नवी दिल्ली- उपराष्ट्र्पती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काल रात्री उशिरा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सादर केला. आज दुपारी राष्ट्रपती मुर्मू (Murmu) यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. या राजीनामापत्रात त्यांनी प्रकृतीचे कारण नमूद केले. मात्र पूर्ण दिवस राज्यसभेचे कामकाज व्यवस्थित चालविल्यानंतर अचानक प्रकृती कशी बिघडली? हा राजीनामा रहस्यमय आहे असा दावा विरोधी पक्षातील नेत्यांनी केला. या राजीनाम्यावर अनेक प्रश्न उपस्थित करत आज संसदेत गदारोळही झाला. मात्र केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल (Anupriya patel) यांनी धनखड यांच्या राजीनाम्याबद्दल सरकारला कल्पना नसल्याचे स्पष्ट केले.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्सवर लिहिले की, काल दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास जगदीप धनखड यांच्या अध्यक्षतेत राज्यसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीला सभागृह नेते जे. पी. नड्डा आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. थोड्या वेळाच्या चर्चेनंतर पुढची बैठक संध्याकाळी साडेचार वाजता घेण्याचे ठरले. त्यावेळी पुन्हा एकदा धनखड यांच्या अध्यक्षतेत समितीचे सदस्य बैठकीला हजर झाले. सर्वजण नड्डा आणि रिजिजू यांची वाट पाहत होते, पण ते आलेच नाही. आश्चर्याची बाब म्हणजे या दोन्ही मंत्र्यांनी संध्याकाळच्या बैठकीस उपस्थित राहणार नाही याबाबत धनखड यांना कोणतीही माहिती दिली नाही. या गोष्टीचे त्यांना मनापासून वाईट वाटले आणि त्यांनी कामकाज सल्लागार समितीची बैठक पुढे ढकलून आज दुपारी 1 वाजता ठेवली. त्यात पंतप्रधान मोदी काल दिवसभर संसद भवनात होते. त्यांनी दोन बैठका घेतल्या. या बैठकीत न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोगाची चर्चा झाली की, धनखड यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली याचा शोध सुरू आहे. यावरून स्पष्ट होते की, काल दुपारी 1 ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत नक्कीच काही गंभीर घडले. ज्यामुळे जे. पी. नड्डा आणि किरेन रिजिजू यांनी मुद्दामहून संध्याकाळच्या बैठकीस उपस्थित राहणे टाळले. त्यानंतर जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांनी यामागे स्वतःच्या प्रकृतीचे कारण दिले. या गोष्टीचा आदर केला पाहिजे. पण खरी गोष्ट अशी आहे की यामागे काही खोल कारण असू शकते. धनखड यांनी नेहमीच 2014 नंतरच्या भारताची प्रशंसा केली. पण त्याचवेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी स्पष्टपणे आवाज उठवला. त्यांनी सार्वजनिक जीवनातील वाढत्या अहंकारावरही टीका केली आणि न्यायपालिकेची जबाबदारी व संयम यावर भर दिला. सध्याच्या जी दोन सरकारच्या काळातही त्यांनी शक्य तितक्या प्रमाणात विरोधकांना स्थान देण्याचा प्रयत्न केला.त्यांना नियम, प्रक्रिया आणि संसदीय शिस्त यांचा कटाक्षाने आदर होता. पण त्यांच्या भूमिकेमध्ये सतत याची उपेक्षा होत असल्याची भावना त्यांना होती. धनखड यांचा राजीनामा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी अनेक गोष्टी स्पष्ट करतो. त्याचबरोबर ज्यांनी त्यांना उपराष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचवले त्या व्यक्तींच्या हेतूंवरही तो गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतो.
काँग्रेस नेते हरीश रावत म्हणाले की,जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या राजीनाम्यामागे असाधारण कारण असू शकते. माझ्या मते, सरकारमध्ये कुठेतरी काहीतरी असे घडत होते, ज्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:च्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेतला. तर खासदार मनीष तिवारी म्हणाले की,उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा रहस्यमय आहे. कारण ते देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या घटनात्मक पदावर आहेत.ज्या अनपेक्षित पद्धतीने त्यांनी राजीनामा दिला. ती गोष्ट खरोखरच गोंधळात टाकणारी आहे. मी उपराष्ट्रपतींच्या प्रकृतीविषयी हस्तक्षेप करू इच्छित नाही. जर ही बाब खरोखरच आरोग्याशी संबंधित असेल तरीसुद्धा, त्यांनी देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या घटनात्मक पदावर विराजमान असल्यामुळे, या निर्णयामागील परिस्थितीबाबत काही स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे.तर खासदार भूपेश बघेल यांनी हा निर्णय राजकीय वादळाचे संकेत असल्याचे विधान केले.
दरम्यान उपराष्ट्रपती राजीनाम्यानंतर भाजपाच्या कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया दिली नाही. राष्ट्रपती मुर्मू यांनी उपराष्ट्रपतींचा राजीनामा स्विकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर लिहिले की, जगदीप धनखड यांना भारताचे उपराष्ट्रपती तसेच अनेक महत्त्वाच्या भूमिका निभावत राष्ट्रसेवा करण्याची संधी लाभली आहे. त्यांच्या उत्तम आरोग्याची मी मनापासून प्रार्थना करतो.
राजनाथ सिंह नवे उपराष्ट्रपती?
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे लवकरच 75 वर्षांचे होत आहेत. भाजपाच्या नव्या नियमांनुसार या वयात त्यांनी सक्रिय राजकारणापासून दूर जात नव्या रक्ताला संधी द्यायची आहे. यामुळे आता राजनाथ सिंह यांना उपराष्ट्रपती पद देऊन त्यांना सल्लागार मंडळात पाठवण्याचा निर्णय झाल्याचे कळते.
