कोची– अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या शबरीमाला देवस्थानाला जाणाऱ्या यात्रेकरुंच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या शबरीमाला विमानतळासाठी जमीनीच्या सर्वेक्षणाला उद्यापासून सुरुवात होत आहे. बीसी चेरुवेल्ली विश्वस्त संस्थेच्या २ हजार ६२३ एकर जागेवर प्रामुख्याने हे विमानतळ होणार असून या संस्थेने घेतलेल्या आक्षेपानंतरही केरळ उच्च न्यायालयाने या सर्वेक्षणाला परवानगी दिली आहे.
शबरीमाला विमानतळ प्रामुख्याने द आयन चॅरिटेबल ट्रस्टच्या दोन हजार एकर वर पसरलेल्या चेरुवेली इस्टेट या जागेवर होणार आहे. एकूण २५७० एकर जागेवर हा प्रकल्प होणार असून त्यासाठी ट्रस्टच्या जागेबरोबरच मणिमाला व इरुमेली पंचायतीचीही काही जागा घेण्यात येणार आहे. पूर्व ख्रिस्ती चर्चची ही जागा असून त्यांच्या आयन ट्रस्टच्या ताब्यात आहे. या जागेच्या निवडीवरुन ट्रस्टने केरळ उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने जमीन हस्तांतरण प्रक्रियेवरही स्थगिती दिली होती. ही स्थगिती असतानाही न्यायालयाने सर्वेक्षणाला परवानगी दिली आहे. या प्रकरणाची सुनावणी ९ जुलै रोजी आहे. शबरीमाला विमानतळासाठी जागेची निवड भारत माता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रत्यक्ष सर्वेक्षणानंतर करण्यात आली. या प्रकल्पामुळे चेरुवल्ली इस्टेट मधील २२१ व इतर दोन गावातील ३६२ कुटुंबे बाधित होणार आहेत. एकूण दीड हजार नागरिक व ८७५ मजूरांनाही या प्रकल्पाचा फटका बसणार आहे. ट्रस्टने या जागेच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे म्हटले आहे.
