडळाने या विमानांची चौकशी सुरू केली. जपानच्या वाहतूक मंत्रालयाने चौकशी केली, पण विमानात दोष आढळला नाही. लिथियम बॅटरीची समस्या, गळती, विमानाचा वेग कमी दाखवला जाणे, झपडांची समस्या अशा अनेक समस्या या विमानाच्या बाबतीत येत राहिल्या. 2014, 2016, 2021मध्ये नॉर्वेजियन एअरलाईन, ब्रिटिश एअरलाईन, लाताम एअरलाईनच्या बोईंग विमानात समस्या निर्माण झाली होती.
787 बोईंगला नाव देण्यासाठी 160 देशांत मतदान झाले होते. पाच लाख नागरिकांनी मतदान केले. ग्लोबल क्रूझर, इलायनर, स्टार्टोक्लायंबर, स्टारलायनर, ड्रीमलायनर ही नावे सुचविण्यात आली. त्यातून ड्रीमलायनर हे नाव अंतिम करण्यात आले.
मन सुन्न करणारी घटना
पंतप्रधान मोदींची पोस्ट
पंतप्रधान मोदी एक्स पोस्ट करत म्हणाले की, अहमदाबादमधील ही घटना सुन्न करणारी आणि अत्यंत दु:खद आहे. ही घटना शब्दांपलीकडची हृदयद्रावक आहे. या दु:खद क्षणी माझ्या भावना अपघात पीडित व्यक्तींबरोबर आहेत. मी मंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. पीडितांना सर्वतोपरी मदतीचे प्रयत्न केले जात आहेत.
राष्ट्रपती मुर्मू एक्स पोस्ट करत म्हणाल्या की, विमान अपघाताची बातमी ऐकून मला अतिशय दुःख झाले. ही हृदयद्रावक दुर्घटना आहे. या अपघातामुळे बाधित झालेल्या लोकांविषयी माझ्या सहवेदना आहेत. या अतिव दुःखाच्या क्षणी संपूर्ण राष्ट्र पीडितांसोबत आहे.
विमानात दोन मराठी क्रू मेंबर
अपघातग्रस्त विमानातील 12 क्रू मेंबर्सपैकी दोन क्रू मेंबर अपर्णा महाडिक आणि मैथिली पाटील या मराठी होत्या. मैथिली पाटील आणि अन्य एक क्रू मेंबर इरफान शेख हे मुंबईची रहिवासी होते. तर अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा भाचा अमोलच्या पत्नी आहेत. अमोल एअर इंडियात वैमानिक आहेत.
विमानाचे कमांडिंग पायलट कॅप्टन सुमीत सभरवाल आणि सह-पायलट क्लाईव्ह कुंदर विमान चालवत होते. सुमीत सभरवाल यांना 8200 तासांचा उड्डाण अनुभव होता. फर्स्ट ऑफिसर क्लाईव कुंदर यांच्याकडे 1100 तासांचा अनुभव होता. श्रद्धा धवन, अपर्णा महाडिक ह्या सीनियर केबिन क्रू होत्या. सईनीता चक्रवर्ती, नगंथोई शर्मा कोंगब्राइलटपम, बदलापूरचा दीपक पाठक, मैथिली पाटील, इरफान शेख, लामनुनथेम सिंग्सन, रोशनी सोनगारे, मनीषा थापा हे केबिन क्रू होते. हे सर्व क्रू मेंबरवर प्रवाशांची सुरक्षा, सेवा व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रोटोकॉलची जबाबदारी होती.
3 मराठी प्रवासी
या दुर्घटनेत पंढरपूरच्या सांगोल्यातील महादेव आणि आशा पवार या ज्येष्ठ दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर मयूर पाटील हादेखील विमानात होता.
