भारताची ऐतिहासिक भरारी! शुक्ला अंतराळ स्थानकात दाखल


फ्लोरिडा- राकेश शर्मा यांच्यानंतर 41 वर्षांनी अंतराळात झेपावलेले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) पोहोचले. काल पृथ्वीवरून प्रक्षेपण झाल्यावर 28 तासांनी अंतराळवीरांना घेऊन जाणारी ड्रॅगन कॅप्सुल आज संध्याकाळी चार वाजता यशस्वीरित्या आयएसएसशी जोडले गेले. संपूर्ण देशासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला. शुभांशू शुक्ला हे आयएसएसवर गेलेले पहिले भारतीय ठरले आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात प्रवेश करताच शुभांशू शुक्ला यांचे तिथे आधीपासून असलेल्या अंतराळयात्रींनी स्वागत केले. आयएसएसवरून आपला पहिला संदेश त्यांनी हिंदीमध्ये पाठवला. या संदेशात त्यांनी म्हटले की, तुमच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सुरक्षितपणे पोहोचलो आहे. डोके जड वाटत आहे आणि थोडी अस्वस्थता आहे. परंतु या खूप क्षुल्लक गोष्टी आहेत. काही दिवसांत आपल्याला त्याची सवय होईल. पुढील 14 दिवस इथेच राहून अनेक वैज्ञानिक प्रयोग करेन. तुमच्या संपर्कातही राहीन. मी माझ्या खांद्यावर भारतीय तिरंगा घेऊन चाललो आहे. मला विश्वास आहे की पुढचे 14
दिवस रोमांचक असतील. जय हिंद, जय भारत.
ॲक्सियम मिशन-4 अंतर्गत काल दुपारी वाजता अमेरिका, हंगेरी, पोलंडच्या अंतराळयात्रींसह भारताचे शुभांशू शुक्ला हेदेखील अंतराळात रवाना झाले होते. त्यांच्या कॅप्सुल यानाला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचायला 28 तास लागणार होते. नियोजित वेळापत्रकानुसार संध्याकाळी साडेचार वाजता ते तिथे पोहोचणार होते. परंतु ते दुपारी 4.00 वाजता म्हणजे अर्धा तास आधीच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. हे डॉकिंगचे थेट प्रक्षेपण पाहायला शुभांशूचे आईवडील उपस्थित होते. शुभांशू आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचताच त्यांनी आनंद साजरा केला. शुभांशू आता 14 दिवस अंतराळ स्थानकावर राहणार आहेत. ते या काळात विविध प्रयोग करणार आहेत.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचण्याच्या आधी शुभांशू यांनी अंतराळातून पृथ्वीवर लाईव्ह संवाद साधला. यात ते म्हणाले की, अंतराळातून नमस्कार! माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत इथे येणे हे रोमांचकारी आहे. काल मी 30 दिवसांच्या क्वारंटाईननंतर लॉन्चपॅडवरील कॅप्सूलमध्ये बसलो होतो तेव्हा आपल्याला फक्त जायचे आहे, एवढाच विचार माझ्या मनात होता. पण जेव्हा राईड सुरू झाली तेव्हा असे वाटले की, तुम्ही सीटवर मागे ढकलले जात आहात. ती एक अद्भूत राईड होती आणि मग अचानक सर्व काही शांत झाले. शांततेच्या पोकळीत तुम्ही तरंगत असता. या प्रवासात माझ्याबरोबर असलेल्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. की ही एकट्यादुकट्याची कामगिरी नाही, तर हे सर्वांचे सामूहिक यश आहे. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो. कुटुंब आणि मित्रांचाही पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या सर्वांमुळे हे सर्व शक्य झाले आहे. आम्ही व्हॅक्यूममध्ये प्रवेश केला तेव्हा मला सुरुवातीला फारसे चांगले वाटत नाही. पण कालपासून मला सांगण्यात आले आहे की, मी खूप झोपलो होतो. हे एक चांगले लक्षण आहे. मी या वातावरणाशी चांगल्या प्रकारे जुळवून घेत आहे. देखाव्यांचा आनंद लुटत आहे. हा संपूर्ण अनुभव आनंददायी आहे. हे एखाद्या लहान मुलासारखे शिकणे आहे. नवीन पावले, चालणे,
स्वतःवर नियंत्रण ठेवणे, खाणे, सर्वकाही. हे एक नवीन वातावरण आहे, नवीन आव्हान आहे आणि मी माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत हा अनुभव खूप एन्जॉय करत आहे.