वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर काही दिवसांपूर्वी 25 टक्के आयात शुल्क लावल्यावर आज आणखी 25 टक्के लावून कर 50 टक्केवर नेला . भारत रशियाशी व्यापार बंद करत नसल्याने ट्रम्पनी चिडून भारतीय वस्तूंवर आणखी 25 टक्के शुल्क लादण्याची घोषणा केली. अमेरिकेने आता भारतावर लादलेला एकूण 50 टक्के आयात कराच्या आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. हा आदेश 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी ( Narendra Modi) आता चीनच्या दौऱ्यावर जाणार असल्याने सर्वांचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.
30 जुलै रोजी अमेरिकेने भारतावर पहिल्यांदा 25 टक्के आयात कर लावला होता. त्यावेळी भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे भारताला अतिरिक्त दंड लावणार असल्याचे म्हटले होते. मात्र, भारताने रशियाकडून तेल खरेदी पूर्ण थांबवली नाही. त्यामुळे ट्रम्प यांनी काल म्हटले की भारतावर 24 तासांत मोठा बॉम्ब निर्णय घेणार आहे. त्यांनी म्हटले होते की, रशियाकडून तेल खरेदी करून भारत-युक्रेन युद्ध सुरू ठेवण्यात रशियाला मदत करत आहे. यामुळे अमेरिका भारताविरुद्ध कारवाई करील. भारत हा चांगला व्यापार
मित्र नाही.
ट्रम्प यांनी आजच्या कार्यकारी आदेशात म्हटले आहे की, भारत सरकार रशियाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तेल आयात करत आहे. या परिस्थितीत अमेरिकेत आयात होणाऱ्या भारतीय वस्तूंवर 25 टक्के अतिरिक्त शुल्क 21 दिवसांनंतर लागू होईल. मात्र, विशिष्ट परिस्थितीत उदाहरणार्थ माल आधीच समुद्रात पाठवला असेल आणि तो मार्गावर असेल किंवा विशिष्ट तारखेपूर्वी अमेरिकेत पोहोचल्यास या शुल्कातून सवलत दिली जाईल.
ट्रम्प यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे की, इतर कोणताही देश रशियाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तेल खरेदी करताना आढळल्यास, त्याच्यावरही अशाच प्रकारचे शुल्क किंवा प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. वाणिज्य मंत्री या संदर्भात चौकशी करून परराष्ट्र मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्राध्यक्षांना पुढील कारवाईची शिफारस करतील. रशिया किंवा इतर कोणत्याही प्रभावित देशाने अमेरिकेच्या या आदेशाला प्रत्युत्तराच्या कारवाईने उत्तर दिले, तर राष्ट्राध्यक्ष या आदेशात बदल करू शकतात. रशियाने आपल्या भूमिकेत बदल करून अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेशी सुसंगत पावले उचलली, तर हे शुल्क कमी करण्याचा किंवा पूर्णपणे काढून टाकण्याचाही विचार केला जाऊ शकतो.
या आदेशात रशियन तेल या संकल्पनेची व्याख्या अधिक व्यापक करण्यात आली आहे. त्यानुसार, केवळ रशियातून निर्यात होणारे तेलच नव्हे, तर रशियामध्ये उत्पादित झालेले किंवा कोणत्याही तिसऱ्या देशाच्या माध्यमातून खरेदी केलेले तेल, ज्याचा मूळ स्रोत रशिया आहे, अशा सर्व पेट्रोलियम उत्पादनांवर हे शुल्क लागू होईल.
भारत हा रशियाच्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करून इतर देशांनाही ते विकत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. मार्च 2022 मध्ये अमेरिकेने रशियन तेल आणि संबंधित उत्पादनांच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घालणारा आदेश जारी केला होता. रशियाकडून तेल खरेदी न करण्याची तंबी अमेरिकेने जगभरातील देशांना दिली होती. भारताने रशियाकडून तेलखरेदी सुरूच ठेवल्याने संतापलेल्या ट्रम्प यांनी भारतावर हा नवीन शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे.
