वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतीय वस्तूंवर 25 टक्के आयात कर आणि अतिरिक्त दंड लादण्याची घोषणा केली आहे. भारत रशियाकडून शस्त्रास्त्रे आणि तेल खरेदी करत आहे. त्यामुळे भारतावर हा कर आकारला जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ‘मित्र’ भारताला अमेरिकेने दिलेला हा मोठा झटका मानला जात आहे.
ट्रुथ सोशल या सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रम्प यांनी लिहिले आहे की, भारत हा आपला मित्र आहे, परंतु अनेक वर्षे आपण भारतासोबत फारसा व्यापार करू शकलो नाही, कारण त्यांचे आयात शुल्क खूपच जास्त आहे. ते जगातल्या सर्वाधिक शुल्कांत आहे आणि जगात कुठल्याही देशात नसतील असतील अत्यंत कठीण व त्रासदायक असे गैर-आर्थिक व्यापार अडथळे भारतात आहेत. भारत आतापर्यंत नेहमीच रशियाकडून मोठ्या प्रमाणावर लष्करी उपकरणे खरेदी करत आला आहे आणि चीनसह तो रशियाचा सर्वात मोठा ऊर्जा खरेदीदार आहे. सगळ्या जगाला रशियाचा युक्रेनमधील नरसंहार थांबवा, असे वाटत असताना हे बरे नाही. त्यामुळेच 1 ऑगस्टपासून भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के कर लावण्यात येत आहे. याशिवाय, वरील कारणांसाठी भारतावर दंडदेखील आकारला जाईल.
गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. जुलैअखेरपर्यंत हा करार होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु अद्याप कोणतीही ठोस सहमती न झाली नाही. अमेरिकेने हा करार करण्यासाठी भारताला 1 ऑगस्ट ही मुदत दिली होती. त्यापूर्वी करार न झाल्यास अमेरिका भारतावर आयात शुल्क लागू करू शकते, असे संकेत ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वीच दिले होते. ते म्हणाले की, भारताशी आमची मोठी व्यापार तूट आहे. त्यांनी त्यांच्या बाजारात अमेरिकन कंपन्यांना प्रवेश देण्याबाबत दरवाजे बंद ठेवले आहेत. 1 ऑगस्ट हा अमेरिकेसाठी महान दिवस ठरेल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी 2 एप्रिल 2025 रोजी भारतीय वस्तूंवर 26 टक्के आयात कर लावला पान 1 वरून- होता. परंतु तो लवकरच तात्पुरते मागे घेतला होता. मात्र, आता पुन्हा एकदा अधिक कठोर भूमिका घेत त्यांनी 25टक्के टॅरिफ आणि अतिरिक्त दंड लागू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भारताच्या अमेरिकेतील निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः कपडे, औषधे, मोटारींचे सुटे भाग, स्टील आणि कृषी उत्पादने या क्षेत्राला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारला आता नव्याने अमेरिकेशी चर्चेची दिशा ठरवावी लागणार आहे. या घोषणेनंतर लगेचच परराष्ट्र मंत्री ए.स. जयशंकर यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी बैठक घेतली. या बैठकीचा तपशील बाहेर आला नाही.
सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत
कराराचा पहिला टप्पा
द्विपक्षीय व्यापार कराराच्या सहाव्या फेरीच्या चर्चेसाठी अमेरिकन अधिकारी 25 ऑगस्ट रोजी भारतात येणार आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कराराचा पहिला टप्पा पूर्ण होईल, असा अंदाज आहे. व्यापार कराराबाबतच्या चर्चेचा शेवटचा टप्पा वॉशिंग्टनमध्ये पार पडला होता. त्यावेळी भारताचे मुख्य वाटाघाटीकार राजेश अग्रवाल आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच यांच्यात चर्चा झाली होती.
