पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या पंजाबमधील युट्यूबरला अटक

चंदीगड – पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पंजाब पोलिसांनी युट्यूबर जसबीर सिंग याला अटक केली आहे. जसबीर सिंग हा रूपनगर जिल्ह्यातील महालन गावचा रहिवासी आहे. त्याच्या जान महल या युट्यूब चॅनलला दहा लाखांहून अधिक सबस्क्राइबर आहेत. तो २०२०, २०२१ आणि २०२४ साली तीन वेळा पाकिस्तानला गेला होता.

जसबीर सिंग हा आयएसआय एजंट हसन अली उर्फ जट्ट रंधावा याच्या संपर्कात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याचसोबत त्याचे हरियाणातून अटक करण्यात आलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि पाकिस्तान उच्चायुक्तालयातून हाकलण्यात आलेला अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश यांच्याशीही संबंध होते. तपासादरम्यान जसबीरच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये अनेक पाकिस्तानी नंबर सापडले. त्याने काही डेटा डिलीट केल्याचेही आढळले आहे. त्याचा मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. ज्योती मल्होत्राची अटक झाल्यानंतर पोलिसांनी जसबीरवर संशय घेऊन तपास सुरु केला होता.

मोहाली येथील स्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेलने जसबीर सिंगविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले की, जसबीर सिंगने दानिशच्या आमंत्रणावरून दिल्लीत आयोजित पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात त्याने पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी आणि ब्लॉगरशीही भेट घेतली.