नवी दिल्ली- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेले ऑपरेशन सिंदूर यावरील सविस्तर चर्चेदरम्यान विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज प्रत्युत्तर दिले. पहलगाममध्ये ज्या दिवशी दहशतवादी हल्ला झाला त्या दिवसापासूनच पंतप्रधान मोदी यांनी भारतीय सैन्यदल आणि सर्व सुरक्षा दलांशी चर्चा करून रणनीती तयार केली. कोणत्याही परिस्थितीत दहशतवादी देशाबाहेर पळून जाऊ नयेत यासाठी दिवस-रात्र त्यांचा माग काढला आणि अखेर तीन दहशतवाद्यांना शोधून काढून काल त्यांचा खात्मा केला, असे अमित शहा म्हणाले.
पहलगाम हल्ल्यावरून पंतप्रधान मोदी आणि सरकारच्या नियतीवर शंका उपस्थित करणाऱ्या विरोधकांना मी सांगू इच्छितो की, ज्या दिवशी हल्ला झाला त्याच दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता मी स्वतः श्रीनगरमध्ये दाखल झालो होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच दिवशी रात्री भारतीय लष्कर, सीआरपीएफ, बीएसएफ आणि जम्मू आणि काश्मीर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत दहशतवाद्यांविरूध्द कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी लष्कराला सर्वाधिकार देण्यात आले. ज्या लोकांनी दहशतवाद्यांना आश्रय दिला त्यांचा माग काढण्यात आला. असे दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले जे आजही आमच्या कैदेत आहेत. त्यांनी दहशतवाद्यांबद्दल महत्त्वाची माहिती दिली. रात्रंदिवस दहशतवाद्यांचा माग काढण्यात आला. अखेर जेव्हा त्यांचे ठिकाण स्पष्टपणे कळले तेव्हा त्यांचा खात्मा करण्यात आला.सुलेमान , अफगाण आणि जिब्रान या तिघांना लष्कराच्या जवानांनी कंठस्नान घातले. हे कट्टर दहशतवादी जैश-ए-महंमद, लष्कर-ए-तोयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते. या तिघांपैकी सुलेमान आणि अफगाण या दोघांचा पहलगाम हल्ल्यात सहभाग होता. त्यांची ओळख पटवण्यासाठी जे जे करणे शक्य होते ते आम्ही केले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या रायफलींची आणि त्याच्या रिकामी पुंगळ्यांची फोरेन्सिक चाचणी करण्यात आली. या रायफली खास विमानाने चंदिगडला पाठवण्यात आल्या. तिथे या रायफलींमधून गोळ्या झाडून त्या रिकाम्या पुंगळ्यांची पुन्हा चाचणी करून आधीच्या पुंगळ्यांशी त्या जुळतात की नाही याची खातरजमा करून घेतली तेव्हाच आज मी या सभागृहात अत्यंत जबाबदारीने ही माहिती देत आहे, असे शहा म्हणाले. शहा यांनी सुमारे तासाभराच्या भाषणात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी, दिवंगत राजीव गांधी यांच्या सरकारांवर सडकून टीका केली. पंडित नेहरूंनी देशाची फाळणी मान्य केली त्या पापाची फळे आपण मागील 70-75 वर्षे भोगत आहोत. पाकव्याप्त काश्मीर हे काँग्रेसचेच पाप आहे. पाकव्याप्त काश्मीर 1971 मध्येच जर ताब्यात घेतले असते तर उरी, पुलवामा आणि पहलगाम झालेच नसते असे शहा म्हणाले.
सन 2014 मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून दहशतवादावर बऱ्यापैकी अंकूश लागला असून दहशतवादी कारवाया केवळ काश्मीरपुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. सन 2014 पासून आजपर्यंत देशाच्या अन्य कुठल्याही भागात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही, असा दावा शहा यांनी केला.
