वॉशिंग्टन- अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील संवेदनशील क्षेत्रात रविवारी अज्ञात विमान उडताना दिसले. हे संवेदनशील क्षेत्र असल्याने अमेरिकन हवाई दलाच्या एफ-१६ विमानांनीही उड्डाण केले आणि अज्ञात विमानाच्या पायलटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु विमानाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस अज्ञात विमान वॉशिंग्टन डीसीजवळ व्हर्जिनियाच्या जंगलात कोसळले. हे विमान लक्ष्य केले नसल्याचा दावा अमेरिकन हवाई दलाने केला.
कोसळलेले विमान सेसना ५६० साइटेशन व्ही जातीचे होते. ते रविवारी दुपारी ३:२० वाजता व्हर्जिनियातील जॉर्ज वॉशिंग्टन नॅशनल फॉरेस्टमध्ये कोसळले. अपघाताच्या वेळी विमानात चार जण होते, त्यांचा ठावठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही. अपघातग्रस्त विमानाचा शोध घेण्यासाठी व्हर्जिनिया राज्य पोलीस शोध मोहीम राबवत आहेत. दरम्यान, शहराच्या संवेदनशील भागात अज्ञात विमानाने अचानक उड्डाण केल्याने अमेरिकन संसद आणि राष्ट्रपती भवनात अलर्ट जारी करण्यात आला होता. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. यासंदर्भात यूएस नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांडने एक निवेदन जारी केले. यात म्हटले की, एफ-१६ जेटने विमानाच्या पायलटचे लक्ष वेधण्यासाठी ज्वालाही सोडल्या, परंतु सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले.

 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								 
								 
								 
								 
								 
								







