Home / देश-विदेश / विजय मल्ल्या आणि ललित मोदींची लंडनमध्ये पार्टी! खुलेआम मौजमजा

विजय मल्ल्या आणि ललित मोदींची लंडनमध्ये पार्टी! खुलेआम मौजमजा

लंडन- भारतातील बँकांची हजारो कोटींची फसवणूक करणारा उद्योजक विजय मल्ल्या आणि इंडियन प्रीमियर लीगचा घोटाळेबाज माजी चेअरमन ललित मोदी या परदेशी पळालेल्या बड्या आरोपींना भारतात आणण्याचे प्रयत्न गेली अनेक वर्षे चालू आहेत. सरकारला अजून त्यात यश आलेले नाही. मात्र, हे दोघे लंडनमध्ये खुलेआम मौजमजा करत आहेत. एका पार्टीत ते एकत्र आल्याचा व्हिडिओ नुकताच प्रसिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे, ही पार्टी ललित मोदी यांनीच आयोजित केली होती. त्यामुळे ललित मोदी आणि विजय मल्ल्याचे विलासी जीवन हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये विजय मल्ल्या आणि ललित मोदी हे पार्टीत धमाल करताना दिसत आहेत. ही एक समर पार्टी होती. या पार्टीत अनेक सेलिब्रेटी उपस्थित असल्याचेही बोलले जात आहे. त्यात भारतीय गायक कार्लटन ब्रगाँझा आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू क्रिस गेलचाही समावेश आहे. या व्हिडिओत ललित मोदी आणि विजय मल्ल्या हे प्रसिद्ध गायक फ्रँक सिनात्रा यांचे ‌‘आय डिड इट माय वे‌’ हे गाणे गात असल्याचे दिसत आहे. ललित मोदीनेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत असा मजकूर लिहिला आहे की, गेल्या रविवारी लंडनमधील माझ्या घरी झालेल्या पार्टीच्या काही आठवणी. या कार्यक्रमासाठी खास 310 मित्रांबरोबर आणि कुटुंबाबरोबर एक अद्भूत रात्र घालवली. उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार. आशा आहे की, हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालणार नाही. तो निश्चितच वादग्रस्त आहे, पण मी हेच सर्वोत्तम करतो.
माजी क्रिकेटपटू ख्रिस गेलनेही मोदी आणि माल्ल्यासोबतचा आपला एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर अपलोड केला आहे. तो मोदींसाठी बॅटवर सही करतानाही दिसत आहे. त्याने लिहिले आहे की, आम्ही खूप मजा केली. सुंदर संध्याकाळसाठी दोघांचे आभार.
ललित मोदी यांच्यावर 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएल स्पर्धेवेळी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ईडीने त्याच्यावर मनी लाँड्रिंग आणि फेमा कायद्याअंतर्गत अनेक गुन्हे दाखल केले आहेत. 2010 मध्ये मोदीने भारतातून पलायन केले. भारताने ब्रिटनकडे त्याच्या प्रत्यार्पणाची वारंवार मागणी केली आहे. विजय मल्ल्यावर 9 हजार कोटींचे कर्ज थकवल्याचा आरोप आहे. 2016 मध्ये त्याने भारतातून पलायन केले असून, भारत सरकारने त्याला फरार घोषित केले आहे.
गेल्याच आठवड्यात, ब्रिटनमधील उच्च न्यायालयाने 2021 च्या दिवाळखोरीच्या आदेशाविरुद्ध विजय मल्ल्याने दाखल केलेले अपील फेटाळले आहे.