1962 च्या युध्दात अक्साई चीनचा 38 हजार वर्ग किलोमीटरचा भूभाग आपल्या ताब्यात आला होता. तो भूभाग आपण राखायला हवा होता. अमेरिकेनेही तसा प्रस्ताव दिला होता. मात्र चीनला वाईट वाटेल असे पंडित नेहरु यांनी सांगितले आणि 38 हजार वर्ग किलोमीटरचा भूभाग चीनला देऊन टाकला. या इतिहासातील मोठ्या चुका आपल्याला सुधारायच्या आहेत, असे म्हणत शहा यांनी काँग्रेसच्या नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
मोदींची प्रतिमा उजळवण्यासाठी
कारवाई! राहुल गांधींचा घणाघात
ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, कोणत्याही कारवाईसाठी राजकीय इच्छाशक्ती व लष्कराला कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार देणे आवश्यक असते. ऑपरेशन सिंदूरमध्ये पहिला हल्ला केल्यानंतर संरक्षणमंत्रीच सांगतात की, आम्ही तुमच्यावर यापुढे हल्ले करणार नाही. ही शरणागती कशासाठी होती. पाकिस्तानात पाठवलेल्या वायुदलाच्या वैमानिकांना पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ले न करण्याच्या सूचना होत्या हे म्हणजे हात बांधून हल्ला करायला पाठवण्यासारखे आहे. जगातील सर्व देशांनी दहशतवादाचा निषेध केला मात्र एकाही देशाने पाकिस्तानचा निषेध केला नाही. ज्या पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी हा हल्ला घडवून आणला त्यांच्याबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी बैठक घेतली. तीन देशांच्या दहशतवादविरोधी बैठकीला ते उपस्थित होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण मध्यस्थी करून युद्ध थांबवले हे वाक्य 26 वेळा म्हटले. मात्र आपल्या पंतप्रधानांनी त्यांचे एकदाही खंडन केले नाही. त्यांनी एकदा तरी या सदनात हे सांगावे की ट्रम्प हे खोटे बोलत आहेत. त्यांनी मध्यस्थी केली नाही. भारताच्या परराष्ट्र धोरणात चीन व पाकिस्तानला वेगवेगळे ठेवण्यात आले होते. तेही पाळण्यात आले नाही. वास्तविक या कारवाईत लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य द्यायला हवे होते. ते दिले गेले नाही. ऑपरेशन सिंदूर हे केवळ पंतप्रधानांची प्रतिमा उजळण्यासाठी केले होते, मोदींच्या प्रतिमेपेक्षा देश मोठा आहे. तुमच्या प्रतिमेसाठी देशाचा बळी देऊ नका.
पर्यटकांना वाऱ्यावर सोडले
प्रियंका गांधी यांची टीका
पहलगाम हल्ल्यावरील चर्चेत सहभागी होताना काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर संयमी शब्दांत अत्यंत बोचरी टीका केली. पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर विश्वास ठेवून पहलगामला गेलेल्या पर्यटकांना सरकारने अक्षरशः वाऱ्यावर सोडले, अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. पहलगाम हल्ल्याच्या आधी झालेल्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात खूप भाषणे केली. काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद आम्ही पूर्णपणे नष्ट केला आहे, असे दावे केले.
त्यांच्या या दाव्यांवर विश्वास ठेवून पहलगामला गेलेल्या त्या पंचवीस भारतीयांना मात्र सरकारने कसलीही सुरक्षा पुरविली नाही.या पर्यटकांना सरकारने देवाच्या भरवशावर अक्षरशः वाऱ्यावर सोडले. दहशतवादी आले आणि आपल्या नागरिकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या. सुमारे तासभर दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी थैमान मांडले. त्यांना रोखण्यासाठी सरकारचा एकही सैनिक तिथे तैनात नव्हता. पर्यटकांसाठी प्रथमोचाराची सोय नव्हती. ज्यांचे आप्त त्यांच्या डोळ्यासमोर मारले गेले ते लोक जीव मुठीत धरून कसेबसे बैसरनवरून पळून आले. त्यांनी सांगितले की या संपूर्ण प्रवासात त्यांना कुठेच एकही भारतीय सैनिक दिसला नाही.ही विदारक वस्तुस्थिती समोर असताना पंतप्रधान मोदी केवळ पोकळ भाषणे देण्यात मग्न आहेत. त्यांना हे कोणी तरी सांगण्याची गरज आहे की देशाला तुमच्या पोकळ भाषणांची नव्हे तर ठोस कृतीची गरज आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
