इस्रायलचा इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ला! सेनेचे प्रमुख ठार ! इराण बदला घेणार

तेहरान- एका बाजूला गाझापट्टीत संघर्ष सुरू असतानाच आज पहाटे इस्रायलने इराणचे अणुऊर्जा केंद्र व सैनिकी तळांवर 200 फायटर जेटने जबरदस्त हल्ले केले. इराणच्या तेहरान व आजूबाजूच्या शहरांमधील नागरी वस्त्यांवरही हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख मोहम्मद घोरी व इराणच्या इस्लामिक क्रांतीकारी सेनेचा प्रमुख हुसैन सलामी यांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच काही अणुऊर्जा संशोधकांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. इराणने यावर संतप्त होऊन बदला घेण्याची धमकी दिली आहे.

इस्रायलच्या रायझिंग सन या मोहमेअंतर्गत हे हल्ले करण्यात आल्याचे इस्रायलचे पंतप्रधान नेत्यन्याहू यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, इस्रायलच्या अस्तित्वाला धोका असलेल्या इराणवर हल्ले करण्यात आले असून, आवश्यकता पडल्यास अधिक हल्ले केले जातील. इराणने उच्च प्रतीचे अणू तंत्रज्ञान व युरेनियम विकसित केले आहे. यामुळे ते किमान 15 अणूबॉम्ब तयार करू शकतात. इराणचा उद्देश इस्रायलचे अस्तित्व नष्ट करण्याचा आहे. आम्ही आत्मरक्षणासाठी हे हल्ले केले आहेत. इस्रायलच्या सर्व सीमांवर सैन्य तैनात करण्यात आले आहे. जर आम्हाला कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. तेहरानपासून 225 किलोमीटर दूर असलेल्या नातांज शहरावर हल्ले करण्यात आले. हे इराणच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे स्थळ असून येथील अनेक महत्त्वाचे अणूसंशोधकांचाही यामध्ये मृत्यू झाला आहे. याबरोबरच इस्रायलने इराणच्या तबरीज, करमानशाह, तेहरान, अराक, नतांज व इस्फहान या शहरांवर हल्ले केले.

इस्रायलने आज इस्फहान शहरावरही हल्ले केले. हे इराणचे प्रमुख अणुकेंद्र असून, त्यांचा युरेनियमचा साठाही याच ठिकाणी आहे. एप्रिल 2021 मध्ये इस्रायलने या अणुकेंद्रांवर सायबर हल्ले केल्याचा आरोपही इराणने केला होता. तेहरान व इतर शहरांमधील नागरी वस्त्यांवर आणि क्रांतीकारी सेनेच्या मुख्यालयावरही हल्ले केले. या हल्ल्यात इराणच्या अणूकार्यक्रमाचे माजी प्रमुख फिरेदून अब्बासी व तेहरान इथे राहणार्‍या इस्लामिक आझाद विद्यापीठाचे अध्यक्ष मोहम्मद मेहदी यांचाही मृत्यू झाला आहे. इराणचे प्रमुख अयातुल्ला खोमेनी यांनी इशारा दिला आहे की, इस्रायलला याची किंमत मोजावी लागेल. इराणची सशस्त्र सेना इस्रायलला शिक्षा दिल्याशिवाय
राहणार नाही.

दरम्यान अमेरिकेने या हल्ल्यांशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो यांनी म्हटले आहे की, इस्रायलची ही कारवाई एकतर्फी असून आम्ही त्यांच्यात सहभागी नाही. आम्हाला केवळ अमेरिकन सैन्याच्या सुरक्षेची काळजी आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, या दोन्ही देशांच्या संघर्षावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. या दोन्ही देशातील भारतीय नागरिक सुरक्षित राहण्यासाठी काही मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. इराणमधील हल्ल्यानंतर एअर इंडियानेही आपल्या अनेक विमानांचे मार्ग बदलले.

इराणवर हल्ले केल्यानंतर इस्रायलने आपल्या देशात आपत्काल घोषित केला आहे. त्यानुसार सर्व विमाने देशाबाहेर पाठवण्यात आली आहेत. देशातील सर्व विमानतळे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही विमाने सायप्रस तर काही युरोपातील विविध देशांमध्ये पाठवण्यात आली आहेत. रुग्णालयांना तात्पुरत्या भूमीगत केंद्रांमध्ये बदलण्यात आले असून, आवश्यकता नसलेल्या ठिकाणी आरोग्य सेवा बंद करण्यात आली आहे. आरोग्याचा गंभीर प्रश्न असल्याशिवाय रुग्णालयांमध्ये न जाण्याच्या सूचनाही नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

इराणचा पलटवार

इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणच्या शंभरहून अधिक ड्रोनने इस्रायलवर हल्ले केल्याचे वृत्त आहे. इस्रायलच्या लष्कराने दावा केला आहे की, आमच्या लढाऊ विमानांनी इराणचे ड्रोन निष्प्रभ केले असून, त्यांचा एकही ड्रोन आमच्या सीमेच्या आतही येऊ शकला नाही.